लिहायला सुरुवात करताना मला अपरिहार्यपणे आचार्य अत्रे या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची आठवण झाली."मी कसा झालो" या नावाचे त्यांचे एक पुस्तक फार पूर्वी  वाचलेले आठवते.त्यामध्ये त्यांनी त्यांचे बहुढंगी व्यक्तिमत्त्व कसे विकसित झाले ते प्रत्येक प्रकरणात स्वतंत्रपणे  लिहिले होते.शिक्षक,मुख्याध्यापक,लेखक, निर्माता,चित्रपट कथालेखक, पत्रकार,वक्ता,विनोदी लेखक, नाट्यलेखक,वर्तमानपत्र मालक, इत्यादी इत्यादी,अनेक कामे त्यांनी, तीही मोठ्या प्रमाणात केली.  त्यांनी एका आयुष्यात इतकी विविध  कामे केली की भविष्यकाळात एकाच नावाची चारपाच व्यक्तिमत्त्वे होती असे लोक म्हणू शकतील.त्यानंतर त्यांनी कऱ्हेचे पाणी आत्मचरित्र लिहायला घेतले.दोन तीन खंड लिहिल्यावर दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला."मी कसा झालो" हे त्यांचे  पुस्तक अवश्य वाचावे.

लिहिताना आचार्य अत्रे यांची स्मृती मनात जागवली गेली आणि त्यांच्याबद्दल चार शब्द लिहिल्याशिवाय राहता आले नाही.आता ~मी लेखक कसा झालो~ या स्मृतीकडे वळतो.  

शाळा,कॉलेज,विद्यापीठ, इथे शिकत असताना मी केव्हांही निबंध अथवा अशा प्रकारच्या  कोणत्याही लेखन स्पर्धेमध्ये भाग घेतला नव्हता.प्राध्यापक झालो खरा परंतु वक्तृत्व स्पर्धेत कधीही भाग घेतला नव्हता.त्यामुळे टाचणे काढणे, मनात विषयासंबंधी आराखडा तयार करणे इत्यादी गोष्टी कधी केल्याच नव्हत्या.किंवा असे म्हणूया की फक्त माझ्या अर्थशास्त्र या विषयाशी संबंधित टाचणे काढली होती. एमए वरच्या श्रेणीत पास झाल्यानंतर दोन वर्षे सरकारी नोकरीत काम करीत होतो.तिथेही कधी टाचणे तयार करण्याची वेळ आली नाही.

*लेखनाला मी पुढील कारणाने प्रवृत्त झालो.*

गेल्या शतकात कृष्णमूर्ती नावाचे एक थोर विचारवंत होऊन गेले .त्यांच्या विचारांनी अनेक लोकांना मोहिनी घातली होती.अजूनही त्यांच्या विचारांचा पगडा अनेक लोकांवर आहे मीही त्यांतील एक आहे. 

त्या काळात म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस ते एकूणीसशे साठ या काळात अनेकांनी त्यांचे विचार, भाषांतर ,अनुवाद ,मुक्त रूपांतर, अशा अनेक प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला .भाऊ(माझे वडील) स्वामी स्वरूपानंदांचे गुरुबंधू होते .त्यांना तत्वज्ञानाची खूप आवड होती .तुटपुंज्या उत्पन्नातही जेव्हां जेव्हां जमेल त्या त्या वेळी त्यांनी तत्त्वज्ञानावरील अनेक ग्रंथ गोळा केले होते.अनेक लोकांच्या ज्ञानेश्वरीवरील टीकेसह ज्ञानेश्वरी,अमृतानुभव व त्यावरील टीकाग्रंथ,लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य ,त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांचे सर्व खंड ,इत्यादी अनेक आध्यात्मिक ग्रंथ त्यांनी गोळा केले होते .एक कपाट त्या ग्रंथांनी भरलेले होते.ते ती पुस्तके  अधूनमधून वाचत असत.चर्चा करीत असत. त्यांच्या वाचनात कृष्णमूर्तींचे विचार आले ते त्यांना खूपच आवडले. त्यांनी अनेक लेखकांनी लिहिलेले क‍ृष्णमूर्तींचे विचार वाचले .त्यांचे समाधान होईना ते विचार आवडत पण उमजत नव्हते .मला अध्यात्माची आवड नाही हे त्यांच्या केव्हाच लक्षात आले होते.एकोणीसशे साठ मध्ये मी सरकारी नोकरीतून कॉलेजात अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो.त्याकाळी कॉलेजला तीन महिने पंधरा मार्च ते पंधरा जून अशी  उन्हाळ्याची सुटी असे. एकोणीसशे एकसष्ठमध्ये सुटीत मी घरी गेलेला असताना त्यांनी मला जर तुला कृष्णमूर्तींचे एखादे चांगले पुस्तक मिळाले तर ते वाच व त्याचे जमेल तसे रूपांतर किंवा अनुवाद करून मला पाठव असे सांगितले.मी मुंबईला फोर्टमध्ये पुस्तकांच्या दुकानात फिरून शोध घेतला.शेवटी मला "इंटरनॅशनल बुक डेपो" नावाचे एक भव्य पुस्तकाचे दुकान मिळाले.अजूनही ते बहुधा त्याच नावाने तिथे असावे.तिथे मला त्यांचे the first and the last freedom हे मनासारखे पुस्तक मिळाले.नाशिकला आल्यावर मी ते पूर्ण वाचले त्याने मी फारच प्रभावित झालो .मी लेखनाच्या बाबतीत  एक नंबरचा आळशी, मी काय लिहिणार तरीही भाऊंवर खूप प्रेम असल्यामुळे मी मला जमेल तसे रूपांतर करून त्यांना पाठविण्याचे ठरविले दर आठवड्याला एका प्रकरणावर विचार करून चिंतन मनन करून मग ते विचार मराठीत लिहावयाचे व पुन्हा एकदा सुधारून नंतर ते पोस्टाने पाकिटातून पाठवावयाचे असा क्रम जवळजवळ सहा ते आठ महिने चालला होता .ते सहा महिने माझे जवळजवळ भावावस्थेत गेले. भाऊनाही माझे पाठविलेले वाचून समजले असे वाटले त्यांनी माझे कौतुक केले. त्या विचारांचा माझ्यावर खोल परिणाम झाला आहे.अंतरंगातही फरक पडला तो कसा पडला किती पडला हे सांगता येणे कठीण आहे .

कृष्णमूर्तीना त्यांच्या व्याख्यानानंतर अनेक जणांनी प्रश्न विचारले त्यावर त्यांनी उत्तरेही दिली .questions and answers त्यांचे माझ्याजवळ तीन खंड आहेत .त्याचेही स्वैर रूपांतर करून मी मूळ पुस्तकाप्रमाणेच क्रमश: भाऊना पाठविले. अशाप्रकारे मी लिखता झालो.~मला समजलेले कृष्णमूर्ती~ व ~मला उमजलेले कृष्णमूर्ती~ या लिखाणानंतर मी  कधीही कांहीही दोन हजार अठरा पर्यंत  लिहिले नाही .

माझे हस्ताक्षर दिव्य असल्यामुळे व पाकिटात घडी घालून पाठवलेले कागद चुरगळल्यामुळे,भाऊंनी सुंदर अक्षरात मोठ्या तावावर(फुल स्केप ) ते सर्व पुन्हा लिहून काढले. त्याच्या दोन प्रती केल्या.एक प्रत स्वामी स्वरूपानंदांकडे ठेवली होती. त्यांच्याकडे येणारे भाविक ते वाचत, पाहात असत.भाऊ वृद्धत्वामुळे माझ्याकडे राहायला नाशिकला आले त्यावेळी ती प्रत त्यांच्याबरोबर माझ्याकडे आली .पंधरा वर्षांपूर्वी ते कागद पिवळे पडू लागल्यामुळे व तुकडे पडू लागल्यामुळे त्याचे मी संगणकीय रूपांतर तज्ज्ञांकडून करून घेतले.अर्थात मूळ हस्ताक्षर किंचित लहान झाले पण तसेच राहिले.ते नंतर पेनड्राइव्हवर घेतले.बर्‍याच जणानी पेनड्राइव्हवरुन प्रतीही काढून घेतल्या.

पंधरा वर्षांपूर्वी संगणकीय रूपांतर झाल्यावर मी स्वस्थ बसलो होतो.त्यासाठी मी सहा हजार रुपये त्यावेळी खर्च केले.संपूर्ण लिखाण पेनड्राइव्हवर आले होते.त्याच्या दोन पुस्तकासारख्या  वाचता येतील अशा प्रतीही काढून घेतल्या.एक सॉफ्ट बाइंडिंग केलेली,दुसरी हार्ड बाइंडिंग केलेली.पीएच डी साठी थिसिस असतो त्या प्रकारची!

पांच वर्षांपूर्वी जरी अगदी आजच्या स्वरुपात नाही तरी स्मार्टफोन अस्तित्वात आला होता.माझ्या मुलाचा संगणक व्यवसाय आहे.तो इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर  व सून  कम्प्युटर इंजिनीअर आहेत. माझा मुलगा संपर्कासाठी फार फार वर्षापूर्वी  सुरूवातीला पेजर वापरत असे.मोबाइल येण्यापूर्वीची ही गोष्ट आहे.

साधा फोनही माझ्याजवळ कित्येक वर्षे नव्हता.टेलिफोनवरून संपर्क करता येत होता.फोन काय करायचा आहे? अशी माझी धारणा होती.सौभाग्यवती हॉस्पिटलमध्ये असताना घरी संपर्क साधणे कठीण होऊ लागले.त्यामुळे प्रथम मी साधा मोबाइल घेतला.

माझे चिरंजीव व्हॉट्सअॅप ग्रुपवर आलेले किंवा अन्य विनोद व लिखाण वाचून दाखवीत असत.त्याला ते माझ्याकडे फॉरवर्ड करता यावेत,माझे मला वाचता यावेत म्हणून,मी त्याला एक स्मार्ट फोन दे म्हणून सांगितले.माझा पहिला स्मार्टफोन साडेतीन हजार रूपयांचा अगदी प्राथमिक अवस्थेतील होता.ही तीन चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.मुख्यतः फोनचा उपयोग संपर्क साधन म्हणून मी करीत असे.

कृष्णमूर्तींच्या मी लिहिलेल्या विचारांचे डिजिटलायझेशन व्हावे असे मला वाटले.ते काम एकाकडे सोपविले होते.संगणकावर त्याने डिजिटलायझेशन केले.त्यासाठी जे अॅप वापरले त्यामध्ये कांहीतरी गोंधळ झाला.वाचता येईल असे त्याचे स्वरूप होत नव्हते. त्याने घालविलेला वेळ व केलेले काम फुकट गेले.त्या व्यक्तीला दिलेले तीन चार हजार रूपये फुकट गेले.

आपण स्वतः डिजिटलायझेशन कां करू नये असा मी स्वतःलाच प्रश्न विचारला.तोपर्यंत स्मार्टफोनमध्ये बऱ्यापैकी प्रगती झाली होती.किंवा असे म्हणूया की मला परवडेल असा स्मार्टफोन अस्तित्वात आला होता .

कृष्णमूर्तींचे विचार चिरस्थायी स्वरुपात हल्लींच्या पध्दतीत यावेत,(ई बुक ई लेख) म्हणून मी स्वतः डिजिटलायझेशन केले.(तसे या जगात चिरस्थायी कांहीही नाही.किंवा असे म्हणूया अस्थैर्य चिरस्थायी आहे)(किंवा असे म्हणता येईल की स्थिर अस्थिर हे सर्व भास आहेत)   

तिथे कदाचित थांबलो असतो.परंतु "स्मृतिचित्रे" लिहीण्याची प्रेरणा झाली.त्यानंतर "विचारतरंग" लिहिले.अधून मधून प्रवास यात्रा "आनंदयात्रा" लिहिली."सुभाषित माला" लिहिली गेली.  

ज्याना कृष्णमूर्तींबद्दल जिज्ञासा होती अशा अनेकांना पेनड्राइव्ह वरून प्रती पाठविल्या.

डिजिटलायझेशन केल्यावरही अनेकांना ते पाठविले.

याचवेळी प्रतिलिपीचा प्लॅटफॉर्म माझ्या पाहण्यात आला.त्यावर कांहीही अपलोड करणे अतिशय सुलभ असल्यामुळे मी प्रथम कृष्णमूर्ती त्यावर अपलोड केले.नंतर अर्थातच "स्मृतिचित्रे" "आनंदयात्रा" "विचारतरंग"अपलोड केले.

१९१८पर्यंत मी एकही कथा लिहिली नव्हती.कथा लिहावी असा विचार कधीही मनात आला नाही. मला हाताने लिहिण्याचा अतिशय कंटाळा आहे.हस्ताक्षर चांगले नाही.

माझा योगायोगावर विश्वास आहे .आपण (वेळ मिळाल्यास)स्मृतिचित्रे वाचल्यास, तुम्हाला माझ्या या तत्त्वज्ञानाचा उलगडा होईल. प्रयत्न म्हणजे फरपट असा एक सिद्धांत आहे.किंवा असे म्हणूया योग असेल तरच प्रयत्न होतो.योग असेल तर प्रयत्न यशस्वी होतो.योग नसेल तर फरपट होते.किंवा फरपट होण्याचाच योग असतो!   

या सर्व घटनांच्या अगोदर लिपीकार अॅप माझ्या पाहण्यात आले.त्याच्या साहाय्याने लिहीणे सुलभ आहे.ते अॅप माझ्या पाहण्यात आले नसते तर मी कांहीच कधीही लिहिले नसते.कृष्णमूर्तींच्या विचारांचे डिजिटलायझेशन व्हावे म्हणूनच ते अॅप माझ्या पाहण्यात आले.(सर्व योगायोगाच्या गोष्टी आहेत)

दिवसातून दोन तीन तास मी लिखाणासाठी देऊ शकतो.प्रतिलिपीच्या अप्रत्यक्ष प्रोत्साहनामुळे कथा लिहिण्यास प्रवृत्त झालो.आणि सर्व प्रकारच्या कथा बर्‍यापैकी लिहिता येतात असे आढळून आले.लिहीत गेलो.अपलोड करीत गेलो.लोक वाचत गेले.लोकांना कथा बर्‍यापैकी आवडतात असे वाटते.

विरंगुळा, टाइमपास,वेळ घालवण्याचे साधन, म्हणून कुणी पत्ते खेळतात, गप्पा मारतात, पुस्तके वाचतात, भजन पूजन करतात,धार्मिक ग्रंथ वाचतात,आणखी काय काय करतात.उदरभरणासाठी करावे लागणारे काम आणि त्यासाठी द्यावा लागणारा वेळ सोडल्यास,वेळ कसा घालवावा ही प्रत्येका पुढील मुख्य समस्या असते.आणि असे असूनही वेळ पुरत नाही अशी अनेक जणांची तक्रार असते!समाजाला घातक होत नाही तोपर्यंत कोण कसा वेळ घालवतो त्याला माझ्या दृष्टीने  महत्त्व नाही.किंवा असे म्हणूया कि सर्वच वेळ घालवण्याची संसाधने मला समान वाटतात.

वेळ घालवण्याचे साधन म्हणून मी गोष्टी लिहितो!!!!  

अर्थात कथालेखक ही उपाधी मला लावावी का ते लोकांनीच ठरवायचे आहे.

या सर्वामागे कृष्णमूर्ती  आहेत असे म्हणता येईल.माझे त्यांच्या विचारावरील प्रेम आहे असे म्हणता येईल.अगदी मुळाशी जायचे म्हटले तर यामागे माझे वडील "भाऊ" व माझे त्यांच्यावरील प्रेम  आहेत असे म्हणता येईल. त्यांच्यामुळे मी कृष्णमूर्तींचे विचार मराठीत आणले.किंवा असेही म्हणता येईल *योगच* तसा होता.

आणखी एक सुचलेला विचार मांडतो. मी नुकतेच तीन चार महिन्यांपूर्वी  एकुणनव्वदाव्या वर्षांत पदार्पण केले .माझ्या बरोबरीचे कित्येक मित्र अस्तंगत झाले आहेत.माझ्या वयाच्या कित्येक लोकांना स्मार्टफोन वापरता येत नाही असे आढळून आले आहे.ते अजूनही साधा मोबाइल फोन वापरतात.माझ्यापेक्षा लहान असलेल्या व माझ्या बरोबरीच्या बऱ्याच लोकांना अल्झायमर(स्मृतिभ्रंश) झालेला आहे.स्मृतिभ्रंश न होता जे झाले पाहिजे ते त्यांना स्मृतिभ्रंश झाल्यामुळे झाले आहे.मी अजून अस्तंगत झालो नाही.जाग्यावर बसून कां होईना परंतु लिहिण्याइतका सक्षम आहे.ही ईशकृपा किंवा योगायोग म्हणूया!!त्यामुळे हे सर्व शक्य झाले.लेखक होण्यामागे दीर्घायुष्य लाभणे, स्मृतिभ्रंश न होणे, कृष्णमूर्ती वरील व भाऊं वरील प्रेम,डिजीटलायझेशन दुसर्‍याकडे देऊन ते यशस्वी न होणे,स्मार्ट फोनचा वापर करता येणे,लिहिण्यासाठी सोपे सुलभ लिपीकार अॅप सापडणे,प्रतिलिपीचा प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे, हे सर्व घटक आहेत.         

लिहिण्याच्या ओघात एक गोष्ट स्पष्ट लिहायची राहिली.तिचा अर्थातच धावता उल्लेख झाला आहे.ज्याला डिजिटलायझेशन करण्यासाठी दिले होते .त्यांनी ज्या अॅपचा वापर केला ते जर यशस्वी झाले असते.तर मी कदाचित लेखक झालोच नसतो.आपल्याशी संवाद करण्याची वेळही आली नसती!यालाच मी योगायोग म्हणतो.माझे वडील म्हणत असत परमेश्वरी इच्छेचा कल पाहून वर्तन केले पाहिजे.त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तणूक झाली तर आपण यशस्वी होतो.आपण परमेश्वरी इच्छा ओळखली नाही किंवा ओळखूनही त्याला विरोध केला तर अयशस्वी होतो.शेवटी इच्छा ओळखणे न ओळखणे विरोध करणे न करणे सर्व योगायोगाच्या गोष्टी असतात. 

परमेश्वरी कल, विधिलिखित,यदृच्छा,ओळखता आली पाहिजे.कृष्णमूर्तींच्या लिखाणाचे डिजिटलायझेशन मीच करावे अशी परमेश्वरी इच्छा होती. त्यातूनच मी केलेल्या लिखाणाचा स्रोत निर्माण झाला.हे सर्व आपोआप होतच राहते.त्याचे आपोआप साक्षित्व होत राहिले पाहिजे.तेही आपल्या हातात नाही हे कळले पाहिजे.वेगळ्या भाषेत कळणे न कळणे विठ्ठलचरणी समर्पण.

*मी असा लेखक झालो*

१९/९/२०२१©प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel