बुद्धीचा महिमा

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. ज्ञानावर उभारलेली ही भव्य संस्कृती आहे.

वेद किती आहेत? वेद अनंत आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद एवढेच वेद नाहीत. भारतीय संस्कृतीचा एकच ऋषी नाही, एकच पैगंबर नाही, एकच वेद नाही. भारतीय संस्कृती गगनाप्रमाणे विशाल व सागराप्रमाणे अपार आहे.

जीवनाला सुंदर करणारा प्रत्येक विचार म्हणजे वेद आहे. आपले आयुष्य आनंदी उत्साही कसे राहील, हे आयुर्वेद सांगेल. समाजाचे रक्षण कसे करावे, ते धनुर्वेद सांगेल. समाजाची करमणूक कशी करावी, समाजाला दु:खाचा विसर कसा पडावा, ते गांधर्ववेद सांगेल. हे सारे वेदच आहेत.

काल अनंत आहे व ज्ञान अनंत आहे. नवीन नवीन ज्ञान उदयास येईल व भारतीय संस्कृती सर्वांआधी त्या ज्ञानाचा सत्कार करावयास उभी राहील. भारतीय संस्कृतीला ज्ञानाहून दुसरे काहीही पवित्र वाटत नाही, ज्ञानोपासकांबद्दल भारतीय संस्कृतीला नितान्त आदर आहे.

भारतीय संस्कृती एकाच काळी सारे ऋषी झाले असे कधीही मानणार नाही. असे म्हणणे अहंकार आहे. तो परमेशावराचा अपमान आहे. सारे ज्ञान जर खलास झाले असेल, तर सृष्टीच्या अस्तित्वाची काही जरूरच नाही. कणसे आली की ज्वारी कापून टाकावयाची, एवढेच उरते. त्याप्रमाणे शोधावयास काही जर शिल्लकच नसेल, तर मानवाच्या उत्पत्तीला काही अर्थ उरत नाही.

नवीन नवीन विचार उत्पन्न होतात, नवीन नवीन ज्ञान आपणांस मिळते. युरेनस व नेपच्यून हे पूर्वी दिसत नव्हते, ते आता दिसू लागले. खगोलात ज्याप्रमाणे नवीन नवीन तोरे दिसतात, त्याप्रमाणे जीवनाच्या शास्त्रातही नवीन नवीन विचार उत्पन्न होत असतात. खरे पाहिले तर इतर सर्व शास्त्रांच्या मानाने हे जीवनशास्त्र फारच प्रयोगावस्थेत आहे असे म्हणावे लागेल. ह्या जीवनाच्या शास्त्रात अद्याप काहीही ठरले नाही. भूमितीमध्ये स्वयंसिद्ध, शंकातीत. संशयातीत अशी काही तत्त्वे आहेत. गणितशास्त्रात पृथ्वीच्या पाठीवर कोठेही गेले तरी दोन नि दोन चार अपवादरहित असे मांडता येणार नाही. सत्य चांगले की वाईट, अहिंसा योग्य का अयोग्य, ब्रह्मचर्य असावे का नसावे, यांची निश्चित उत्तरे अद्याप मानवी मनास देता येणार नाहीत.

असे असल्यामुळे भारतीय संस्कृती कशाचा आग्रह धरीत नाही. “बुद्धे: फलमनाग्रह?” – कोणत्याही तत्त्वाचा आग्रह बुद्धिमान मनुष्य धरणार नाही. श्रीकृष्णांनी शेवटी अर्जुनाला “यथेच्छसि तथा कुरु” असे सांगून त्याच्या बुद्धीला महत्त्व दिले. वेदधर्म म्हणजे विचाराप्रमाणे वागणे, बुद्धी सांगेल त्याप्रमाणे वागणे. “अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे” असे भारतीय संस्कृती सांगत आहे. तुझ्या स्वत:च्या हृदयातील बुद्धी काय सांगेल ते बघ. त्या बुद्धीचा जो विशंक आवाज येईल त्याप्रमाणे वाग. “मन:पूतं समाचरेत्” या वचनाचा अर्थ हाच. अमुक ऋषी सांगतो म्हणून नाही, तर तुझ्या मनाला जे पवित्र वाटेल ते तू कर. तू तुझ्या आत्म्याचा अपमान करू नकोस. तू तुझ्या बुद्धीचा गळा दाबू नकोस.

वेद अपौरुषेय आहेत वगैरे कल्पना भ्रामक आहेत. मानवी बुद्धीचा हा सारा पसारा आहे. वेदाला मानणे म्हणजे बुद्धीला मानणे. वेदातील सर्वांत पवित्र मंत्र म्हणजे गायत्रीमंत्र. या गायत्रीमंत्राला एवढे महत्त्व का? या मंत्राची उपासना करूनच मनुष्याचा पुनर्जन्म होतो. या मंत्रात एवढे काय आहे? या मंत्रात बुद्धीची निर्मळता मागितली आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel