भाऊनी आजारपणामुळे लवकर निवृत्ती घेतली .डोर्ले सोडून आपले मूळगाव गणेश गुळे येथे जाण्याचे ठरविले .भाऊंचे एक विद्यार्थी होते त्यांनी एक योजना सुचविली पावस येथे वैद्य यांचा एक बंगला होता.ते मुंबईला राहत असत परंतु त्यांच्या पत्नीला मुंबईची हवा मानवत नसे म्हणून त्यांनी हा बंगला पत्नीसाठी बांधला होता नंतर पत्नी निवर्तली .मागे नारळी पोफळीची बाग, रस्त्याला लागून बंगला, प्रशस्त  जागा होती.तिथे  बंगल्याची देखभाल करावयाची असे काम होते .गोठ्यामध्ये बैल होता त्याला बैलरहाटाला घालून  त्याच्याकडून नारळी पोफळीच्या बागेत शिंपण करावयाचे असे  काम होते. त्यासाठी चाळीस रुपये मोबदला मिळणार होता .भाऊना फक्त वीस रुपये पेन्शन होते. दुसऱ्या महायुद्धामुळे महागाई वेगाने वाढत होती आणि काही तरी इतर उत्पन्नाची गरज होती .भाऊनी जास्त चौकशी न करता काम स्वीकारले व पावसला येण्याचे ठरविले प्रत्यक्षात तिथे आल्यावर काम बरेच जास्त होते असे आढळून आले .भाऊंना एवढे काम करणे प्रकृती व प्रवृत्ती यामुळे शक्य नव्हते .त्यांनी कामासाठी एक गडी ठेवला .त्यावर चाळीस रुपये खर्च होऊ लागले .शिवाय गड्यावर देखरेख करावी लागे ती वेगळीच .भाऊनी सुरुवातीलाच मी एक वर्ष काम करीन व जमले तर पुढे करीन असे सांगितले होते .चार सहा महिन्यांतच भाऊनी त्यांना तुम्ही दुसरी सोय पहा वर्ष झाले की हे काम मी सोडणार असे सांगितले.

मी त्यावेळी रत्नागिरीला शिकावयाला होतो.ही जागा रस्त्यावर होती .मोटारीने येणे जाणे मला सोयीस्कर होते एवढेच.बंगला असला तरी सुद्धा आम्हाला राहायला तळमजल्यावरील अर्धा भाग होता .वरचा मजला बंद होता अर्ध्या भागात दुसरे कुणीतरी रहात होते .आम्ही पुन्हा आमच्या घरी म्हणजेच गणेशगुळ्याला जाऊन राहावयाचे ठरविले .परंतु अजून दोन तीन वर्षे आम्ही आमच्या गावी घरी जाऊन राहावे असा योग नव्हता .
भाऊंचे एक परमस्नेही त्यांचे नावे  रामचंद्र गोडबोले .आम्ही सर्व त्यांना घरच्या उपनामाने म्हणजेच अप्पा म्हणून ओळखत होतो .त्यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे ते आंबेवाले देसाई यांच्या घरी राहात असत .त्यांची वृद्ध आई एकटीच त्यांच्या पावस येथे घरात राहात असे .कुठे तरी राहावयाचे तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन राहावे असे त्यांनी सुचविले म्हणजे आईला सोबत होईल .ही योजना भाऊना ठीक वाटली कारण त्यांना परमस्नेह्याचे मन मोडवेना.गुळ्यालाही  काही उत्पन्न होते असे नव्हते. त्याचबरोबर  अप्पा हे त्यांचे गुरू बंधूही होते .हेच अप्पा पुढे स्वामी स्वरूपानंद म्हणून प्रसिद्ध झाले 
अशाप्रकारे आम्ही पुन्हा पावसलाच दुसऱ्या घरात राहायला गेलो .

  २८/५//२०१८ ©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel