चौथी पर्यंतचे शिक्षण डोरले* या गावी जिथे माझे वडील शिक्षक होते तेथे झाले.

पाचवी ते सातवी पर्यंतचे शिक्षण मामाने*** मला शिकवून, बाहेरून व्हर्नाक्युलर फायनल  परीक्षेला बसविले***. आर्थिक बिकट परिस्थितीमुळे व डोर्ले येथे चौथीच्या पुढील शिक्षणाची सोय  नसल्यामुळे मी बाहेरून व्हर्नाक्युलर  परीक्षेला बसलो. कारण मराठी शाळेत शिक्षक होण्यासाठी ती परीक्षा  उत्तीर्ण होणे आवश्यक होते. त्यावेळी मी अकरा वर्षांचा होतो. शिक्षक म्हणून नोकरी लागण्यासाठी पाच सात वर्षे अजून अवधी होता. मामाने माझ्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. आम्ही रत्नागिरी येथे पुढील शिक्षणासाठी दाखल झालो.

प्राथमिक शाळेवरील शिक्षकाची नोकरी सोडून त्याने रत्नागिरी येथे एका बुकडेपोमध्ये नोकरी धरली. त्याच सुमारास माझ्या मामेकाकानी वैद्य म्हणून दवाखाना रत्नागिरीला सुरू केला होता. भाऊ (वडील )आजारीच होते. मामा व काका माझा आर्थिक भार घेण्याला तयार होते. परंतु भाऊना शक्यतो त्यांच्यावर भार पडू नये असे वाटत होते. कारण त्यांचेही उत्पन्न मर्यादित होते (काकानी  नुकताच दवाखाना सुरू केला होता).

मुख्य आर्थिक भार जेवण या विषयाचा होता. त्या काळी गरीब मुले जेवणाचा प्रश्न दोन प्रकारे सोडवीत. माधुकरी मागून किंवा वारावर जेवून. माधुकरी म्हणजे, ब्राह्मण मुले सकाळी सोवळे किंवा पंचा नेसून, झोळी घेऊन, त्यात दोन भांडी घेत(एखादा पातळ पदार्थांसाठी दोन भांडीही घेत असे).  एकामध्ये कोरडे पदार्थ व दुसऱ्यांमध्ये पातळ पदार्थ. ब्राम्हणांच्या घरोघरी जाऊन “ॐ भवति भिक्षांदेही” असा मंत्र म्हणत. घरातील बाई काही असले तर देई किंवा पुढे जा असे सांगे. अश्या प्रकारे कोरडे व पातळ पदार्थ गोळा करून, जिथे आसऱ्याला असतील तिथे जावून, झोळीतील अन्न खात असत. सर्व कोरडे व सर्व पातळ पदार्थ एकत्र होऊन दोन वेगळ्या चवीची मिश्रणे तयार होत. जी गृहिणी अन्न पदार्थ घेऊन वाढण्यासाठी येई तिला हे हवे किंवा हे नको असे सांगता येत नसे. त्यातील  कोरडे पदार्थ संध्याकाळसाठी ठेवले जात. मुले नंतर शाळेत जात. अश्या प्रकारे कष्टात आपले शिक्षण पुर्ण करीत असत. ज्यांना काहीच आधार नसे अशी मुले माधुकरी मागून शिक्षण घेत. पुस्तके फी यांची काहीना काही व्यवस्था करावी लागे. त्या काळात सर्व शहरात अशी मुले माधुकरी मागताना सकाळी आढळत.

दुसरा प्रकार म्हणजे वारावर जेवण होय यामध्ये सात दिवस सात जणांकडे जेवावयाला जावयाचे असे. ओळखीतील होतकरू गरीब मुलाला सधन व्यक्ती वार देत. काही वेळा सकाळी एकाकडे व संध्याकाळी दुसऱ्यांकडे असा प्रकार असे. मामा व काकानी ओळखीतील लोकांकडे माझे वार लावून दिले. जेवण्यासाठी थांबावे लागणे, उपकाराच्या ओझ्याखाली आश्रितासारखे वाटणे, काही ठिकाणी सोवळे नेसून बसावे लागणे, एखाद्या ठिकाणी वारावर जेवायला मुलगा येणार आहे हे विसरून जाणे, उशिरा जेवण मिळाल्यामुळे शाळेत जाण्याला उशीर होणे, असे अनेक प्रकार संभवत. मी ज्यांच्याकडे जात असे ती मंडळी एकंदरीत सज्जन व प्रेमळ होती. मलाच मानसिकरित्या आँकवर्ड वाटे. अश्या प्रकारे माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली. 

त्या काळी मराठी चौथीनंतर मिडल स्कूल व नंतर हायस्कूलमध्ये प्रवेश मिळे. अकरावी नंतर बोर्डाची परीक्षा असे. पाचवीपासून इंग्रजी विषय असे.जी मुले मराठीत  सातवी होउन  इंग्रजी शाळेत जात त्यांना इंग्रजीसाठी वेगळा वर्ग असे. त्याला स्पेशल क्लास म्हणत. त्यामध्ये पाचवी ते सातवी यातील इंग्रजी एका वर्षात शिकवले जाई. फाटक हायस्कूलमध्ये स्पेशल क्लासमध्ये मी दाखल झालो. या वर्गाची परीक्षा झाल्यावर मुलाला आठवीमध्ये बसविले जाई. अशा प्रकारे मराठी सातवी पास होऊन इंग्लिश शाळेत आलेल्या मुलाला एक वर्ष जास्त लागत असे. मामा रत्नागिरीला दीर्घ काळ राहणार नव्हता. मी शहरात बुजेन म्हणून तो रत्नागिरीला येऊन राहिला होता. रत्नागिरीला रुळल्यानंतर, सहा महिन्यांनंतर, मी काकांकडे दाखल झालो .


Ref: *(माझे डोर्ले) **(माझा शाळेतील पहिला दिवस)*** (माझे आजोळ)

११/६/२०१८ ©प्रभाकर पटवर्धन 
pvpdada@gmail.com
(लेखक अर्थशास्त्राचे प्राध्यापक  होते)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel