खांडववनात जीवदान मिळालेल्या मयासुराने कृतज्ञबुद्धीने पांडवांना एक विशाल व भव्य सभा निर्माण करून दिली. ह्या सभेत अनेक चमत्कृती निर्माण केल्या. पाण्याच्या जागी भूमीचा आभास आणि भूमीच्या जागी पाण्याचा भास दिसावा; अशा या अद्भुत सभेत युधिष्ठिर धर्मराज सिंहासनावर विराजमान झाले. तेव्हा येथे आलेल्या नारदमुनींच्या उपदेशानुसार युधिष्ठिरांना राजसूय यज्ञ करण्याची इच्छा झाली. युधिष्ठिरांनी श्रीकृष्णाचा सल्ला घेतला. श्रीकृष्णाने सांगितले की, मगध देशाचा अधिरती जरासंघ अत्यंत प्रबल झाला आहे. त्याला जिंकल्याशिवाय राजसूय यज्ञ करता येणार नाही. जरासंघाच्या गिरिव्रज या राजधानीत ब्राह्मण वेश धारण करून कृष्ण व अर्जुन गेले आणि जरासंघापुढे प्रकट झाले. भीमसेनही बरोबर होता. जरासंघाने कृष्ण व अर्जुन यांना वगळून भीमाशीच युद्ध करणे पसंत केले. जोराचे गदायुद्ध झाले; त्यात दोघेही अत्यंत थकले. शेवटी भीमाच्या हातून त्याला मरण आले.
नंतर युधिष्ठिरांशिवाय चारी पांडव वेगवेगळे चार दिशांना दिग्विजयार्थ गेले व त्यांनी विपुल धनसंपत्ती इंद्रप्रस्थात आणली. नंतर राजसूय यज्ञ पार पडला. यज्ञाच्या अखेरीस अग्रपूजा कोणाची करायची, असा प्रश्न पडला. भीष्मांनी श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान द्यावा, असे सुचविले. राजा शिशुपालाने ते अमान्य केले व श्रीकृष्णाची निर्भर्त्सना केली; त्यामुळे श्रीकृष्णाने शिशुपालाचे मस्तक सुदर्शन चक्राने उडविले. यज्ञसमाप्तीनंतर दुर्योधनाने ती अपूर्व मयसभा हिंडून पाहिली. त्यातील भूलभुलैयात तो फसला. पांडव त्याला हसले. अपमानाने जळजळत तो स्वतःच्या राजधानीस, हस्तिनापुरास, परतला.
युद्धार्थ किंवा द्युतार्थ कोणी आव्हान दिले, तर ते आव्हान स्वीकारणे हा क्षत्रियाचा धर्म म्हणून त्या काळी ठरला होता. कौरवांचा मातुल शकुनी याने कौरवांना पांडवांचे ऐश्वर्य हरण करण्याकरता द्यूताचा मार्ग सुचविला. तो दुर्योधनादी कौरवांना पटला. त्याप्रमाणे सर्व पांडवांना व विशेषतः धर्मराजांना आव्हान दिले. शकुनी द्युतातील कपटामध्ये पटाईत होता. पांडव व धर्मराज त्या द्युतात सर्वस्व हरवून बसले. सर्वस्वामध्ये द्रौपदीचाही समावेश होतो. दुःशासनाने भर सभेत तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीकृष्णाने तिला अगणित वस्त्रे पुरविण्याचा चमत्कार केला व तिचे लज्जा रक्षण केले. धृतराष्ट्राला हे सर्व प्रकरण पाहून भीती वाटली आणि द्रौपदीला वर दिला की, तुझे पती दास्यमुक्त होतील व त्यांची शस्त्रे त्यांना परत मिळतील. त्याचप्रमाणे त्यांचे राज्यही त्यांना परत मिळेल.
ही सर्व घटना पाहून कौरवांना आपला सर्व डाव फसला हे लक्षात आले आणि पांडवांना द्युतार्थ पुन्हा आव्हान दिले. त्याकरता राजा धृतराष्ट्राची संमती मिळविली. पुत्रमोहाला वश होऊन धृतराष्ट्राने संमती दिली. एकच डाव खेळायचा आणि त्यात जो पराभूत होईल त्याने १२ वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास स्वीकारायचा, अज्ञातवासाचा अवधी पूर्ण होण्याच्या अगोदर उघडकीस आल्यास पुनः १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवास पतकरावा; असा पण दोन्ही बाजूंनी मान्य केला. अशा अटीवर पुन्हा तो डाव मांडला. युधिष्ठिर प्रख्यात द्युतपटू असूनही हरले; कारण शकुनीचे द्युतातले कपट.