मी नाशिकला पहिल्यांदा आलो तो इंटरव्ह्यू  देण्यासाठी .एम ए झाल्यावर जरी मी दोन वर्षे मुंबईला चांगल्या  सरकारी नोकरीत होतो तरीही माझा जीव तिथे रमत नव्हता .शैक्षणिक क्षेत्रात पगार कमी असूनही मला त्या क्षेत्रात यायचे होते .मी MA केले ते प्राध्यापक होण्याच्या इच्छेने .सरकारी नोकरीकडे मी तात्पुरती व्यवस्था या दृष्टीने बघत होतो .शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला साधारणपणे एप्रिल ते जुलै या काळात जाहिराती येतात .अठ्ठावन  ऑक्टोबरमध्ये मी सरकारी नोकरीत मुंबईला आलो .पगार ठीक होता . प्रमोशनची शक्यता चांगली होती. दर तीन वर्षांनी महाराष्ट्रामध्ये कुठेही बदलीचीहि शक्यता होती.मला पैसा सत्ता याचे आकर्षण कधीच नव्हते.मला स्थैर्याची आवड होती आणि आहे .तरुण मुलांमध्ये नेहमी राहिल्यामुळे  आपणही मनाने तरुण राहतो .आपल्या विषयांमध्ये अापण अपटुडेट राहू शकतो.सुट्ट्या भरपूर हेही एक आकर्षण होतेच .मला सह्याद्रीपासून दूर जायचे नव्हते कारण जसे दूर जावे तसे हवामान जास्त  विषम होत जाते.बॅंकिंग विषयासाठी गोखले सोसायटीची जाहिरात एकुणसाठ मध्ये आली .बँकिंगमध्ये माझे स्पेशलायझेशन  होते .मी क्वॉलिफाइड होतो .दुपारी बारानंतर इंटरव्ह्यू होता. मी सकाळच्या गाडीने नाशिकरोड येथे उतरलो.जून महिना होता . नाशिकची हवा मला सुखावणारी छान वाटली .मुंबईहून आल्यामुळे तर ती आणखीच चांगली व प्रसन्न वाटली . हवेत चांगल्यापैकी गारवा होता .बसमधून नाशिकला येताना दूरवर पसरलेली   हिरवाई मनाला प्रसन्न करीत होती .वाटेत सिक्युरिटी प्रेस प्रिंटिंग प्रेस यांची कॅालनी लागली  .त्या वेळी ती नवीन होती. सुंदर रंगकाम केलेले होते .  त्याने सौंदर्यात भर पडत होती .नाशिकरोड नाशिक पट्टा जवळजवळ पूर्णपणे रिकामा होता .जकात नाका द्वारका समोर होता जकात भरावी लागू नये म्हणून त्याच्या पलीकडे काही दुकाने व गुदामे होती. त्या वेळी नाशिकरोडहून नाशिकला येणाऱ्या बस भद्रकाली स्टँडला थांबत.माझ्या प्रमाणेच  इंटरव्ह्यूसाठी आलेल्या एका तडफदार तरुण गृहस्थाची ओळख नाशिकरोड स्टेशनवर जेवण घेत असताना झाली.पुढे ते माझे जिवलग मित्र झाले.लिमये कॉमर्सच्या इंटरव्ह्यू साठी आले होते .तेही सरकारी नोकरीत होते . ते अकाउंटस् डिपार्टमेंटला होते तर मी  डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये स्टॅटिस्टिक्स सेक्शनला  होतो .भद्रकालीला उतरून टांग्यामधून आम्ही दोघे कॉलेजवर निघालो . भद्रकाली स्टँडवरून निघाल्यानंतर  टांगा नुकत्याच काँक्रिटीकरण झालेल्या  शिवाजी रोडने जात होता. डाव्या बाजूला असलेल्या  शिवाजी उद्यानांशिवाय दुसरे कुठेही काहीही नव्हते.शिवाजी उद्यानाचे नूतनीकरण झाले होते.  त्यामुळे ती बागही फार आकर्षक वाटत होती . उजव्या बाजूला नाशिक जिमखाना होता .त्याशिवाय  आणखी काहीही नव्हते .अरुंद रस्ता जिकडे तिकडे झाडी, सीबीएस पुढे गेल्यावर मोकळी मैदाने , दोन्ही बाजूला मळे ,धुळीचा  रस्ता,  डाव्या बाजूला दोन  छोट्या काॅलनी .त्या वेळचे जे पाहिले ते  नाशिक एखाद्या प्रसन्न चित्रासारखे वाटले .(गंगा ,जुन्या नाशिकचा परिसर व इतर विभाग  मला पहायला मिळालेले नव्हते ते नंतर पहायला मिळाले हे लक्षात ठेवले पाहिजे ).दोन्हीकडे पहात गप्पा मारीत टांग्यामधील सफर एन्जॉय करत आम्ही गोखले कॉलेज परिसरात पोचलो.

कॉलेजमधील आजीव सभासदांचे म्हणजे एकप्रकारे   मालकांचेच, खेळीमेळीचे वातावरण  ,जिकडेतिकडे असलेले मळे व गार हवा ,या सर्वामुळे माझे नाशिक बद्दल अतिशय चांगले मत झाले .कुठेही गर्दी गडबड गोंधळ नाही सर्वत्र शांत वातावरण जिकडे तिकडे पसरलेली हिरवाई व छानपैकी गारवा मी मुंबईहून घामट चिकट धावपळीच्या  वातावरणातून आलेला असल्यामुळे तर मला नाशिक जास्तच आवडले . मी मुळात खेडेगावातून  आलेला असल्यामुळे हिरवाई प्रशांत वातावरण यांची मला अावड व ओढ होती . नाशिकच्या मी एकदम प्रेमातच पडलो .

इंटरव्ह्यू झाले . सर्वत्र खेळीमेळीचे वातावरण होते. नंतर तुम्हाला कळवू म्हणून सांगितले .लिमये यांची निवड झाली असा मला संशय आला परंतु माझी निवड झाली नाही असे वाटले नाही .मुंबईला परत जाताना लिमये यांनी खुलासा केला त्यांनाच बँकिंग पेपर्स घ्या म्हणून सांगण्यात आले होते आणि त्यामुळे मला पत्र आले नाही.पुढच्या वर्षी एकोणीसशे साठ मध्ये गोखले सोसायटीची पुन्हा जाहिरात अाली . या वेळी त्यांना इकॉनॉमिक्समध्ये लेक्चरर पाहिजे होता.मी त्यांना कळविले की तुम्ही गेल्या वर्षी माझा इंटरव्ह्यू  घेतला आहे .मी पसंत असेन तर मला  नेमणूक पत्र पाठवा .त्यांनी उलट टपाली कळविले की  प्रोसिजर प्रमाणे असे करता येत नाही .तुम्हाला इंटरव्ह्यूला  यावे लागेल . इंटरव्ह्यूला आलो.निवड झाली.नेमणूक झाली.जुलैमध्ये येथे  कामावर रुजू झालो .तो जुलै महिना असल्यामुळे पावसाळी हवा होती . वातावरण अतिशय आल्हाददायक होते .मी प्रथम हॉटेलात उतरलो होतो तेथील खोली एवढी थंड होती की फ्रिजमध्ये  शिरल्या प्रमाणे वाटे. दोन दोन रग घेऊन झोपावे लागे.नाशिकमध्ये राहिल्यानंतर आणि निरनिराळे विभाग फिरल्यानंतरही माझे नाशिक बद्दल चे पहिले मत बदलले नाही .

त्या वेळी नाशिक अतिशय लहान शहर होते .नाशिक नाशिकरोड दोन वेगळी शहरे होती .वकीलवाडी व गोळे कॉलनी ही उचभ्रूंची वस्ती समजली जाई .तीच गावाची परिसीमा होती .कोर्ट, सीबीएस, कलेक्टर ऑफिस 'पोलिस कॉलनी, हे सर्व गावाबाहेर होते .वर्टी कॉलनी, टिळकवाडी, राका कॉलनी, हे सर्व भाग लहान होते. त्र्यंबक रोड वर कलेक्टर्, जज्ज, सिव्हिल सर्जन, अश्या सरकारी ऑफिसर्सचे बंगले होते.बाकी सर्व मळे व माळरान होते .त्या वेळेला गावापासून फार दूर पोलीस ट्रेनिंग काॅलेज होते .आता गावाची हद्द त्या पलीकडे कित्येक किलोमिटर गेली आहे .गंगापूर रोड संपूर्ण दोन्ही बाजूंनी रिकामा व मळे असलेला होता .गंगापूर धरण मी येण्या अगोदर पाच सहा वर्षे झालेले असावे . ज्याला हल्ली जुना आग्रारोड असे म्हटले जाते, तो मुख्य आग्रा रोड होता .तो सिंगल होता व त्यावरून ट्रकची ये जा होत असे.दुचाकी चार चाकी स्वयंचलित वाहने हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच होती .सीबीएस पुढे मुंबईच्या दिशेने आग्रा रोडवर , डाव्या उजव्या हाताला काही किरकोळ बंगले होते .कालिका मंदिर हे त्या वेळच्या गावाबाहेर होते .आता ते गावाच्या मध्यावर आहे असे म्हटले तरी चालेल .नवरात्रीमध्ये गावातून दर्शनाला लोक येत असत . एरवी त्या रस्त्यावर क्वचितच कुणी दिसत असे.कालिका मंदिराच्या पुढे आग्रा रोड संपूर्ण मोकळा होता .रोज संध्याकाळी निवांतपणे गप्पा मारीत चालत आम्ही त्या रस्त्याने जेवढे जमेल तेवढे जात असू .एखादी सायकल किंवा ट्रक रस्त्यावर दिसला तर  दिसत असे. ट्रॅफिकचा काहीही त्रास नव्हता.नाशिक हे त्या काळी थंड हवेचे ठिकाण समजले जाई.पंचवटीमध्ये गुजराती लोकांनी उन्हाळ्यात येऊन राहण्यासाठी बांधलेल्या काही धर्मशाळा होत्या.नाशिकरोडच्या  बाजूलाहि मोकळे मळे व  माळरान होते .गंगेच्या काठावरील वस्ती सोडली तर जवळजवळ चारी दिशा  मोकळ्या होत्या .त्यातही पंचवटीच्या बाजूला तुरळक  व नदीकाठी पूर्वेच्या बाजूला दाट वस्ती होती . प्रदेश सुपीक पाणी भरपूर त्यामुळे दुबार पिके काढली जात  भाजीपाला मोठ्या प्रमाणावर तयार होउन तो मुंबईला जात  असे.सर्वत्र रहाट पंप वगैरे होते. त्यामुळे सर्वत्र हिरवेगार होते . काँक्रिटच्या बिल्डिंगच्या अभावामुळे दुपारीहि चांगली थंडी असे .ऑक्टोबर हिट तर नसेच व उन्हाळयातहि एक दोन आठवडे पंखा घ्यावा की काय असे आपण म्हणतो तो पुन्हा थंड वातावरण होत असे .१९६०   मध्ये मी नाशिकला आलो व१९७३मध्ये पहिला टेबल फॅन मी घेतला .नंतर हळूहळू प्रत्येक खोलीत पंखा आला. त्यानंतर कुलर आले.

त्यानंतर एसीही आला .आता नाशिक सर्व दिशांनी फोफावले आहे .हळूहळू सिन्नरपर्यंत नाशिक जाईल की काय अशी भीती वाटते .गंगापूर रोड मुंबई रोड पुणे रोड त्र्यंबक रोड औरंगाबाद रोड  पेठ रोड वणी रोड इ. सगळिकडे काँक्रिट बिल्डिंग होत आहेत . एके काळी एकही बिल्डर नव्हता तिथे आता  पाचपन्नास बिल्डर आहेत . एकदा दुपारी बिल्डिंग  तापल्या कि रात्री खूप वेळ हवा गरम रहाते. हवा गार होऊ शकत नाही .सर्व मळे गेले .तिथे इमारती आल्या.  मळ्यामुळे जो गारवा होता तो आता नाही.स्वप्ननगरी अस्त पावली आहे . शीत नगरी आता बऱ्याच प्रमाणात उष्ण नगरी झाली आहे .तरीही अजून पावसाळ्यात चांगल्यापैकी गारवा असतो व थंडीमध्ये तर छानच थंडी पडते .इतर शहरांचे तापमान पाहिले की नाशिकचे तापमान गार वाटू लागते .अजूनही उन्हाळ्यात एक दोन दिवसच चाळीसच्या वर उष्णतामान जाते .सातपूर अंबड सिन्नर येथे इंडस्ट्रियल हब निर्माण झाले .आता तर नाशिक स्मार्ट सिटी करण्याचे ठरले आहे .  त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत  . संपन्नता वाढल्यामुळे व वाहतुकीसाठी गरज म्हणून  स्वयंचलित दुचाकी व चार चाकी वाहने रिक्षा बसेस  इत्यादिकांची प्रचंड गर्दी वाढली आहे.ओला,उबर या सारख्या टॅक्सी कंपन्यांच्या टॅक्सी व रिक्षा आल्या. परप्रांतियांचीही गर्दी वाढली आहे .

.मोठमोठे मॉल्स टॉवर्स उभे राहिले आहेत व राहात आहेत.शैक्षणिक संस्थांमध्येही फार वाढ झाली आहे .सर्व फॅकल्टींच्या सर्व प्रकारच्या कॉलेजचेही पेव फुटले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठही येथे आहे . अनेक प्रकारची हॉस्पिटल्स मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहेत .त्याच प्रमाणे झोपडपट्टीमध्येही वाढ झाली आहे . गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे .थोडक्यात झपाट्याने वाढणाऱ्या शहराचे जे काही बरे वाईट होते ते नाशिकचे झाले आहे .पूर्वी मेन रोडला म्युनिसिपालटीची बिल्डिंग होती .आता गावाबाहेर शरणपूर रोडवर कॉर्पोरेशनची भव्य व देखणी इमारत उभी राहिली आहे . त्यालाही आता वीस पंचवीस वर्षे सहज झाली .कॉर्पोरेशनच्या सीमा चारी दिशांनी वाढल्या व अनेक गावे शहरांमध्ये आली  .कॉर्पोरेशन झाल्यामुळे शहराची वाढ फार झपाट्याने  होत आहे   .गंगेवर पूर्वी एकच मोठा पूल होता . त्याठिकाणी आताअनेक पूल झाले आहेत .भट भिक्षुक यात्रिकांचे  एकेकाळी असलेले शहर आता पूर्णपणे  बदलले आहे .तरीही नाशिक तीर्थक्षेत्र म्हणूनच ओळखले जाते . पूर्वी नाशिक रोड देवळाली येथून रेल्वे जाताना त्यांचे आवाज शिटी खडखड ऐकू येत असे .त्याचा आता मागमूसही नाही.सगळा आवाज इमारती वगैरे शोषून घेतात  .पूर्वी नाशिकला त्याचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व होते आता तो चेहरा हरवला आहे असे मला वाटते.हल्ली बहुतेक सर्व शहरे एका सारखी एक वाटतात. शहरांचे व्यक्तिमत्त्व हरवल्यासारखे वाटते . पुलाखाली एवढे पाणी वाहून गेले तरीही पूर्वींच्या नाशिकच्या पाऊलखुणा अजूनही दिसतात . नाशिकच्या प्रेमामध्ये मी होतो आणि अजूनही आहे.रांगणारे  मूल ,मोठे झाल्यावर, तरुण झाल्यावर ,आपल्याला आनंदही होतो व पूर्वीची निरागसता व गम्मत हरवली म्हणून थोडी खिन्नताही वाटते.बदल हा सृष्टीचा प्रकृतीचा नियम आहे .स्वागतार्ह व अस्वागतार्ह गोष्टी पाठीला पाठ लावून येतात व आपल्याला दोन्हीचाही स्वीकार करावा लागतो.(माझ्या मनातील माझे मूळगाव जसे प्रसन्न व आकर्षक आहे त्याचप्रमाणे माझ्या मनातील नाशिकही प्रसन्न व आकर्षक आहे.ते चित्र मी जपून ठेवले आहे .

७/८/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel