द्रोणाचार्यांनंतर राजा दुर्योधनाने कर्णाला सेनापतिपदाचा अभिषेक केला. कर्णाने म्हटले की, राजा शल्य याने माझे सारथ्य केले तर मी माझा पराक्रम दाखवीन. सूतपुत्राचे सारथ्य करणे, हा क्षत्रिय शल्याला आपला अपमान वाटत होता; पण मला योग्य वाटेल ते मी बोलेन आणि ते बोलणे कर्ण सहन करील तर मी कर्णाचा सारथ्य करीन, या अटीवर शल्य सारथ्यास तयार झाला.
रणांगणावर अर्जुनाचा रथ कोठे दिसेना, तेव्हा कर्ण आत्मप्रौढीची भाषा बोलू लागला. ही संधी साधून शल्याने कर्णाचा तेजोभंग होईल अशी भाषा वापरली. घोषयात्रेच्या प्रसंगी तू दुर्योधनाला सोडून पळ काढला होतास अशी आठवण कर्णाला करून दिली. कर्णाची आणि अर्जुनाची रणांगणावर गाठ पडली.
अर्जुनाने कर्णपुत्र वृषसेन याचा आधी वध केला. अगोदरच कर्णाचा तेजोभंग झाला होता आणि नंतर पुत्रशोकाची पाळी आली. या आपत्तीत त्याच्या रथाचे चाकही भूमीत रूतून बसले. कर्ण रूतलेले चाक काढण्यासाठी रथातून उतरला आणि त्याचे दोन्ही हात रथचक्र उद्धरण्यात गुंतले.
अशा स्थितीत कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने निःशस्त्र कर्णाचा वध केला. अर्जुनाकडून कर्णवध होण्यापूर्वी भीमाने दुःशासनाला ठार करून, त्याने केलेल्या पांचालीच्या विटंबनेचा सूड घेतला होता. दुःशासनाचे रक्तही भीम प्याला.