काही दिवसांपूर्वी मुंबई ते गोवा क्रुझर चालू होणार आहे असे वाचले .रत्नागिरी बंदर घेणार आहे असेही त्या बातमीत होते .भाट्ये खाडीवर आता पूल झालेला असल्यामुळे बोट रनपार बंदर घेईल . तिथून रत्नागिरीला अर्ध्या तासात पोचता येईल.रनपार नावाऐवजी रत्नागिरी बंदर असे नाव त्याला कदाचित दिले जाईल .फिनोलेक्सने तिथे आता त्यांच्या बोटी लागण्यासाठी एक छानपैकी धक्का बांधलेला आहे .बोटी सरळ त्या धक्क्याला लागतात.त्या धक्क्याचा वापरही करता येईल .असा विचार मनात आला आणि आमच्या फार पूर्वी केलेल्या  प्रवासाची आठवण जागी झाली.

एकोणीसशे पासष्ट साली आम्ही गुळ्याला सुटीत जावे की न जावे अशा विचारात होतो. त्याच वेळी मला पुण्याला मॉडरेटर म्हणून बोलावणे आले होते .एवढ्यात भाऊंचे पत्र आले की आई खूप आजारी आहे आणि तिला इंजेक्शन्स देण्याची गरज असल्यामुळे रत्नागिरीला राहणे भाग आहे .भाऊ काही कारणामुळे रत्नागिरीला जाऊन राहू शकत नाहीत .त्या वेळी स्वाती केवळ सहा महिन्यांची होती .एसटीच्या लाल बसमधून अनेक ठिकाणी चढत उतरत टप्पे मारीत प्रवास करणे मुश्किल होते .मुंबईला जाऊन बोटीने कोकणात जावे असे ठरविले .रत्नागिरी बंदर त्रासाचे असुरक्षित व पुन्हा रत्नागिरी ते गुळे हा खडतर प्रवास म्हणून रनपार बंदरात उतरण्याचे ठरविले .बोटीला रत्नागिरी बंदरातून बाहेर पडण्यास व रनपार बंदरात येण्यास  जो वेळ लागे तेव्हढाच .बोटीला समुद्रातील प्रवासासाठी केवळ दहा मिनटे पुरत.आमच्या गावाचा डोंगर जिथे संपतो तिथेच रनपार बंदर आहे .रनपार बंदर अतिशय सुरक्षित व चांगले आहे .दोन्ही बाजूंनी समुद्रात गेलेले डोंगरांचे सुळके व अत्यंत खोल पाणी .वारा वादळापासून सुरक्षित आणि लाटाही लहान प्रमाणात असे हे बंदर आहे .त्या वेळी बोट  जवळजवळ किनार्‍यावर येऊन लागत असे .बोट बंदरात आल्यावर अत्यंत स्थिर असे. हलणे नाही की डुलणे नाही .किनारा इतका जवळ दिसे की असे वाटे की आपण चालतच किनाऱ्यावर पोचू परंतु पाणी फार खोल असे.बोटी नेहमी रनपार बंदरात थांबत असतच असे नाही.कारण इथे उतरणारे किंवा चढणारे पॅसेंजर्स फार कमी प्रमाणात असत. बोट  रनपार बंदर घेत असेल तर उत्तमच नाहीतर रत्नागिरीला उतरावयाचे असे ठरविले  .मूल सहा महिन्यांचे असल्यामुळे प्रवासात काय काय अडचणी येतील व काय काय तयारी करावी लागेल ते ग्रहस्थाश्रमी लोकांना सहज समजेल.त्या वेळी डायपर नव्हते.!!

सुदैवाने बोट रनपार बंदर घेणार होती. एकच अडचण होती कि तिथून गुळ्याला जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था काय होणार.बोट ज्याअर्थी बंदर घेते त्या अर्थी तिथून काहीतरी वाहतुकीची व्यवस्था होणार असे गृहीत धरून आम्ही रनपार बंदरातून जाण्याचे ठरविले .तोपर्यंत मी केव्हाही रनपार बंदर अगदी जवळ असूनही पाहिलेले नव्हते. सकाळी भाऊच्या धक्क्यावरून निघालेली बोट बंदरे घेत घेत रात्री बारा वाजता रनपार बंदरात पोहोचली .बोट अनेक बंदरे घेत असे व प्रत्येक बंदरात आत जाण्यास बाहेर येण्यास आणि तिथे थांबण्यात खूप वेळ जात असे.बोट अगदी किनाऱ्याजवळ उभी राहिली .बोटीतून सहज आम्ही खपाट्यात (खपाटा म्हणजे उंडली नसलेली रुंद मोठी होडी---- उंडली म्हणजे होडीच्या मध्यभागी दोन मोठे लाकडी बार लावून ते दोन बार दहा बारा फुटावर पाण्यामध्ये जोडलेले असतात त्यामुळे गुरुत्वमध्य व्यवस्थित राहण्यास मदत होते आणि होडी डुलत नाही स्थिर राहते)  उतरलो व पाच मिनिटात किनाऱ्यावर आलो .रात्रभर बोटीच्या ऑफिसमध्ये थांबावयाचे व सकाळी जे वाहन मिळेल त्या वाहनाने घरी जावयाचे असे ठरविले होते. रात्रीची वेळ बंदरात उतरणारे केवळ आठ दहा जण आणि किनाऱ्यावर सर्वत्र शुकशुकाट ,वीज त्यावेळी रत्नागिरी शिवाय कुठेही नव्हती त्यामुळे  वाळूवर चांदणे व पलीकडे काळोख व भयाण शांतता .जवळच्या झोपडीवजा बोटीच्या ऑफिसमध्ये कुणीही नाही, फक्त किंचित लुकलुकणारा कंदील ,आम्ही दोघं आणि बरोबर लहान मुलगी एकूणच इथे उतरण्याची योजना योग्य नव्हती  कि काय असे वाटू लागले .रनपार बंदरात रत्नागिरी बंदरा सारखा जरा कमी पण गजबजाट असेल, अशी कल्पना होती.पण इथे भयाण शांतता होती चिटपाखरूही कुठे दिसत नव्हते.आमच्याबरोबर उतरलेले पाच सहाजण केव्हाच काळोखात अदृश्य झाले होते  .आकाश निरभ्र होते .पौर्णिमेच्या आसपासचा दिवस असावा .सर्वत्र पिठूर चांदणे पडले होते.लांबलचक किनारा, समुद्रात घुसलेले दोन डोंगर ,चमचमता समुद्र व लांबवर जाणारी दिव्यांनी लगडलेली बोट हे दृश्य फारच सुंदर होते 

परंतू त्या सौंदर्याचा आस्वाद घेण्याच्या मनस्थितीत आम्ही नव्हतो .तेवढ्यात समोरून एक बैलगाडी आली ,बैलगाडी वाल्याने आम्हाला ओळखले . आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला .तोपर्यंत आम्ही जरा टेन्शनमध्ये होतो.बैलगाडीमध्ये गवत त्यावर गोणपाट त्यावर घोंगडी व नंतर चादर  अशा प्रकारे बैठक व्यवस्था फार सुंदर होती .रनपार ते गोळप, गोळप ते पावस, व पावस ते गुळे असा एकूण प्रवास होता. अंतर सुमारे दहा बारा किलोमीटर होते.दोन मोठ्या घाट्या, बराच उंच सखल भाग ,काही प्रवास गाव दरीने, म्हणजे गावातून  व काही जंगलातून प्रवास , वडा पिंपळा खालून ,पाण्यातून, मध्यरात्रीचा प्रवास होता. त्यामुळे माझ्या मनात जरी काहीही किल्मिष नसले तरी पत्नीने कोकणातील भूतासंबंधी बरेच काही ऐकलेले असल्यामुळे तिला थोडी, कदाचित  बरीच भीती वाटत असा वी .त्याशिवाय कोकणात वाघही फिरत असतात हे तिला माहिती होते .चांदण्यातील प्रवास संस्मरणीय होता .कारण एवढ्या रात्री आणि चांदण्यात प्रवास करण्याची वेळ कधीच येत नाही .हा प्रवास बसमधून भुरकन होणारा व अनेक माणसांच्या संगतीतून होणारा नव्हता. निदान मी तरी तोपर्यंत तसा रात्रीचा प्रवास केला नव्हता .कोकणात त्यावेळी दिवसासुद्धा चांगली शांतता असे आता तर रात्र होती त्यामुळे जिकडे तिकडे प्रगाढ(भयाण) शांतता होती .रस्त्याने कुणीही भेटत नव्हते.पावसला बाजारपेठेतून जाताना जी बाजारपेठ गजबजलेली असते तिथे दुकाने बंद असल्यामुळे  शांतता होती. बस बैलगाडी माणसे कुणीही  कुठेही दिसत नव्हते .चांदण्यात झाडांच्या लहान मोठ्या सावल्या ,वार्‍यामुळे होणारी त्यांची हालचाल ,झाडांची सळसळ, जंगलातून लांबून येणारे प्राण्यांचे आवाज ,बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज व गाडीमध्ये गाडीवान आम्ही दोघं व एक सहा महिन्यांची मुलगी  याशिवाय कुठेही काही जाग नव्हती .ज्या रस्त्याने लहानपणापासून अक्षरश: शेकडो वेळा गेलो होतो तो रस्ता आता गूढ आणि काही वेगळाच वाटत होता.आमच्या घरी जाताना घर जवळ आल्यावर काही वेळ रस्ता डोंगराच्या अर्ध्या भागावरून जातो. त्यावेळी वरच्या बाजूला डोंगरावरील जंगल आणि दुसऱ्या बाजूला दूरवर कुर्‍याठ (पावसाळी भातशेतीची जागा) नंतर माड पोफळीचे बन नंतर पांढरी वाळू व समुद्र .चांदण्यात सर्व दृश्य फारच मोहक दिसत होते .उजव्या बाजूच्या डोंगरावरील जंगलातून कोणी आपल्यावर उडी तर मारणार नाही ना अशी थोडीशी भीतीही कुठेतरी वाटत होती. झाडी दाट असल्यामुळे सर्व प्रवासात ,मधून मधून चांगलाच काळोख होता .दूरवर चांदणे दिसे परंतु रस्त्यावर मात्र काळोखहोता. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आम्ही घरी पोचलो .बैलगाडी त्यावेळी सुद्धा अगदी दारात जात होती.भाऊंना आम्ही केव्हा येतो व कसे येतो त्याचे पत्र जरी पाठविलेले असले तरी ते त्यांना मिळालेले नव्हते .दोन चार  हाका मारल्यावर भाऊ जागे झाले . दरवाजा उघडला आम्हाला दारात बघून भाऊ  आश्चर्यचकित झाले .तुम्ही सकाळपर्यंत रनपार येथे थांबून नंतर गाडीने का आला नाही म्हणून त्यांनी विचारले .तिथे चार पाच तास थांबावे लागले असते .धड झोपही झाली नसती गाडी लगेच मिळाली व गाडीवानही गावातील ओळखीचा होता ,त्यामुळे रात्रीचाच आलो असे उत्तर मी दिले .घाटावरील मुलगी (पत्नी)तिला अनोळखी भाग, रात्रीचा प्रवास ,बरोबर एवढी लहान मुलगी ,तू प्रवास करावयाला नको होता .तू तिथेच थांबवायला हवे होते असे म्हणत त्यानी माझी चांगलीच कानउघडणी  केली .माझी चांगलीच चंपी होताना पाहून पत्नी गालातल्या गालात हसत होती .

८/७/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel