वर्ण

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय? यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत प्रकरणात आपण वर्ण म्हणजे काय, यासंबंधी थोडेसे विवेचन करू. आपापल्या वर्णाप्रमाणे प्रत्येकाने वागावे असे आपणांस सांगण्यात येत असते. परंतु वर्णाप्रमाणे वागणे म्हणजे काय? ब्राह्मणाने ब्राह्मणधर्माप्रमाणे वागावे, क्षत्रियाने क्षात्रधर्माप्रमाणे वागावे, वैश्याने वैश्यधर्मानुसार व शूद्राने शूद्रवृत्त्यनुसार वागावे, असे याचे स्पष्टीकरण करण्यात येत असते.

यो सर्व बोलण्या-सांगण्यात एक वस्तू गृहित धरलेली असते, की आई-बापांचेच सारे गुणधर्म मुलांत उतरत असतात. परंतु प्रत्यक्ष संसारात अनुभव तर तसा येत नाही. आईबापांच्याच आवडीनिवडी अपत्यांत आलेल्या असतात असे नाही. मायबापांपेक्षा अत्यंत भिन्न वृत्तीची मुले आपणांस दिसून येत असतात. हिरण्यकशिपूच्या पोटी प्रल्हाद येतो.

परंतु आईबापांचे गुणधर्म उतरत नसले तरी मुले लहानपणापासून जे सभोवती पाहतील, त्याचाच ठसा त्यांच्या जीवनावर उमटविल्याशिवाय राहणार नाही. त्या वातावरणाचा त्यांच्या मनावर परिणाम होईल. कीर्तनकाराचा मुलगा लहानपणापासून घरात कविता, आख्याने वगैरे ऐकेल. गाणा-याचा मुलगा गाणे, तंबोरा, तबला, पेटी यांच्या संगतीत वाढेल. विणकराचा मुलगा हातमाग, पांजणी, ताणाबाणा, धोटा यांच्याशी परिचित असेल. शेतक-यांच्या मुलाला नांगर, वखर, पाभर, पेरणी, निंदणी, खुरपणी, मोट, नाडा यांचा सराव असेल. सैन्यातील शिलेदाराचा मुलगा घोड्यावर बसेल, भाला फेकील, तलवार खेळवील. वाण्याचा मुलगा तराजू तोलील, मालाचे भाव सांगेल, पुडी नीट बांधून देईल, जमाखर्च राखील. चित्रकाराचा मुलगा रंगाशी रमेल. चर्मकाराचा मुलगा चामड्याशी खेळेल. अशा प्रकारे त्या त्या मुलाच्या भोवती जे वातावरण असेल, त्या वातावरणाचा तो बनेल.

मनुष्य केवळ परिस्थितीचा गोळा आहे का? सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम होतो हे खरे; परंतु मुळात काही असेल तर त्याच्यावर परिणाम होईल. बीजच नसेल तर कितीही पाणी ओतले तर त्याच्यावर परिणाम होईल. बीजच नसेल तर कितीही पाणी ओतले म्हणून का अंकुर वर येणार आहे? मुळात बीज हवे. आत जन्मत:च काहीतरी पाहिजे.

आईबापांचे गुणधर्म मुलांत येतात. वातावरणामुळे आईबापांचा वर्ण मुलांच्या जीवनात असणे शक्य व संभवनीय दिसते, असे प्राचीन काळात मानले गेले. परंतु त्या वेळच्या प्रयोगाप्रमाणे व संशोधनाप्रमाणे तसे ठरविले गेले. म्हणून आजही तसेच मानले पाहिजे असे नाही. आज शास्त्रे वाढली आहेत. जास्त शास्त्रीय दृष्टीने वर्णचिकित्सा आज करता येणे शक्य आहे.

ज्या नेत्याने आपल्या वर्णाप्रमाणे वागावे, हा सिद्धान्त त्रिकालाबाधित आहे. आपण वर्ण चार कल्पिले. परंतु हे फार व्यापक त-हेने कल्पिले. ज्ञानाची उपासना करणारा ब्राह्मणवर्ण; परंतु ज्ञान शेकडो प्रकारचे आहे. अनंत वेद आहेत. वाढत्या काळाप्रमाणे ज्ञान वाढत आहे. मानसशास्त्र, नीतिशास्त्र, अध्यात्मशास्त्र, पुनर्जन्मशास्त्र, सृष्टिशास्त्र, ज्योतिषशास्त्र, रसायनशास्त्र, वातावरणशास्त्र, विद्युच्छास्त्र, संगीतशास्त्र,  शारीरशास्त्र, शस्त्रक्रियाशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, उद्भिज्जशास्त्र, अशी शेकडो शास्त्रे आहेत. ज्ञानाची उपासना करणे हा एक वर्ण झाला. परंतु या एका वर्णाची ही शेकडो अंगे आहेत.

तसेच क्षत्रिय वर्णाचे. विमानयुद्ध, नाविकयुद्ध, जलयुद्ध, वातयुद्ध, शेकडो प्रकारची युद्धे अस्तित्वात येत आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel