"राम हमारा जप करे हम बैठे आराम"हे सुप्रसिद्ध वचन संत कबीर यांचे आहे.बऱ्याच वेळा या वचनाची मला आठवण होते.याचा नक्की अर्थ काय असावा असा  विचार आपोआप मनात येतो .त्यावेळी माझ्या मनात पुढील विचार येतात.

१) योगशास्त्राप्रमाणे आपल्या पाठीच्या मज्जारज्जूमधून तीन नाडय़ा जातात.इडा पिंगळा आणि सुषम्ना.मज्जारज्जूच्या खालच्या बाजूला या नाड्या आहेत असे म्हटले जाते.नड या संस्कृत शब्दाचा अर्थ जाणे असा आहे.आपला श्वास नेहमी कोणत्या तरी एका नाडीतून इडा किंवा पिंगळा जात असतो.डाव्या नाकपुडीतून जाणारा श्वास इडा नाडीतून जातो. इडा नाडीतून जाणारा श्वास शरीर थंड करतो.पिंगळा नाडीतून जाणारा श्वास शरीर उष्ण करतो.हे जेव्हा माझ्या वाचनात आले तेव्हा माझ्या मनात पुढील विचार आला.एकच हवामानात कांही जणांना उकडत असते तर त्याचवेळी कांही जणांना थंड वाटत असते.तर कांहीजणांना कांहीच फरक पडत नाही.दिवसातील चोवीस तासांपैकी जास्त वेळ ज्यांची इडा नाडी चालू असते त्यांना थंड वाटत असावे.ज्यांची पिंगळा नाडी चालू असते त्याना उष्ण वाटत असावे.ज्यांच्या दोन्ही नाडय़ा बारा बारा तास चालतात त्यांना कांहीच फरक पडत नसावा.

जेव्हां दोन्ही नाकपुड्यातून समान श्वास वहात असतो त्यावेळी सुषुम्ना नाडीतून श्वास वहात असतो.त्यावेळी श्वास विविध चक्रामधून जातो.सुषुम्ना नाडीने इडा व पिंगळा यांना वेढा घातलेला आहे.पाठीच्या कण्यामध्ये मज्जारज्जूमध्ये अनेक चक्रे आहेत असे म्हणतात.एकेका चक्रामध्ये श्वास स्थिर झाला कि निरनिराळ्या सिद्धी प्राप्त होत असतात.असे राजयोगात म्हटलेले आहे.श्वास अशाप्रकारे विविध चक्रांत स्थिर न होता तो एकदम ज्यावेळी सहस्त्रदल चक्रात स्थिर होतो त्याला समाधी अवस्था म्हणतात. सहस्त्रदल चक्र टाळूखाली  मस्तकात आहे.भ्रूमध्यामध्ये तिन्ही नाडय़ा एकत्र मिळत असतात.तिथे ज्ञान चक्र आहे.तिथे श्वास स्थिर झाला तर ज्ञानप्राप्ती होते असे म्हणतात.

ज्यावेळी कबीर स्वस्थ बसलेले असत त्यावेळी त्यांना सुषुम्ना नाडीतून विनासायास  कोणत्याही कृतीविना श्वास वहात आहे असे आढळून येई.त्यालाच त्यांनी राम हमारा जप करे हम बैठे आराम असे म्हटलेले असावे. 

दोन्ही नाकपुड्यातून म्हणजे इडा व पिंगळा यातून श्वास वहात असतो अशा व्यक्तीला योगी किंवा साधू म्हणता येईल.   

कबीर सदैव स्वस्थ चित्त असत.दोन्ही नाकपुड्यातून समान श्वास वहात असे.म्हणजेच तो सुषुम्ना नाडीतून जात असे. 

असा या वचनाचा एक अर्थ घेता येईल.

इथे मला एक आठवण सांगावीशी वाटते.माझ्या वडिलांचे मामा, पूर्वाश्रमींचे वैद्य व संजीवनी उपचारपद्धतीचे संशोधक,यशवंत काशिनाथ परांजपे व संन्यास आश्रमातील "संविदानंद सरस्वती" त्यांनी पुढे जिवंत समाधी घेतली. त्यांनी संन्यास घेतल्यावर एका थोर व्यक्तीने   विचारले, साधू कसा ओळखावा?त्यावर त्यांनी पुढील उत्तर दिले,"ज्याच्या दोन्ही नाकपुड्यातून समान श्वास वहात असतो त्याला साधू म्हणावे"    

२)जे भक्तिरसात न्हाऊन निघतात उदाहरणार्थ तुकाराम वगैरे संत मंडळी.त्यांच्या अंतर्यामी सतत त्यांच्या इष्ट देवतेचा जप होत असतो.ते स्वतः जप करीत नाहीत. तो आपोआप होत असतो.जेव्हां ते स्वस्थ चित्त असतात तेव्हां त्याना   त्याची जाणीव होत असते.कदाचित त्याना इतर कर्मे करीत असतानासुद्धा नेहमीच त्याची जाणीव होत असावी.याला उद्देशून "राम हमारा जप करे हम बैठे आराम" असे म्हणता येईल.

३)जे कोणत्याही देवतेचा जप करीत नाहीत.परंतु नेहमी स्वस्थ चित्त असतात तेव्हां त्यांना अंतर्यामी सतत कांहीतरी जाणवत असावे.त्याला उद्देशून राम हमारा जप करे हम बैठे आराम असे म्हणता येईल. 

४)कांहीजण नेहमी स्वस्थ चित्त नसतील परंतु जेव्हां ते स्वस्थ चित्त असतील, त्यावेळी त्यांना अंतर्यामी   चाललेल्या जपाची जाणीव होत असेल.त्यालाही त्यावेळी राम हमारा जप करे हम बैठे आराम असे म्हणता येईल.   

इथे मला माझ्या वडिलांची एक आठवण सांगावीशी वाटते.त्यांनी बोलता बोलता एक गोष्ट मला सांगितली.जर आपण प्रामाणिकपणे मन लावून भक्तिभावाने जप करीत असू तर तो जप, तो मंत्र, शरीरात भिनत जातो.रात्री तुम्ही झोपलेले असताना जेव्हा जागृत होता.तेव्हा जर प्रथम तुम्हाला तुमच्या मंत्राचा ध्वनी जाणवत असेल.नंतर जागृतीची जाणीव होत असेल तर रात्रभर झोपेतही तुमचा जप चालू होता.प्रत्यक्षात अशी स्थिती आली पाहिजे.आली पाहिजे म्हणून कांही ती येत नाही.जेव्हां यायची तेव्हा ती आपोआप येईल.

इथे मला संत चोखामेळा   यांची कथा आठवते.असे म्हणतात कि मोठी दरड  कोसळून त्याच्या खाली बऱ्याच जणांचा मृत्यू झाला. खूप दिवसानी दरड बाजूला करण्यात आली.सर्व मृत व्यक्तीची फक्त हाडे मिळाली.संत चोखामेळा यांची हाडे कोणती असा प्रश्न निर्माण झाला.संत नामदेवांनी क्षणात तो प्रश्न सोडविला.प्रत्येक हाड ते कानाजवळ धरत.ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ते हाड बाजूला ठेवीत.अशा प्रकारे हाडाच्या ढिगाऱ्यातून त्यांनी सावता माळी   यांची हाडे बाजूला काढली.त्यांची समाधी बांधण्यात आली.पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर, नामदेवांच्या पायरी शेजारी, चोखोबांची समाधी आहे.

मंत्र, भक्ती,हाडा मांसात मुरली पाहिजे असा याचा अर्थ.उत्कट भक्ती असेल तर आपोआप तसे होते.उत्कट भक्ती ही आपोआपच येते किंवा येत नाही.ये म्हणून कांही येत नाही आणि जा म्हणून कांही जात नाही.असेल त्या परिस्थितीचा आपोआप स्वीकार,यालाच अनाग्रहयोग असे म्हणतात. 

हा लेख आणखी एक वैयक्तिक आठवण सांगून पूर्ण करतो.

माझ्या वडिलांचे,साने नावाचे एक शिक्षक परम मित्र होते.वडील अनुग्रहासाठी पूज्य सद्गुरू बाबा महाराज यांच्याकडे गेलेले असताना त्यांच्याबरोबर सानेही होते.बाबा महाराज यांनी मी एकालाच अनुग्रह देईन असे सांगितले.भाऊ(माझे वडील)व साने यांची मैत्री इतकी दाट होती कि निरिच्छपणे भाऊ म्हणाले, साने तू अनुग्रह घे.तीर्थरूप भाऊना,माझ्या वडिलांना,अनुग्रह मिळावा असे तीर्थस्वरूप अप्पा म्हणजेच स्वामी स्वरूपानंद यांना उत्कटतेने वाटत होते.तेच या दोघांना घेऊन पुण्याला गेले होते.शेवटी साने म्हणाले,पटवर्धन तू अनुग्रह घे.मी रामनामाचा जप करतो तो मला पुरेसा आहे.अशाप्रकारे तीर्थरूप भाऊंनी पूज्य बाबा महाराजांकडून अनुग्रह घेतला.स्वामी स्वरूपानंद व माझे वडील हे गुरूबंधू होत.

पूज्य बाबा महाराज पुण्याला राहात असत.पुण्याहून परत येताना साने जिथे शिक्षक होते त्या गावी साने मोटारीतून उतरले.तीर्थरूप भाऊ पुढे  रत्नागिरीला आले.साने हे अल्पायुषी होते.त्यांचा पुढे मृत्यू झाला.त्यानंतर वर्षभराने माझा जन्म झाला.

मी चार पाच वर्षांचा असताना भाऊंनी कोणत्यातरी संदर्भात मला "श्रीराम जय राम जयजय राम" हा मंत्र सांगितला.मी त्या लहान वयात त्या मंत्राने इतका भारावलो गेलो की जपमाळ घेऊन पाटावर मांडी घालून जप करीत बसलो.माझे ते वेड कांही दिवस टिकले.त्यावेळी भाऊ(माझे वडील)  म्हणाले अरे हा तर साने! पुढे मी ते सर्व विसरलो.पुढील आयुष्यात कधीकधी रात्री झोपताना मला तो मंत्र ऐकू येतो.तो मंत्र अंतरंगात चाललेला असतो.झोपेतून जागृती येताना मात्र अगोदर मंत्र व नंतर जागृती असे कधीही झाले नाही.

२८/९/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel