कुत्रा मारताना गांधीचे हृदय पिळवटत होते. स्वत: मरून कुत्रा जगू द्यावा,असे त्यांच्या मनात येत होते. कुत्रा मारणे यात प्रौढी न समजता ते तो दुबळेपणा व स्वत:च्या जीवनाची आसक्ती समजत होते. तशी तुमची स्थिती आहे का? तुम्ही तर मारण्यात प्रौढी व पुरूषार्थ मानता ! तो स्वत:चा कमकुवतपणा न समजता परम धर्म समजता ! मारण्याचे अंतिम तत्वज्ञान तयार करता ! हिंसेचा वेद बनविता !

गीतेच्या अठराव्या अध्यायात “मारूनही मारणे होत नाही” असे सांगितले आहे; परंतु ही कोणाची स्थिती? सर्व विश्व ज्याला आपलेसे वाटले, त्याच्या मारण्यातही जीवन आहे. आई मुलाला ते मारते; परंतु मूल आईच्याच ओच्यात तोंड खुपसून रडते. मारणा-या आईला ते मूल सोडीत नाही. तिलाच ते बिलगते. आईचे चे मारणे, मारणे नसते.

हिंसेची तरफदारी करणा-यांची हिंसा या परमोच्च असेल तर ती हिंसा हिंसा नसून अहिंसाच होय असे म्हणता येईल. रामाने रावणास मारले; परंतु रावण उद्धरून गेला असे आपण म्हणतो, यातील हाच भावार्थ. रामाला आपण एकदा परमेश्वर म्हटले म्हणजे त्याचे मारणे तुमचे-आमचे हिंसक मारणे न राहता ते तारक मारणे होते. ते आईच्या हातचे मारणे होते.

अर्जुनाला हिंसा करावयास श्रीकृष्णाने सांगितले. कारण त्याचा तो स्वभाव होता. ‘हिंसा म्हणजे परम धर्म’ अशा रीतीने त्याने सांगितलेले नाही. आदल्या दिवसापर्यंत हिंसेच्या गप्पा मारणारा अर्जुन एका क्षणात अहिंसक कसा होणार? हिंसा-अहिंसा हा अर्जुनासमोर प्रश्न नसून आसक्ती व मोह हा प्रश्न होता. “मोह सोड” एवढेच त्याला श्रीकृष्णाचे सांगणे होते. “स्वजन आहेत म्हणून मारू नये असे तुला वाटते. दुसरे असते तर तू खुशाल त्यांचा फन्ना पाडला असतास. आकार तुला प्रिय आङेत. विशेष नामरूप प्रिय आहेत. ही आसक्ती आङे. हा मोह टाक.” असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले; आणि अर्जुनही शेवटी म्हणतो, “नष्टो मोह: । ”

गीतेचा हिंसा हा परम सिद्धान्त नाही. हिंसेतून हळूहळू मनुष्य पूर्ण अहिंसेकडे जाईल. अहिंसा हाच अंतिम सिद्धान्त होय. ते ध्येय गाठीपर्णंत आपला दुबळेपणा म्हणून मनुष्य हिंसा करीत राहील; परंतु ‘मी हिंसा करणार’ अशी जेव्हा तो ऐट मिरवू लागतो, तेव्हा मात्र मानवजातीचा अध:पात असतो.

आपण सारे घाव घालण्याचा हक्क मिळवायला अधीर असतो; परंतु प्रेम करण्याचा हक्क आधी मिळवून घ्या. आई अपार प्रेम करते, म्हणून तिला मारण्याचा अधिकार आहे.

मानवी जीवनात संपूर्ण अहिंसा शक्य नाही. संपूर्णता हे ध्येयच राहणार. ज्याप्रमाणे भूमितीत बिंदू हा प्रत्यक्षात कधी दाखविता येणार नाही, भूमितीतील रेखा प्रत्याक्षात दाखविता येणार नाही, त्याप्रमाणेच परिपूर्ण ज्ञानी, संपूर्ण प्रेमी, प्रत्यक्ष संसारात दाखविता येणार नाही, ज्याला लांबी नाही, रूंदी नाही, असा बिंदू अगदी लहानसा आपण फळ्यावर काढतो, ध्येयभूत बिंदूच्या जवळ असलेला असलेला असा बिंदू आपण काढतो, त्याप्रमाणे ध्येयभूत पुरूषाच्या जवळ जवळ गेलेले शुक-जनकादिक आपण दाखवितो; परंतु पूर्णत्वाच्या जवळजवळ जाणे म्हणजे संपूर्ण पूर्णता नव्हे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel