कुरूक्षेत्रावर समोरासमोर सेनापतींसह सैन्यदले उभी राहिली, रणवाद्ये गर्जू लागली. युधिष्ठिरांना पुढे करून चारही पांडव सरळ कौरव सैन्याकडे चालू लागले. भीष्म पितामहांची भेट घेतली. वंदन करून आशीर्वाद मागितला. भीष्म म्हणाले, युधिष्ठिरा, तुझा पक्ष सत्याचा आहे. सत्याचाच विजय होतो. पांडव आपल्या सैन्यकक्षेत परतले. रणदुंदुभी गर्जत होत्या. गगनभेदी शंखध्वनी होत होता.
दोन्ही बाजूंना गुरूजन व आप्तस्वजन पाहून अर्जुनाच्या लक्षात आले की, सर्वांचा महान संहार होणार आहे; कुलीनांच्या स्त्रिया अनाथ होणार आहेत; करूणेने विषण्ण होऊन युद्ध करण्याचे कर्तव्य पार पाडावे की नाही याबद्दल मन संशयग्रस्त झाले. ही गोष्ट आपला सारथी भगवान श्रीकृष्ण याला त्याने मन मोकळे करून सांगितली. क्षत्रिय धर्म आचरावा, लढावे, की दयाधर्माने वागावे, निवृत्त व्हावे ह्या पेचात त्याचा आत्मा सापडला होता. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेचा उपदेश करून त्याचा व्यामोह निरस्त केला व त्याला युद्धाला प्रवृत्त केले.
युद्धाच्या पहिल्या सात दिवसांत रणांगणात दुर्योधनाच्या सैन्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भीष्म सेनापती होते. दुर्योधनाने त्यांची निर्भर्त्सना केली. त्यामुळे भीष्मांनी फार मोठा पराक्रम आरंभिला. युद्धाला भरती आली. पांडव सैन्याची दाणादाण उडाली.
या धुमश्चक्रीत भीष्म आणि अर्जुन हे समोरासमोर आले; परंतु अर्जुनाला रणावेशच चढेना. कृष्णाला आपली प्रतिज्ञा-युद्धात मी शस्त्र धरणार नाही ही-मोडण्याची पाळी आली. हे पाहून अर्जुनाने पराक्रम दाखविण्यास सुरूवात केली.
युद्धाचा दहावा दिवस उजाडला. त्या दिवशी महारथी शिखंडी भीष्मामुढे उभा राहिला. शिखंडीच्या मागे उभे राहून भीष्मांवर अर्जुनाने बाणांचा मारा सुरू केला. भीष्मांची अशी प्रतिज्ञा होती , की स्त्रीशी लढायचे नाही. शिखंडी हा मूळचा स्त्री; नंतर पुरूष झाला. म्हणून भीष्मांनी प्रतिकारच केला नाही.अर्जुनाच्या बाणांनी सर्वांग विद्ध झाले. शरीर रथातून भूमी वर कोसळले, ते बाणांवरच तरंगते राहिले. फक्त शिर तेवढे अधांतरी राहिले, अर्जुनाने बाणांचा त्रिकोण भूमीमध्येच रोवून भीष्मांच्या मस्तकाला आधार दिला. भीष्म शरपंजरी पडले तेव्हा दक्षिणायन होते. भीष्मांना त्यांच्या पित्याचा वर होता की, तू इच्छामरणी होशील. त्यामुळे भीष्म हे उत्तरायण लागेपर्यंत प्राण धारण करून राहिले.