मुले खेळत असतात त्या वेळेस त्यांना कितीतरी श्रम होतात. त्या श्रमाचा बोजा त्यांना वाटत नाही. परंतु त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना मैल अर्धा मैल जावयास सांगा, त्यांना ते जड वाटेल. त्यांचे पाय दुखतील. ज्या कर्मत आत्मा रंगत नाही, हृदय समरस होत नाही, ते कर्म म्हणजे मरण होय. ते कर्म म्हणजे शृंखला होय. आपण सारे अशा ह्या वर्णहीन कर्माच्या शृंखलांनी रात्रंदिवस बद्ध झालेले आहोत. आपण सारे बद्ध आहोत. मुक्त कोणीच नाही.

कर्माचा बोजा वाटावयास नको असेल तर स्वधर्म शोधा. स्वधर्म म्हणजे स्वतःचा वर्ण शोधा, स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म उचला. त्यात तुम्ही रमाल, रंगाल. इतके तास काम केले, असे मनातही मग येणार नाही. काळाचे भान तुम्हांस राहणार नाही. तुम्ही काळाचे काळ व्हाल. वेळ कसा दवडावा अशी चिंता, असे संकट तुम्हांस पडणार नाही.

कर्म उत्कृष्ट व्हावयास आणि कर्माचा कंटाळा न वाटावा म्हणून कर्माची आवड असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्यासाठी कर्म करावयाचे त्याच्याबद्दल मनात प्रेम हवे. कर्माबद्दल मनात प्रेम हवे, व ते कर्म ज्यांच्यासाठी करावयाचे त्यांच्याबद्दलही अपार प्रेम हवे. अध्यापनकर्माबद्दल आवड हवी व लहान मुलांबद्दल प्रेम हवे, तरच शिक्षक शिक्षणाच्या कामात रंगेल. ते काम त्याला बद्ध न करात मुक्त करील. सर्व मुलांच्या हृदयाशी, सर्व छात्रांच्या आत्म्याशी ते कर्म त्याला जोडील. त्या कर्माने या शरीरात कोंडलेला त्याचा आत्मा बाहेरच्या अनंत आत्म्याशी समरस होईल. म्हणजेच मोक्ष.

कर्म आपल्या उरावर बसतात याचे एक कारण त्या कर्माबद्दल अप्रीती, व दुसरे कारण म्हणजे ज्यांच्यासाठी कर्म करावयाचे त्यांच्याबद्दलही अप्रीती. ही दोन कारणे जर दूर झाली तर मोक्ष जवळ आला. कर्माबद्दलही प्रेम वाटू दे व त्या कर्माचा ज्यांच्याशी संबंध आहे त्यांच्याबद्दलही प्रेम वाटू दे.

आपण रुग्णालयातील उदाहरण घेऊ या. तेथे एखादी परिचारिका असेल. शुश्रूषेचे कर्म तिला प्रिय आहे. तिचा तो वर्ण आहे. परंतु आजारी पडलेल्या जीवाबद्दल जर तिला प्रेम  वाटले नाही, तर ते कर्म तितकेसे उत्कृष्ट होणार नाही. ज्या रोग्याबद्दल तिला आपलेपणा वाटेल, प्रेम वाटेल त्याची सेवा करावयास ती कंटाळणार नाही. ज्याच्याबद्दल प्रेम वाटणार नाही, त्याचीही सेवाशुश्रूषा ती करील. परंतु ती सेवा तिला मुक्त करणार नाही. ती सेवा तिला ओझे वाटेल.

माता स्वतःच्या मुलांची सेवा किती प्रेमाने करते ! त्या सेवेचा तिला त्रास नाही. एखाद्या मातेचा मुलगा आजारी असू दे. ती रात्रंदिवस त्याच्या उशापायथ्याशी बसते. तुम्ही त्या मातेला म्हणा, “माते ! फार श्रमलीस. फार दमलीस. या मुलाला मी रुग्णालयात ठेवण्याची व्यवस्था करतो.” तर ती माता काय म्हणले ? “मला कसले आहेत श्रम ? दोन हातांऐवजी दहा हात असते तर आणखी सेवा केली असती. ही सेवा म्हणजे माझे समाधान आहे. तुम्ही मुलाला जर दूर न्याल तर मात्र मी कष्टी होईन !”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel