त्याचे बारसे करतो. किती सहृदय आहे ही भावना!
गायीवासरांची पूजा करतो, त्याचप्रमाणे बैलांचीही आपण पूजा करतो. पोळ्याचा सण आपण करतो. सातारकडच्या बाजूला याला बेंदराचा सण म्हणतात. बेंदराच्या दिवशी - या पोळ्याच्या दिवशी - बैलाला विश्रांती. त्याला सजवावयाचे, त्याच्या गळ्यात माळा घालावयाच्या. शेतक-यांच्या बायकांच्या पायांतील तोडे बैलांच्या पायात घालण्यात येतात! पोळ्याच्या सणाच्या दिवशी गरीब शेतकरीसुद्धा पुरण घालतो. बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य, त्यावर तुपाची धार. बैलांची थाटामाटाने मिरवणूक निघते. वाजंत्री वाजतात, बार उडतात, आनंद असतो. हा कृतज्ञतेचा आनंद असतो. ज्या बैलाच्या मानेवर आपण जू दिले, त्यांच्या मानेला घट्टे पडले; उन्हातान्हात, चिखलात ज्याला राबविले, ज्याने नांगर ओढले, मोटा ओढल्या, गाड्या ओढल्या, ज्याला रागाच्या भरात आपण आसूड मारले, पुरण टोचले, ज्याच्या श्रमांमुळे आपली शेते हिरवीगार डोलू लागली, धान्याने नटू लागली, ज्याच्या श्रमांमुळे मोत्यासारखी ज्वारी, सोन्यासारखे गहू पिकतील, अशा त्या कृष्णमूर्ती बैलांबद्दल कृतज्ञता दाखविण्याचा हा परम मंगल दिवस ! या पोळ्याच्या सणाची कल्पनाच नुसती मनात येऊन माझे डोळे प्रेमाश्रूंनी भरून येतात व भारतीय संस्कृतीचा आत्मा मला दिव्य असा दिसू लागतो.
भारतीय संस्कृतीचे उपासक आज गायीबैलांना कसे वागवीत आहेत, हे दिसतच आहे ! परंतु दास्य, दारिद्र्य, अज्ञान यांचा हा परिणाम आहे. इतर गोष्टी ज्याप्रमाणे यांत्रिक झाल्या आहेत, तसे हे सण यांत्रिक झाले आहेत. त्यांतील गोड भाव हृदयावर ठसत नाही. असे असले तरी आजही गायीबैलांवर अपार प्रेम करणारे शेतकरी भारतात आहेत. मुळशीच्या सत्याग्रहात भाग घेणारे माझे एक खानदेशी स्नेही एकदा एक अनुभव मला सांगत होते. मुळशी पेट्यात बैलगाडीतून ते जात होते. बैलांना हाकण्याची त्यांना हुक्की आली. गाडीवानास ते म्हणाले, “तू मागे बैस, मी गाडी हाकतो.” गाडीवान मागे बसला. खानदेशी मित्र बैल हाकू लागले. बैलांच्या शेपट्या पिळवटू लागले. बैल पळावे म्हणून ते शिव्या देऊ लागले. बैलांना शिवी दिलेली ऐकताच तो शेतकरी संतापला ! तो म्हणाला, “माझ्या बैलांना शिवी दिली, मला खपणार नाही. तुम्ही मागे बसा. द्या कासरा माझ्या हातात. माझे बैल म्हणजे माझे प्राण...”
भारतीय संस्कृती सांगते, “गायीबैलांस प्रेम द्या. त्यांच्यापासून भरपूर काम घ्या; परंतु त्यांची निगाही राखा. त्यांना वेळेवर चारा द्या. चाबूक मारू नका. एखाद्या वेळेस राग येऊन माराल, कारण किती झाले तरी तुम्ही माणसेच; परंतु त्यात खुनशीपणा नको, माणुसकी नका विसरू. बोट बोट पुरण टोचून बैलांच्या अंगाची चाळण नका करू. त्या मुक्या जनावरांचे आशीर्वाद घ्या. त्यांचे शिव्याशाप नका घेऊ. तुमच्यासाठी मर मर मरणा-या बैलांची हायहाय तुमचे कल्याण करू शकणार नाही. गायीगुरे किती प्रेमळ असतात. तुमच्या आवाज ऐकताच ती हंबरतात. तुमचा स्पर्श होताच ती नाचतात. धनी मेल्यावर चारापाणी न घेता प्राण सोडणा-या गायीबैलांची उदाहरणे आहेत!”
कुराणात महंमद पैगंबर म्हणतात, “सायंकाळ होताच गायी-गुरे रानातून तुमच्यावरच्या प्रेमामुळे तुमच्या घरी परत येतात, ही किती थोर गोष्ट आहे !” खरोखरच हा मानवाला भूषण अशी गोष्ट आहे.