स्वजनांचा आणि जगातील मानवकुलांचा एवढा मोठा संहार होण्यास आपण कारण झालो, असे युधिष्ठिरांना वाटत होते. त्यांचे मन पूर्ण वैतागले आणि वनात जाऊन कायम तपश्चर्या करीत जीवन संपवावे असा आपला उद्देश त्यांनी सर्व बंधूंना आणि मित्रांना सांगितला.
कृष्ण आणि चारही पांडव बंधू युधिष्ठिरांना राज्याची सूत्रे हाती घेण्याकरता विनंती करीत होते; परंतु त्यानी वानप्रस्थाचा आपला निश्चय सोडला नाही. शेवटी व्यास आले आणि त्यांनी आदेश दिला, की या अपरंपार हत्येचे प्रायश्चित म्हणजे अश्वमेध होय. वानप्रस्त स्वीकारण्याची पापक्षालनार्थ आवश्यकता नाही. अश्वमेघ पार पाडा आणि राज्याची धुरा वहा.
या आदेशाप्रमाणे त्या महायज्ञाची सर्व तयारी केली. अश्वमेघाचा अश्व एक वर्षभर देशोदेशा फिरवून आणायचा असतो. तो अश्व फिरवत असताना जर कोणी शूराने कायम पकडून ठेवला, तर अश्वमेघ होऊ शकत नाही. म्हणून त्या अश्वाच्या रक्षणार्थ अर्जुनाची निवड झाली.
तो अश्व देशोदेशी विजयासाठी फिरला आणि अर्जुन त्याच्या पाठीमागून जात राहिला. अनेक राष्ट्रांचे आणि जमातींचे शूर वीर आडवे आले असताना त्या सगळ्यांचा पराभव करून आणि त्यांना अश्वमेघाचे निमंत्रण देऊन अर्जुन यशस्वी रीतीने हस्तिनापुराला परतला.
या यात्रेत फारसा रक्तपात झाला नाही. अश्वमेघ यज्ञ पूर्ण झाला. निमंत्रित शूर वीर क्षत्रीयांचे आणि राजांचे सत्कार झाले. पुरोहितांना मोठमोठ्या सुवर्णदक्षिणा मिळाल्या. युधिष्ठिरांनी मोठा धार्मिक राजा या नात्याने राज्याचा भार उचलला.