युद्धाचा अठरावा दिवस उजाडला होता. राजा दुर्योधनाने शल्याला सेनापती केले. शल्य निकराने लढू लागला. भीमाने त्याला जबर जखमी केले आणि नंतर युधिष्ठिरांनी त्याचा नाश केला.
मग शकुनी पुढे आला. सहदेवने शकुनीचा वध केला. कौरव सैन्यात आता कोणीही प्रबळ योद्धा उरला नव्हता. दुर्योधन निराश होऊन एका खोल तलावामध्ये पाण्याखाली गुप्तपणे जाऊन बसला. त्याला जलस्तंभन विद्या अवगत होती. म्हणून तो नाकातोंडातून पाणी जाऊन गुदमरला नाही.
पांडवांना कालांतराने त्याचा शोध लागला. ते तेथे पोहोचले. भीमसेनाने दुर्योधनाला युद्धाचे आव्हान दिले. त्या दोघांचे गदायुद्ध जमले. भीमाने गदायुद्धाचा नियम मोडून दुर्योधनाच्या डाव्या मांडीवर घाव घातला आणि दुर्योधन त्या घावाने निपचित पडला. युद्ध थांबले. सगळे पांडव शिबिराकडे गेले.
अश्वत्थाम्याला ही दुर्योधनाच्या पराभवाची वार्ता कळली आणि तो मांडी मोडून पडलेल्या दुर्योधन राजाकडे गेला. अश्वत्थाम्याने शपथ घेतली की, सैन्य जरी नष्ट झालेले असले, तरी मी सर्व पांडवांचा निःपात करीन. तेव्हा मरणोन्मुख दुर्योधनाने त्याची सेनापती म्हणून नेमणूक केली.