तसाच तो बालभक्त प्रल्हाद. नाही म्हणजे नाही. पर्वतावरून लोटा, आगीत लोटा, सुळावर चढवा वा फासावर चढवा, नारायणाचे स्मरण केल्याशिवाय मी राहणार नाही. असा हा ध्येयवादी प्रल्हाद भारतास सदैव स्फूर्ती देईल. वंदे मातरम्, स्वराज्य, इन्किलाब जिन्दाबाद, मी म्हणणार ! साम्राज्यशाही नष्ट होवो, भांडवलशाही नष्ट होवो, मी म्हणणार ! मग या देहाचे काहीही करा. माझे ध्येय माझ्या जीवनातून प्रकट होणार ! ओठांत तेच, पोटात तेच. हातांत तेच, डोळ्यांत तेच. नारायणाचे स्मरण म्हणजे सर्व मानवजातीचे स्मरण ! सर्व नरांचे जेथे अयन होते, ते नारायणाचे स्वरूप. सर्व मानवजातीस सुखी करू पाहणे म्हणजेच नारायणाचा झेंडा फडकविणे !

आणि सत्यमूर्ती तत्त्वसागर राजा हरिश्चंद्र ! स्वप्नातील शब्द खरा करण्यासाठी केवढा त्याग ! किती कष्ट ! स्वप्नातही असत्याचा स्पर्श नको. तारामती, रोहिदास, हरिश्चंद्र ! त्रिभुवन मोलाची तीन नावे. पाणपोईवरचे फुकटचे पाणी बाळ रोहिदास पीत नाही ! आणि आज भारत देशात श्रीमंतांची मुलेही शाळांतून नादारीसाठी अर्ज करतात ! श्रीमंत लोक मोफत दवाखान्यातून दवा नेतात ! स्वाभिमान ! भारतवर्षात सत्त्वाची व स्वाभिमानाची पूजा केली जात असे. लाजारपणाची लाज वाटत असे.

डोंबाकडे नोकरी करताना कसे हृदयद्रावक प्रसंग ! स्वत:च्या मुलाला अग्नी देता येत नाही, स्वत:च्या पत्नीवर घाव घालण्याची पाळी ! कशी ती फुलाप्रमाणे कोमल परंतु वज्राप्रमाणे कठोर मने !

ध्येयापासून अल्पशा झालेल्या च्युतीचेही प्रायश्चित्त भोगावे लागते. ध्येय म्हणजे ध्येय. कापराच्या राशीला एक काडी लागली तरी सर्व भस्म होणार ! 'नरो वा कुंजरो वा' असे म्हणताच धर्मराजाचा पृथ्वीपासून चार अंगुळे वर चालणारा रथ इतरांच्या रथांप्रमाणे पृथ्वीवरून चालू लागला ! पवित्रतम नळराजाच्या पायाचे एक बोट नीट धुतले गेले नाही, ते जरा मलिन राहिले, तेवढया त्या तिळाएवढ्या जागेतून कली नळराजाच्या जीवनात शिरला !

या प्रसंगांतून महान सत्य सांगितले आहे. पाप असे हळूच न कळत शिरत असते. एकच प्याला ! हा एकच प्याला फेकून दिला पाहिजे. पहिले चुकीचे पाऊस, तेच पडू न देण्याची दक्षता व सावधानता घेतली पाहिजे. रवीन्द्रनाथांच्या गीतान्जलीत एक सुंदर गीत आहे :

"तो म्हणाला, मला एक कोप-यात जागा द्या. मी गडबड करणार नाही. परंतु रात्रीच्या वेळेस त्याने बंड केले व तो माझ्या हृदयावर येऊन बसला. हृदयसिंहासनावरची एक मूर्ती ढकलून त्याने आपले राज्य स्थापिले.'

या गीतात हाच भाव आहे. सैतानाचे आगमन असे फसवीत असते. रोगाचा जंतू हळूच शिरतो व सर्व देह व्यापून टाकतो. परकी सत्ता हळूच येते व सर्वत्र पसरते. म्हणून प्रारंभीच दक्ष राहा.

महारथी कर्ण व थोर राजा बळी यांनी दातृत्वाची कमाल केली. स्वत:ला मरण येईल असे नक्की माहीत असताही कर्ण आपली अंगची कवचकुंडले कापून काढून देतो. तोंडातून नकार येण्यापेक्षा मरण पत्करले, अशी त्याची वृत्ती आहे. तो स्वत:च्या पित्याला-सूर्याला म्हणाला, 'मी मूर्ख नाही, मी व्यवहारी आहे. थोड्या किंमतीत पुष्कळ मिळवितो त्याला जग व्यवहारी म्हणते. मी हे मर्त्य शरीर देऊन अमर कीर्ती मिळवीत आहे. ही माती देऊन जगाच्या अंतापर्यंत टिकणारे यश मिळवीत आहे. कसा सुंदर व छान सौदा केला !'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel