कुरूवंशीय सम्राट शंतनु याच्या क्रमाने झालेल्या दोन विवाहांपासून ही वीरकथा सुरू होते. शंतनूची पहिली पत्नी गंगा होय. ही गंगा म्हणजे मावनशरीरिणी गंगा नदी. त्याला तिच्या पोटी आठ पुत्र उत्पन्न झाले. त्यांपैकी पहिले सात तिने गंगेत बुडवून टाकले. आठवा जन्मल्याबरोबर ती त्याला बुडवायला निघाली, तेव्हा शंतनूने प्रतिबंध केला; तेव्हा त्याला घेऊन ती निघून गेली. त्याचे नाव देवव्रत. पुढे तोच भीष्म या नावाने प्रसिद्धीस आला. गंगा निघून गेल्यावर काही वर्षांनी देवव्रत गंगेने परत दिला.


नंतर एका धीवराच्या म्हणजे कोळ्याच्या मुलीशी शंतनूने लग्न केले. तिचे नाव सत्यवती. त्या धीवराने शंतनूला एका अटीवर आपली कन्या सत्यवती दिली. ती अट म्हणजे सत्यवतीच्या पुत्रालाच राजपद मिळाले पाहिजे. ह्या अटीला देवव्रताने पितृभक्तीमुळे अनुमती दिली आणि मी ज्येष्ठ पुत्र असूनदेखील राजपद घेणार नाही आणि जन्मभर ब्रम्हचारी, अविवाहित राहीन अशी कठोर, भयानक प्रतिज्ञा केली व पाळली. त्यामुळे त्याला भयानकया अर्थी  भीष्महे नाव प्राप्त झाले.

ती धीवरकन्या सत्यवती या लग्नापूर्वी कुमारी असूनदेखील माता झाली होती. ती नौका चालवित होती. पराशर मुनींची व तिची नौकेत गाठ पडली. दोघांचे प्रेम जमले. तिला पराशर मुनींपासून कृष्णद्वैपायन व्यास हा पुत्र यमुनेच्या एका बेटावर झाला. तो यमुनेच्या त्या बेटावर वाढला. हाच महाभारतकार व्यास होय.

नंतर सत्यवती शंतनूची पत्नी झाली. तिच्यापासून शंतनूला चित्रांगद व विचित्रवीर्य हे पुत्र झाले. चित्रांगद लहानपणीच एका गंधर्वाने मारला. विचित्रवीर्य हा पुत्र निपुत्रिकच निवर्तला. त्यामुळे सत्यवतीने आपला कानीन पुत्र जो कृष्णद्वैपायन व्यास त्याच्या द्वारे आपल्या सुनांच्या-म्हणजे अंबिका व अंबालिका ह्या विचित्रविर्याच्या दोन विधवा पत्नींच्याठिकाणी नियोगविधीने  अनुक्रमे धृतराष्ट्र आणि पांडु हे दोन पुत्र निर्माण केले.

धृतराष्ट्र अंध आणि पांडु हा फिका जन्मला. विचित्रवीर्याच्या दासीपासून कृष्णद्वैपायनाने विदुर ह्या प्रज्ञावान पुत्राला जन्म दिला. धृतराष्ट्राचे शंभर पुत्र कोरव आणि पांडूचे पाच पांडव यांच्यामध्ये बालपणापासूनच जो विग्रह सुरू झाला, या विग्रहाची अखेर परिणती मोठ्या व्यापक संग्रामामध्ये झाली.

या संग्रामात देशोदेशीचे राजे, राजपुत्र, कौरव-पांडवांचे संबंधी बांधव एकेक पक्ष घेऊन सामील झाले. १८ दिवस कुरूक्षेत्राच्या रणांगणात तुमुल संग्राम झाला. असंख्य मानवांचा संहार झाला, कुरूवंशाचा निःपाप झाला; एकच धागा म्हणजे अर्जुनपुत्र अभिमन्यूपासून उत्तरेला राहिलेला गर्भ तिच्या उदरात शिल्लक राहिला. तो जन्मल्यानंतर परिक्षित म्हणून विख्यात झाला. सगळे पांडव आणि कौरव मरून स्वर्गस्थ झाले.

असे हे संक्षिप्त भारत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel