आमचे गाव गणेशगुळे . रत्नागिरीपासून दक्षिणेला सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे .गणपतीपुळे सुमारे पंचावन्न किलोमीटरवर रत्नागिरीपासून  उत्तरेला आहे .इतके जवळ गणपतीपुळे असूनही एकोणीसशे सत्याहत्तर सालापर्यंत गणपतिपुळ्याला आमचे जाणे झाले नाही .रत्नागिरीला शिक्षणासाठी लहानपणी असतानाही जाणे झाले नाही. नंतरही नोकरीनिमित्त नाशिकला असताना वर्षातून दोनदा गावी जात होतो ,तरीहि पुळे येथे जाणे झाले नाही .आई वडील गुळ्याला असल्यामुळे व नोकरीमध्ये उन्हाळी व दिवाळीच्या वेळेला मोठ्या सुट्या असल्यामुळे, वर्षातून दोनदा गुळ्याला जाणे होत असे .दरवेळी गुळ्याला जाताना पुळ्याला जायचे हं असे म्हणूनही जाणे होत नव्हते .शेवटी सत्याहत्तर साली रत्नागिरीला गेल्यावर प्रथम पुळ्याला जायचे व नंतर गुळ्याला जायचे असे ठरविले .

एकेकाळी गणपतीचे जागृत स्थान गुळ्याला होते असे म्हणतात. गुळ्याला, जेथे गणेश मूर्ती आहे, त्या कपारीतून सतत पाणी वाहत होते, असे म्हणतात .त्यामुळे गुळ्याला घरी गणेश चतुर्थीला गणपती आणण्याची प्रथा नव्हती. सर्वांनी सडय़ावर (डोंगरमाथ्यावर सपाट प्रदेश असतो त्याला सडा असे म्हणतात गणपतीचे देवस्थान व मंदिर तेथे आहे  )जाऊन गणपतीची पूजा करावी, नैवेद्य दाखवावा ,मग घरी येउन जेवावे,अशी प्रथा होती .परंतु नंतर एवढ्या लांब जाणे कठीण झाल्यामुळे व लहान मुलांना घरी गणपती आणण्याची हौस असल्यामुळे प्रत्येक घरी गणेश चतुर्थीला गणपती आणणे सुरू झाले असावे . गणपतीला गुळ्याचा कंटाळा आल्यामुळे ,लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, किंवा काही अन्य कारणामुळे , कोणतेही कारण असो ,त्याने गणपतीपुळे येथे जाण्याचे ठरविले .त्याप्रमाणे एका रात्री दोन दृष्टांत झाले .गुळे येथे कोणा एकाच्या स्वप्नात गणपती येऊन त्याने मी गणपतीपुळे येथे जातो, असे सांगितले व त्याच वेळी गणपतीपुळे येथे दुसऱ्या एकाच्या स्वप्नात येऊन उद्या सकाळी तू गाय घेऊन चरवण्यासाठी अमुक अमुक डोंगरावर जा व जिथे गाय दुधाची धार सोडील ,त्या ठिकाणी  मी आहे असा दृष्टांत झाला .त्याप्रमाणे ती व्यक्ती गाय घेऊन डोंगरावर गेल्यावर गायीने दुधाची धार सोडली व त्या ठिकाणी  हल्लींची गणेशमूर्ती सापडली,अशी आख्यायिका आहे .गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला असा वाक्प्रचारही प्रचलित आहे आणखी एक शक्यता ,कदाचित जागृत देवस्थान न राहिल्यामुळे गणेश चतुर्थीला गणपती घरी आणण्याची प्रथा सुरू झाली असावी .गुळ्याला सडय़ावर गणपती मंदिर आहे .ते आता मोठे बांधले आहे लोक तिथे भाविकतेने जातात. ते अजूनही जागृत आहे अशीही समजूत आहे  ,पावसेला स्वामी स्वरूपानंदांकडे आलेले लोकही , गणपती मंदिर पाहून गुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर जातात.हे थोडे विषयांतर झाले.

सत्याहत्तर साली गणपतीपुळे हे एक लहान खेडेगाव होते .कोणतीही हॉटेले नव्हती .निवासाची कोणतीही व्यवस्था नव्हती.लहान अरुंद धुळीचा रस्ता होता.एमटीडीसी नव्हते. डोंगर उतारावरील जुन्या खेड्यातील कोकणातील दृश्येही नव्हती.मालगुंडची केशवसृष्टीही नव्हती .टॅक्सी नव्हत्या लांबवरून येणाऱ्या प्रवासी गाड्या नव्हत्या .हल्ली सारख्या अनेक ठिकाणाहून केवळ गणपती पुळ्यासाठी येणार्‍या , एसटी गाडय़ाही नव्हत्या. स्वच्छ सुंदर समुद्र किनारा होता .एक जुने निर्मळ कोकणातील खेडे होते.पर्यटन केंद्र असे त्याचे स्वरूप मुळीच नव्हते . हल्ली जसे हौशे गवशे नवशे सर्वच गर्दी करून गोळा होतात तशी परिस्थिती पूर्वी नव्हती. गणपती मंदिरही एखाद्या कोकणातील जुन्या खापरी घरासारखे होते .(पूर्वी मंगलोरी कौले येण्याच्या अगोदर कोकणात घरावर जे मातीचे नळे घातले जात असत त्याला खापरी नळे म्हणत .सिलिंडर मधोमध कापल्यावर त्याचे दोन भाग जसे पन्हळाच्या आकाराचे होतात तसे ते असत) वस्तीला राहण्यासाठी अगोदर माहिती काढून एखाद्या गुरुजींकडे आपली व्यवस्था करावी लागे. त्याप्रमाणे आम्ही आमची व्यवस्था एका गुरुजींकडे केली .आम्ही चौघे जण म्हणजे मी पत्नी व मुले ( प्रभाकर प्रभा स्वाती व प्रभंजन)गेलो होतो. आंम्ही एसटीच्या गाडीने धूळ खात स्टॅंडवर गणपतीपुळ्याला उतरलो व चालत गुरुजींचे घर गाठले .तेही कोकणातील घरासारखे होते .अंगणात मांडव , दोन पायऱ्या चढून गेल्यावर पडवी, पडवीला रेजे ,पुन्हा चार पायऱ्या चढून गेल्यावर ओटी ,पडवीत किंवा ओटीवर झोपाळा, एक किंवा दोन झोपाळे हे कोकणातील घरांचे व्यवच्छेदक लक्षण आहे . नंतर माजघर स्वयंपाकघर मागची पडवी इत्यादी .जेवण झाल्यावर मी व गुरुजी बाहेर अंगणात खाटेवर झोपलो व बाकीची मंडळी आत झोपली.सकाळी लवकर उठून, स्नान करून ,गुरुजींनी दिलेले सोवळे नेसून, हातांमध्ये  पूजेचे साहित्य घेऊन, गुरुजींबरोबर पाणंदीवरून (पाणंद म्हणजे चार पाच फूट रुंदीची दगडाने बांधलेली कोकणातील पायवाट )चालत, गणपती मंदिरापर्यंत पोचलो.बरोबर अर्थातच पत्नी व मुले होती .गर्दी मुळीच नव्हती फक्त आम्हीच होतो .गणपतीची गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे साग्रसंगीत पूजा झाली .नंतर गुरुजींच्या घरी येऊन कपडे बदलून पुन्हा गणपती मंदिरात गेलो .नंतर गणपतीच्या डोंगराला म्हणजेच गणपतीला प्रदक्षिणा घातली.डोंगराचा एक भाग गणपती असल्यामुळे स्वाभाविक प्रदक्षिणेसाठी डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते. त्यासाठी पायवाटही बांधलेली आहे  .नंतर कोवळ्या उन्हात समुद्रावरही काही काळ होतो .मऊमऊ स्वच्छ पांढर्‍याशुभ्र वाळूतून कोवळ्या सूर्य किरणात समुद्र किनार्‍यावर फिरताना मजा आली.(आमच्या गुळ्याला समुद्र असला तरी तो पुळ्याइतका रुंद व लांबच लांब नाही.) संध्याकाळी एसटीने पुन्हा रत्नागिरीला आलो .

त्यानंतर अनेक वेळा गणपतीपुळ्याला धावती भेट झाली , दोन चार दिवस एमटीडीसी मध्येही राहणे झाले.पूर्वी गाभार्‍यात स्त्रियांना जाऊ देत नसत. आता तोही बदल झाला अाहे .आम्ही एमटीडीसीमध्ये राहावयाला गेलो होतो तेव्हा सकाळी लवकर जाऊन पत्नीनेही गणपतीची पूजा केली . गणपती मंदिरामध्ये हळूहळू बदल होत गेला. नवे मंदिर झाले. सहज गणपती दर्शन दुर्लभ झाले. धर्मशाळा झाली. बाहेरचा परिसरही बदलत गेला.गर्दी वाढत गेली. समुद्रावरील किनारा घाणेरडा झाला.चांगले रस्ते झाले .खासगी मोटारी व टॅक्सींची गर्दी वाढली .दूरवरून खासगी बसेस भरभरुन येऊ लागल्या .हातगाड्यांवरील विक्रेते वाढले .भेळपुरी खाऊन किंवा इतर गोष्टी खाऊन, शहाळी पिऊन ,लोक सर्व कचरा , किनाऱ्यावर टाकू लागले. भरतीबरोबर सर्व कचऱा किनाऱ्यावर येऊन ओहोटीनंतर तो सर्वत्र पसरलेला दिसू लागला.जवळच चार पाच किलोमीटरवर मालगुंडला केशवसृष्टी ही उदयाला आली ,अनेक लहान मोठी हॉटेल व रेस्टॉरंट्स निघाली.अनेक घरानी आपल्या घरांचे रूपांतर लहान मोठ्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये किंवा दुकानांमध्ये केले.पैसा वाहू लागला. लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली .तशी देवाचीही  आर्थिक परिस्थिती स्वाभाविकपणे सुधारली.डोंगरावर कोकण सृष्टी उदयाला आली .एका लेखात गदिमांनी म्हटले आहे पूर्वीचे कृष्णाकाठचे कुंडल आता राहिले नाही  त्याप्रमाणे आता समुद्र काठीचे पूर्वीचे गणपतीपुळे राहिले नाही.प्रगतीबरोबर विकासाबरोबर नाईलाजाने चांगल्या गोष्टींबरोबर अनिष्ट गोष्टीही स्वीकाराव्या लागतात .(काही अनिष्ट गोष्टी अस्वच्छता ,मल पाण्याचा पुनर्वापर इ.आपण इच्छा असेल तर टाळू शकतो).

२४/५/२०१८© प्रभाकर  पटवर्धन
pvpdada@gmail.com 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel