अशा प्रकारे मी त्रिशंकू सारखा अधांतरी लटकत होतो .शिकूनही न शिकल्यासारखे झाले होते.वाया गेलेला मुलगा अशी प्रतिमा निर्माण झाली होती .पुणे युनिव्हर्सिटीने बाहेरून बीएला बसता येण्याची सोय केली होती.जूनमध्ये नाव नोंदवले पाहिजे अशी माझी कल्पना होती . ऑगस्ट चालू होता. विमनस्क स्थितीत मी रत्नागिरीत रस्त्याने चालत होतो.एवढ्यात गल्लीतून  एकजण  धावत आला व त्याने हाक मारली तो शाळेत माझ्याबरोबर होता असे त्याने सांगितले  .बोलता बोलता त्याने अजून नाव नोंदवता येईल ऑगस्ट अखेरीपर्यंत मुदत आहे असे निरोप दिल्यासारखे सांगितले व तो गल्लीत पुन्हा दिसेनासा  झाला .त्यानंतरही तो मला पुन्हा कधी दिसला नाही. शाळेतही मी त्याला क्वचितच  पाहिले असेल .एखाद्या देवदूतासारखा तो आला व अंतर्धान पावला .केवळ निरोप देण्यासाठी तो आला होता .मी तातडीने पुढील हालचाली केल्या व फाॅर्म मिळवला.पुढे काय होईल ते होईल पण भाऊंना डिग्री मिळवून दाखवायची असा निश्चय केला .विषय कोणते घ्यावयाचे स्पेशल ऑनर्स करावयाचे की जनरल करावयाचे असा प्रश्न होता .मार्गदर्शन करण्यासाठी कोणी नेहमीप्रमाणे उपलब्ध नव्हते.माझ्या जवळच्या नात्यात फारसे शिक्षण झालेला कुणीही नव्हता . जनरलला दोनशे दोनशे मार्काचे चार विषय असत. शंभर मार्कांचे प्रत्येक विषयाला दोन पेपर्स पाचवा इंग्लिश  आवश्यक दोनशे मार्क .स्पेशलला एकाच विषयाचे शंभर मार्काचे सहा पेपर असत व दुसऱ्या सलग्न विषयाचे शंभर मार्काचे दोन व इंग्लिश दोनशे मार्क आवश्यक अशी रचना होती. एकूण परीक्षा हजार मार्कांची होती व सर्व पेपर्स एकदमच द्यावे लागत.पाच विषयाचा अभ्यास करण्यापेक्षा तीन विषयांचा अभ्यास करणे मला जास्त सोपे वाटले .करायचे तर  स्पेशल ऑनर्स व्हावे असे वाटत होते.सर्व काही मलाच ठरवावयाचे होते. हा नको तो नको असे करता करता इकॉनोमिक्स इंट्रेस्टिंग म्हणून घेण्याचे ठरविले.पॉलिटिकल सायन्स संलग्न विषय म्हणून ठरविला.युनव्हर्सिटीत रजिस्ट्रेशन झाले . .आर्ट्सची मला काहीही माहिती नव्हती कोणता विषय सोपा व कोणता कठीण तेही माहित नव्हते. सर्वच अंधारात चाचपडत चालले होते.

एप्रिलमध्ये परीक्षा होती .माझ्याजवळ फक्त सात महिने होते .पुस्तके घेतली गाइड्स घेतली .आमच्या दत्ताच्या देवळात  ठाण  मांडले .मी सायन्सचा विद्यार्थी इंग्लिशच्या नावाने आनंदच .एक डिक्शनरीही घेतली कारण अनेक शब्दांचे अर्थ कळत नव्हते .सर्व विषय इंग्लिशमधून होते .व्यवस्थित नियोजन केले. रिव्हिजन  केव्हा व कशी करावयाची ते ठरविले .सात ते दहा अकरा ते  दोन व तीन ते सहा असा एकूण नऊ तास रोज अभ्यास करीत असे .संध्याकाळी समुद्रावर जाऊन तीन चार किलोमीटर चालत असे .

पेपर लिहिताना हात भरभर चालला पाहिजे म्हणून रोज सुमारे वीस मिनिटे इंग्लिशमधून काही लिहून काढीत असे.पंधरा वीस दिवसांनी  एखादी चक्कर रत्नागिरीला मारीत असे.कोणाचे मार्गदर्शन नाही ,शिकवणी नाही ,आर्टसचा काहीही गंध नाही ,अशा परिस्थितीतही  मी सात महिने खडतर तपस्या केली व एप्रिल मध्ये पुण्याला जाऊन परीक्षा दिली .एसपी कॉलेजला माझा नंबर आला होता .मी पास कसला होतो मी भाऊंना गंडवीत आहे असे एकूण मत होते .इतक्या कमी वेळात सायन्सचा विद्यार्थी इकॉनॉमिक्स घेऊन पास होईल हे बऱ्याच जणांना पटत नव्हते .

रिझल्ट लागला बीए स्पेशल इकॉनॉमिक्स विथ ऑनर्स चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालो. मला इंग्लिश एकूण अभ्यासक्रम आठवत नाही .परंतु एक शेक्सपिअरचे नाटक होते व साठ ते ऐंशी मार्कांचे एसे रायटिंग .ज्या विषयावर मी माझा दीर्घ एसे लिहिला तो विषय मात्र आठवतो.true end of life is to know that life never ends  असा तो बिकट फिलॉसॉफिकल विषय होता .मी झपाटल्यासारखा कुणीतरी माझ्या हातून लिहून घेत आहे अशा प्रकारे तो एसे लिहिला .MA (entire economics) युनिव्हर्सिटीत करावे व चांगला क्लास मिळवून प्राध्यापक व्हावेअसे स्वप्न डोळ्यापुढे तरळू लागले. 

२०/६/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com
(लेखक अर्थशास्त्राचे प्राध्यापक  होते)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel