भीष्मांचे पतन झाल्यावर राजा दुर्योधनाने आचार्य द्रोण यांना सेनापतिपदाचा अभिषेक केला. तुझी इच्छा काय ते सांग, अशी पृच्छा द्रोणांनी दुर्योधनास करताच दुर्योधन म्हणाला, युधिष्ठिराला जिवंत पकडून माझ्या स्वाधीन करावे. द्रोणांनी लगेच उत्तर दिले की, अर्जुन रणांगणात नसेल, तर मी युधिष्ठिराला पकडीन. हा संवाद पांडवांना समजला.

युधिष्ठिर पकडले जाणार नाहीत अशी काळजी अर्जुनाने घेतली. अर्जुनपुत्र अभिमन्यूने शल्य आणि जयद्रथ यांना जर्जर केले. अर्जुनाला मुख्य रणभूमीवरून दूर नेण्याचे काम त्रिगर्ताचा राजा सुशर्मा आणि त्यांचे बंधू संशप्तक यांनी केले. अर्जुनाला रणभूमीवर फार दूर नेऊन लढवीत ठेवले.

इकडे द्रोणांनी युधिष्ठिरांकडे मोर्चा वळवला; पण त्यांना पकडणे द्रोणांना शक्य झाले नाही. नंतर द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची उभारणी केली. तो व्यूह कोण फोडील याची युधिष्ठिरांना चिंता पडली. अभिमन्यू पुढे आला. त्याने व्यूह भेदायचा आणि पाठीमागून भीमादिकांनी आत घुसायचे असा बेत ठरला. अभिमन्यू व्यूहात शिरला. व्यूह भेदत वेगाने पुढे सरकला.

इकडे व्यूहाच्या द्वारावर जयद्रथ लढत उभा राहिला; त्यामुळे भीमादिक आत शिरू शकले नाहीत. चक्रव्यूहात द्रोण, कर्ण, अश्वथामा, कृपाचार्य आदी लढवय्ये अभिमन्यूवर तुटून पडले. त्याची शस्त्रे मोडण्यात आली. अखेरीस दुःशासन-पुत्राचा व एकट्या अभिमन्यूचा संग्राम झाला; अभिमन्यू मूर्च्छित झाला असताना दुःशासनपुत्राने गदाघात करून त्याला ठार मारले.



ही वार्ता पांडवसैन्याला मिळाल्याबरोबर सगळे असह्य दुःखाने व्यथित झाले. शिबिरावर अवकळा पसरली. अर्जुन संशप्तकांचा निःपात करून परत आला. तेव्हा अभिमन्यूच्या पतनाची वार्ता युधिष्ठिरांनी हुंदके देत सांगितली. अभिमन्यू एकाकी लढला आणि वीरगतीला गेला, ह्याचा अर्जुनाच्या मनाला तीव्र धक्का बसला. व्यूहाचे द्वार जयद्रथाने अडवून धरल्यामुळेच ही दुर्घटना घडली होता. म्हणून अर्जुनाने प्रतिज्ञा केली की, उद्या सूर्यास्ताच्या आत जयद्रथाला यमसदनास पाठवीन; तसे न जमल्यास अग्निकाष्ठ भक्षण करून स्वतःची समाप्ती करून घेईन.

ही वार्ता कौरव शिबिरात पसरली. जयद्रथ रणभूमी सोडून पलायन करू लागला, तेव्हा कौरवांनी त्याचे रक्षण करण्याची हमी घेतली. दुसऱ्या दिवशी दिवसभर घनघोर युद्ध झाले.सूर्यास्त जवळ आला, तरी अर्जुन जयद्रथाचा वध करू शकला नव्हता. तथापि एकाएकी अंधार झाला. सूर्यास्ताचा हा आभास कृष्णाने निर्माण केला होता. आपण सुटलो, असे वाटून जयद्रथ बेफिकीर झाला आणि कृष्णाने सूर्यास्त झालेला नसल्याचे अर्जुनाला दाखवून दिले. अर्जुनाने त्वरित जयद्रथाचे शिर उडविले.

त्याच दिवशी रात्री मशाली पेटवून युद्ध सुरू राहिले. भीमपुत्र घटोत्कचाने पांडवांच्या बाजूने पराक्रमाची शर्थ केली. कर्णापाशी वासवी शक्ती होती. ती दुर्योधनाच्या आग्रहामुळे घटोत्कचावर कर्णाला सोडावी लागली. घटोत्कच संपला. द्रोणांच्या सेनापतित्वाखाली युद्ध अधिकच भडकले. त्यांनी आपल्या अस्त्रांनी इतका सेनासंहार केला की, पांडव आणि श्रीकृष्ण चिंताग्रस्त झाले.

श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून भीमाने अश्वत्थामानामक हत्ती गदेने ठार केला आणि अश्वत्थामा मेला अशी आरोळी ठोकली. द्रोणाचार्यांचे पुत्रप्रेम अगाध होते. त्यांना वाटले, आपला पुत्र अश्वत्थामाच मारला गेला. त्यामुळे त्यांचे धैर्य खचले.

त्यांनी युधिष्ठिरांना विचारले, की अश्वत्थामा म्हणजे कोणयुधिष्ठिरांनी नरो वा कुंजतो वा अशी बतावणी करून आपल्या कानावर हात ठेवले. द्रोणांनी शस्त्र खाली ठेवून रथातच ते ध्यानस्थ झाले. धृष्टद्युग्माने तशा स्थितीतच द्रोणांचा वध केला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel