हिंदुस्थानात निरनिराळ्या जातींत रोटी-बेटीबंदी होण्याला मांसाशन निवृत्ती हे मोठे कारण होते. ज्या जाती मांसाशन करीत, त्या जातींशी मांसाशन न करणा-यांकडून रोटी-बेटी व्यवहार बंद करण्यात येई. निरनिराळ्या जातींत व त्यांच्या पुन्हा पोटजातीत जे श्रेष्ठ-कनिष्ठपणाचे भाव आजही-आहेत, त्यांच्या मुळाशी मांसाशनचा प्रश्न आहे. ज्या जातींनी किंवा पोटजातींनी मांसाशन सोडले, त्या इतर मांसाशन करणा-या जाती व पोटजाती यांच्यापेक्षा स्वत:ला श्रेष्ठ समजू लागल्या. भारतीय समाजशास्त्रात मांसाशननिवृत्तीला महान स्थान आहे. मांसाशननिवृत्तीच्या चळवळीमुळे उलथापालथी झाल्या आहेत.
आजही आपण अशा गोष्टी पाहतो. खादी वापरणारा मनुष्य खादीवाल्याशीच सोयरीक जोडील. आपण नेहमी समान आचारविचार पाहात असतो. ज्यांचा आहार, आचारविचार समान, त्यांची जात एक. आज खादी वापरणारे, ग्रामोद्योगी वस्तू वापरणारे. यांची एक नवीनच जात होत आहे. त्यांच्या परस्परांशी सोयरिकी होत आहेत. नवीन ध्येय आले की नवीन जात निर्माण होते. त्या ध्येयाचे उपासक परस्परांच्या जवळजवळ येतात. त्यांचे संबंध वाढतात. वाढवलेल्या संबंधाने जात वाढते, म्हणजे ते ध्येयच वाढते.
भक्षणहिंसा कमी करण्याचा प्रयोग भारतात झाला. त्याचप्रमाणे रक्षणार्थ हिंसाही कमी करण्याचे प्रयोग भारतीय संस्कृतीने केले; व धन्यतेची गोष्ट आहे की आजही तसे प्रयोग भारतात होत आहेत.
माणसाने माणसास खाऊ नये आणि माणसाने माणसास मारू नये हा माणुसकीचा पहिला धडा आहे. आज माणूस माणसास प्रत्यक्ष फारसा खात नाही, ही गोष्ट खरी. अजूनही पृथ्वीच्या पाठीवर नरमांसभक्षक जाती क्वचित कोठे आहेत. सुधारलेला मनुष्य त्यांना रानटी म्हणून संबोधितो, परंतु सुधारलेला मनुष्य मनुष्यास जाळून-भाजून खात नसला तरी खाण्याचे अप्रत्यक्ष मार्ग त्याने शोधून काढले आहेत ! रक्तशोषणाचे अन्नप्रकार सुधारलेल्या मानवाने प्रसृत केले आहेत ! शस्त्रात्रसंपन्न होऊन दुर्बळांना गुलाम करावयाचे, त्यांची आर्थिक पिळवणूक करावयाची, आणि अशा सुधारलेल्या रीतीने जळूप्रमाणे त्यांचे रक्त प्यावयाचे, असा प्रकार इतिहासात रूढ झाला आहे !
अशा रीतीने दुसरा आपणांस जर गुलाम करावयास आला तर आपण काय करावयाचे? स्वसंरक्षणार्थ कोणता उपाय? स्वसंरक्षणार्थ हिंसेचा अवलंब केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. परंतु काही लोकांना असे वाटू लागले, की अशी हिंसा करणे वाईट. निदान आपल्या हातून तरी अशी हिंसा होऊ नये. हिंसा करावयाची, तर काही लोकांनी ती करावी. त्यात त्यांनाच निष्णात होऊ द्यावे. ब्राह्मण क्षत्रियांना म्हणाले, “आम्ही हिंसा करणार नाही, आम्ही अहिंसेचे व्रत घेतो. आमच्यावर जर कोणी हल्ला केला, तर तुम्ही आमचे संरक्षण करा.” परंतु हा विचार बरोबर नव्हता. विश्वमित्राने आपल्या यज्ञरक्षणार्थ राम-लक्ष्मणास बोलाविले. स्वत: विश्वमित्राने त्यांना धनुर्विद्या शिकविली. विश्वमित्र ब्रह्मर्षी झाला होता. तो राम-लक्ष्मणांस म्हणाला, “राक्षस माझ्या यज्ञावर हल्ला करतील. तुम्ही त्या राक्षसांचा वध करा. मी तुम्हांला धनुर्विद्या शिकवितो. या विद्येने तुम्ही अजिंक्य व्हाल व राक्षसांचा सहज नि:पात कराल.”