हा भारत संग्राम केव्हा घडून आला याच्याबद्दल निर्विवाद निर्णय करण्याइतपत पुरावा अजून मिळालेला नाही. हल्ली रूढ असलेल्या हिंदूंच्या पौराणीक युगगणनेच्या पारंपारिक पद्धतीप्रमाणे कलियुगाच्या प्रारंभी भारत संग्राम घडून आला, असे चिंतामण विनायक वैद्य इत्यादी विद्वानांचे मत आहे; कलियुग हे इ. स. पूर्व ३१०१ या वर्षी लागले म्हणून तोच भारत−युद्धाचा काळ ते ठरवितात. काही अन्य संशोधक आपापल्या कल्पनेप्रमाणे इ. स. पू. बाराव्या शतकापासून नवव्या शतकाच्या कालावधीत निरनिराळ्या कालविभागांत भारतीय युद्ध झाले. असे मानतात. नागपूरचे डॉ. के. ल. दप्तरी हे महाभारतातील युद्धकाल निर्णय या निबंधात इ. स. पू. ११९७ (शकपूर्व १२७५.३) हे साल भारतीय युद्धाचा काल ठरवतात. इ. स. पू. पाचवे शतक हा साधारणपणे पाणिनीचा काळ धरतात. पाणिनीच्या वेळी महाभारत ही संज्ञा रूढ झाली होती. सध्याचे लक्ष श्लोकात्मक महाभारत इ. स. च्या पहिल्या शतकात बहुतेक असावे असे त्या वेळच्या एका ग्रीक प्रवाशाच्या नोंदीवरून मानता येते. हा लक्ष श्लोकात्मक ग्रंथ गुप्तकाली म्हणजे इ. स. पाचव्या शतकात उपलब्ध होता, याबद्दल मात्र शंका राहत नाही.