राजापूर तालुक्यातील गावकोंड हे माझे आजोळ .गावको्ंड म्हणजे गावकोन नचा ड झाला .गावखडीचा कोन ते गावकोंड .मुख्य गाव गावखडी पाच सहा किलोमीटरवर होते .तर कशेळी गावाची हद्द अर्धा किलोमिटरवर होती. माझे वडील जिथे नोकरीला होते त्या डोरले गावापासून  चार पाच किलोमीटरवर व आमच्या गावापासून गुळ्यापासून सुमारे पंधरा वीस किलोमीटरवर अाजोळ आहे .त्या काळी मुलगी देताना पंचक्रोशीतील मुलगा पाहण्याची पद्धत होती .त्याची माहिती व्यवस्थित असते व मुलीला आणणे नेणे सोपे होते .हल्लीसारखी संपर्क क्रांती त्यावेळी नव्हती .त्याचप्रमाणे वाहतूक क्रांतीही नव्हती .संपर्क साधन म्हणजे चिठ्ठी देऊन गडी पाठवणे किंवा पत्र पाठवणे होते.

नऊ वर्षांचा होईपर्यंत दरवर्षी गोकुळाष्टमीत आजोळी जाणे होत असे (नंतर मी आजोळी राहायला आलो .) कारण गोकुळाष्टमीत आजोबांकडे मोठा उत्सव असे .संगमरवरी दगडातील पितांबर नेसलेली डोक्यावर पीस खोचलेली, मुरली वाजवत असलेली, कृष्णाची सुरेख मूर्ती होती .आम्ही सर्व मावस भावंडे जमत असू .त्याचप्रमाणे इतर नातेवाइक व गावातील लोकही जमत असत .दोन दिवस गायन कीर्तन भजन आरत्या यांची धम्माल असे .गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री कीर्तन व नंतर मध्यरात्रीला जन्मोत्सव असे.दुसऱ्या दिवशी पुन्हा कीर्तन व दहीहंडी असे. दहीहंडी फोडून नंतर दही पोहे सर्वांना प्रसाद म्हणून वाटले जात .मोठ मोठ्या समया जिकडे तिकडे लावल्या जात .एक दोन पेट्रो मॅक्सचा बत्याही आणलेल्या असत .खेळणे खाणे पिणे दंगा मस्ती यामध्ये दोन तीन दिवस कसे जात ते कळत नसे.नंतर पुन्हा घरी जाण्याची वेळ येई तेव्हा वाईट वाटत असे .

माझी चौथी झाली .मी तेव्हा नऊ वर्षांचा होतो आणि माझे वडील खूप आजारी पडले .त्यांना अर्ध पगारी बिनपगारी रजेवर दीर्घकाळ जावे लागले .काही दिवस डोरले गावी व नंतर त्यांचे मामा नामांकित वैद्य होते त्यांच्या घरी भाऊ(वडील ) सुमारे वर्षभर होते. नंतर ते त्यांच्या बहिणीकडे म्हणजे माझ्या आत्याकडे सहा महिने होते .डोरले गावी चौथीच्या पुढे शाळा नव्हती व दुसरीकडे कुठे राहून शिक्षण घेण्यासारखी आर्थिक परिस्थिती नव्हती. शिक्षण सोडून देऊन घरी बसण्याची वेळ आली .आजोळच्या गावीही पाचवी ते सातवी शाळा नव्हती .मामा म्हणाला मी त्याला पाचवी ते सातवी घरीच शिकवतो व सातवीच्या परीक्षेला रत्नागिरीला नेऊन बाहेरून बसवतो.सातवीला वेगळी  व्हर्नाक्युलर  फायनल म्हणून परीक्षा असे. ती पास झाल्यावर मराठी शाळेमध्ये मास्तर म्हणून नोकरी लागे.(जी मुले पुढे शिकत त्याना या परीक्षेला बसणे आवश्यक नव्हते.) आर्थिक परिस्थितीमुळे त्यावेळी तेवढेच ध्येय डोळ्यासमोर होते. अशा परिस्थितीमुळे आजोळी दोन वर्षे राहण्याचा योग आला .मामाने म्हटल्याप्रमाणे दोन वर्षांत माझ्या तीन यत्ता पूर्ण करून सातवीच्या परीक्षेला बसवले. मी चांगल्या मार्कांनी व्हर्नाक्युलर  फायनल परीक्षा  उत्तीर्ण झालो. पुढे मी शिकलो व नंतर कॉलेजमध्ये प्राध्यापक झालो .अर्थात लहान मास्तर ऐवजी मोठा मास्तर झालो एवढेच !.त्या दोन वर्षांतील काही लक्षात राहिलेले प्रसंग 

आजोळच्या घरी माजघर व ओटी यांना जोडणाऱ्या भागांमध्ये  प्रचंड 

काळोख होता त्यामुळे माजघरातून ओटींवर जाताना मी एकदम सुसाट धावत जात असे .मी एकूणच जिकडे तिकडे चालण्याऐवजी पळत जात असे.आजोबा वृद्ध होते.मी त्यांच्यावर धडकत असे व ते जाम वैतागत.

आमच्या डोर्ल्याच्या घरी साप क्वचितच दिसे .परंतू आजोळी मात्र दररोज किंवा एक दिवसा आड  साप घरात आढळे.मामाच्या घरी विजेचे दिवे तर नव्हतेच (त्यावेळी रत्नागिरीलाही वीज नव्हती ).रॉकेलचेही दिवे नव्हते. ठाणवी( समईचाच एक प्रकार) कर्‍हा दिवा लामणदिवा किंवा टांगता दिवा होते. तिन्ही कडू तेलावरचे वातींचे दिवे. त्या वेळी प्रकाश अपुरा आहे असे कधी जाणवले नाही .मामाकडे एक लोखंडी किंवा पोलादी पंजा  काठीला बसवलेले हत्यार होते .सामान्यतः साप अडचणीच्या जागी किंवा वळचणीला द डून बसे .प्रथम त्यावर पंजा मारला जाई. पंजाचे एखादे टोक जरी सापांमध्ये घुसले तरी त्याला पळता येत नसे. मग काठीने त्याला मारण्यात येई. साप रात्रीचा आढळल्यास आजी लामण दिव्याने प्रकाश दाखवी व आजोबा पंजा मारीत. मामा अडगळ बाजूला करणे व काठीने सापाला मारण्याचे काम करी.आजोबांच्या हातातही एक काठी असे .मी धाडधाड ह्रदय  उडत असताना विस्फारीत नजरेने ते सर्व दृश्य पाहात असे.रोज रोज ते दृष्य बघून नंतर माझी नजर मेली. भीती गेली .साप हा शब्द सर्वसाधारणपणे वापरलेला आहे त्यांमध्ये असंख्य विषारी व बिनविषारी प्रकार असतात व त्यांची जात व प्रकार मामा व आजोबा बरोबर ओळखत असत .आणखी एक धडकी भरविणारा प्रकार म्हणजे रात्री बाहेर लघुशंकेला  जाणे  .जवळच मोठी दरड होती .रात्री काळोखात वाघ त्यावरून आपल्यावर उडी मारेल की काय अशी सारखी भीती वाटत असे.

आमच्या घरी भाऊंना अन्न चहा वगेरे गरम लागे .तर मामाकडे आजी सोडून सर्वांना गार पदार्थ लागत .चहा केल्यावर तो एका वाडग्यात ठेवला जाई व त्यावर जाळी असे .पूर्ण गार झाल्यावर दोन हातात तो कथलाचा वाडगा धरून अाजोबा गटागटा तो चहा पीत .त्या गारढोण चहात आजोबांना काय सुख मिळे ते त्यांचे त्यांनाच माहीत .

पाटाचे पाणी येई पण ते उन्हाळ्यात नसे मोठा आड (गोल विहीर) होता .जवळ खाजण(बांध फुटल्यामुळे खारे पाणी मळ्यांमध्ये भरून जो भाग तयार होतो त्याला खाजण म्हणतात.)असल्यामुळे आडाचे पाणी खारट होते .त्याने स्नान करावे लागे. त्यामुळे अंगाला खाज सुटे.पिण्यासाठी लांबून पाणी आणावे लागे.

भरतीच्या वेळी खाजण पाण्याने भरे व पोहावयाला जाण्याला मजा येई.मी एकटाच पोहण्याला जात असे परंतु अरे जाऊ नको म्हणून कुणी ओरडलेले मला आठवत नाही . मामा एक दोन तास शिकवी .नंतर अभ्यास देई.तो संपूर्ण दिवसात पूर्ण करावाच लागे.नियोजन व त्याची अंमलबजावणी मी मामांकडून शिकलो.मामा रोज माझ्याकडून संध्या व बारा सूर्य नमस्कार घालून घेत असे.संध्या विसरलो पण व्यायामाची अावड अजूनही कायम आहे .

,तीन चार किलोमीटरच्या अंतरावरील शाळेत मामा मास्तर होता. तो बर्‍याच वेळा मला त्याच्या बरोबर शाळेत घेऊन जाई .  पायवाटेने जाताना गवत दोन्ही बाजूनी अंगाला घासत असे .हिवाळ्याच्या दिवसांत  दवबिंदूंनी व पावसात पावसामुळे  गवत ओले झालेले असे व अंग भिजून जाई.गवताची लहान लहान कुसे अंगाला व कपड्याला चिकटत. पायवाटेने जाताना अनेक गडगे (दगडाने बांधलेली, छोटीशी, कंपाऊंड म्हणून बांधलेली भिंत )ओलांडतांना ,घाटी चढताना, सड्यावरून मोकळा वारा अंगावर घेत चालताना ,मजा येई. बरोबर जेवणाचा डबा घेऊन जावे लागे कारण शाळा सकाळ दुपार अशी असे मध्ये दोन तीन तास सुट्टी असे .मामा वेळ मिळेल तसे मला शिकवी. सकाळचा तो गारठ्यातून, पावसातून, केलेला प्रवास अविस्मरणीय आहे .

मामाच्या घराच्या जवळ ब्राह्मणाचे घर नव्हते .होती ती  कुणब्यांची घरे होती. त्यांच्या मुलांबरोबर स्वाभाविकच जमणे शक्य नव्हते.आजोबा किंवा मामा मला त्यांच्या बरोबर खेळावया ला जाऊ देणे शक्य नव्हते. कंटाळा येई .वेळ घालविण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. पण इलाज नव्हता.मामाकडे मला कळण्यासारखे श्रीकृष्ण चरित्र हे एकच पुस्तक होते. त्यांची अनेक पारायणे मी केली .

आजोबा रोज सकाळी व्यायाम म्हणून थोडा वेळ लाकडे फोडीत.रोजची लागणारी लाकडे व पावसाळ्यात बेगमी म्हणून लागणारी लाकडे ते फोडीत.आमच्याकडे गडी लाकडे फोडीत असत. मला घरी लाकडे फोडणे ही गोष्ट नवीन होती .लाकडे फोडणे ,पूजेसाठी विविध प्रकारची फुले गोळा करणे, नंतर दुपारी साग्रसंगीत देवांची पूजा करणे ,यात आजोबांचा वेळ छान जाई.दुपारी वामकुक्षी झाल्यावर स्तोत्रे म्हणण्यात त्यांचा वेळ छान जाई.साक्या दिंड्या श्लोक अभंग आरत्या इत्यादी एकाच चालीमध्ये ते म्हणत असत .हे सर्व खड्या आवाजात चाले. ऐकताना खूप  मजा येई .संध्याकाळी त्यांची चक्कर कशेळी बांधावर असे तिथे  दुकानांचा समूह एकत्रित होता . तिथे त्यांचे स्नेही होते. 

आजी गरीब होती. शांत होती. सैपाक करण्यात तिचा सर्व वेळ जाई.कोकणातील निरनिराळे पदार्थ करून खाऊ घालण्यात तिला आनंद  वाटे .ती मधून मधून सारखी स्तोत्रे म्हणत असे .ती कमरेत वाकलेली होती .

आजोळी दोन प्रकारे जाता येत असे होडीतून नदी ओलांडून चालत जाणे किंवा होडीतून कशेळी बांधांवर जाऊन तिथून चालत जाणे अर्थात डोली हाही एक पर्याय होता 

मामाच्या घराच्या मागे एक सुरुंगीचे झाड होते त्याला फुले आली की .सर्वत्र छान वास दरवळे व भुंग्याची फौज गुणगुणत असे .

मामाकडे एक मोठे लाकडी कोठार होते .त्याला दोन भाग होते.एक भरले की दुसऱ्यात भात टाकले जाई.कुळ कायदा झाला.  कुळांकडून भात येणे बंद झाले. मग कठीण परिस्थिती निर्माण झाली .

विहिरीवर ओकती होती. पाणी काढण्याचे भांडे अडकवण्यासाठी, एक बांबूचा दांडा ,नंतर त्याला एक मोठा वासा जोडलेला लांब वासा एका खांबावर आधारलेला असे त्याला भोक पाडून एक दगड अडकवलेला असे. असे  .थोडक्यात तरफेप्रमाणे त्याचा उपयोग करून आडातून पाणी काढले जाई .(आड म्हणजे गोल विहिर ).

खाजण ,आड ,ओकती ,कोठार ,जंगल, रोज साप निघणे,शेजार पाजार नसणे, खेळायला सवंगडी नसणे, रात्री वाघाची डरकाळी,  नजरेला घरातल्या माणसांशिवाय कोणी न पडणे, सर्व गोष्टी मला नवीन होत्या. मधून मधून भाऊंना भेटण्यासाठी डोरले मावळंगे गोळप जिथे भाऊ असत तिथे मी एकटा किवा मामाबरोबर जात असे. 

.हा हा म्हणता दोन वर्षे संपली. व्हर्नाक्युलर फायनल पास झालो व पुढील शिक्षणासाठी रत्नागिरीला दाखल झालो.

१०/६/२०१८ © प्रभाकर  पटवर्धन
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel