मृत्यूचे काव्य

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत ! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ !

मृत्यू हे ईश्वराचेच एक स्वरूप. जीवन व मरण दोन्ही परम मंगल भाव. जीवन व मरण वस्तुत: एकरूपच आहेत. निशेतूनच शेवटी उषा प्रकट होते व उषेतून पुन्हा निशा निर्माण होते. जीवनाला मरणाचे फळ येते व मरणाला जीवनाचे फळ येते.

गीतेने मरण म्हणजे वस्त्र फेकणे, असे म्हटले आहे. काम करता करता हे वस्त्र जीर्ण झाले, फाटले. ती त्रिभुवनमाउली नवीन वस्त्रे देण्यासाठी आपणांस बोलाविते. आपणांस ती उचलून घेते. पुन्हा नवीन आंगडे-टोपडे लेववून या जगाच्या अंगणात खेळावयास आपणांस ती ठेवते व दुरून गंमत बघते. कधी कधी जीव जन्मला नाही, तोच जातो. कोणी बालपणी मरतो, कोणी तरुणपणी. आई अंगरखा देऊन पाठवते. परंतु जगात पाठवले नाही तोच तिला दुरून तो अंगरखा चांगला वाटत नाही. पटकन ती बाळाला मागे नेते व नवीन अंगरखा घालते. आईच्या हौसेला मोल नाही.

माझी माता काही भिकारी नाही. अनंत स्त्रियांनी तिचे भांडार भरलेले आहे. परंतु मातेचे भांडार भरलेले आहे म्हणून दिलेले कपडे मी वाटेल तसे फाडून टाकता कामा नयेत, शक्य तो काळजीपूर्वक हा कपडा वापरला पाहिजे. तो स्वच्छ, पवित्र राखला पाहिजे आणि सेवा करता करता तो फाटला पाहिजे.

देह म्हणजे मडके. कोणी मेला तर आपण त्याच्यापुढे मडके धरतो. हे मडके होते, फुटले. त्यात रडण्यासारखे काय आहे ? सेवेसाठी हे मडके मिळाले होते. महान ध्येयवृक्षांना पाणी घालण्यासाठी हे मडके मिळाले होते. कोणाचे लहान मडके, कोणाचे मोठे. नाना प्रकारची ही मडकी तो महान कुंभार निर्माण करतो व जगाची बाग तयार करू बघतो. फुटलेले मडके तो पुन्हा नीट करतो. पुन्हा ते मडके पाणी घालू लागते. असा प्रकार हा चालला आहे.

व्हिक्टर ह्यूगोने एके ठिकाणी म्हटले आहे : 'मनुष्य म्हणजे काय ? हा नरदेह म्हणजे काय ? हा मातीचा गोळा आहे. परंतु त्यात एक चित्कळा आहे. या चित्कळेमुळे या मातीच्या गोळ्याला महत्त्व आहे.'

एक मातीचा गोळा बदलून विश्वंभर दुसरा तयार करतो. ती चित्कळा त्यात ठेवून पुन्हा या जगात तो पाठविण्यात येतो. ज्याप्रमाणे लहान मुले पतंग फाटला तर पुन्हा नवीन कागद घेऊन दुसरा तयार करतात, तसेच हे. परमेश्वर जीवरूपी पतंग कोणत्या तरी अदृश्य गच्चीत बसून सारखे उडवीत आहे. त्यांना खाली-वर खेचीत आहे. पतंग फाटले तर पुन्हा नीट करतो. नवीन कागद, नवीन रंग. पुन्हा ते उडवतो. नाना रंगांचे, नाना आकारांचे, नाना धर्मांचे, नाना वृत्तींचे असे हे कोट्यवधी पतंग प्रत्यही उडत आहेत, फाटत ओत. नवीन येत आहेत. प्रचंड क्रीडा, विराट खेळ !

मृत्यू म्हणजे महायात्रा, मृत्यू म्हणजे महाप्रस्थान, मृत्यू म्हणजे महानिद्रा ! दररोजच्या धडपडीनंतर आपण झोपतो. झोप म्हणजे लघू मरण. सर्व जीवनाच्या धडपडीनंतर, अनेक वर्षांच्या धडपडीनंतरही असेच आपण झोपतो. रोजची झोप आठ तासांची. परंतु ही झोप मोठी असते, एवढाच फरक.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel