विक्रमोर्वशीयम् नाटकात पुरुरवस राजाचा मुलगा आयू हा ऋषीच्या आश्रमात अध्ययनार्थ ठेवण्यात आलेला असतो; परंतु एके दिवशी आयू हिंसा करतो. एका सुंदर पक्ष्याला तो बाण मारतो. त्या कोवळ्या पंखात तो प्रखर बाण घुसतो. ऋषीला ही गोष्ट कळते. आश्रमात हिंसा ही गोष्ट त्याला सहन होत नाही. आश्रमाचे पवित्र व प्रेमळ वातावरण भंगणारा आश्रमात नको असे ऋषीला वाटते. त्या मुलांच्या धात्रीला तो सांगतो :

आश्रममिरुद्वमनेन आचरितम् । निर्यातय हस्तन्यासम् ।
आश्रमाच्या प्रणालीविरुध्द याने वर्तन केले आहे. याला परत पाठवा.

असे हे ठायी ठायी असणारे आश्रम भारतीय संस्कृती वाढवीत होते. या आश्रमांत प्रयोग होत होते. साप, मुंगुस, हरिण, सिंह, एके ठिकाणी प्रेमाने नांदविण्याचे प्रयोग होत होते; आणि सर्प-सिंहांनाही आश्रमात प्रेम दिले जाते आहे, त्या प्रेमामुळे सर्प-सिंहही प्रेमळ होत आहेत, असे दिव्य दृश्य आश्रमाला भेट देणारे बघत, तेव्हा ते गहिवरून जात ! सर्प-सिंह दूर राहिले, आपण आपल्या शेजारच्या लोकांजवळ तरी प्रेमाने वागू या, समाजात तरी सहकार्याने, आनंदाने नांदू या; घरात तरी गोड राहू या, नांदू या असे ते मनाशी ठरवीत. आश्रमाच्या दर्शनाने प्रेमाचा धडा शिकून ते संसारात जात व संसार सुंदर करण्याचा प्रयत्न करीत.

आजही भारतवर्षात भारतीय संस्कृतीस उजाळा देणारे आश्रम आहेत. वर्ध्याच्या आश्रमात सापांना कोणी मारीत नाही. त्यांना धरून दूर सोडून देण्यात येते. विंचवांच्या नांग्या धरून त्यांना दूर सोडण्यात येते. एका गावात कॉलरा आला असताना त्या गावातील लोकांनी एक बोकड जिवंत पुरून देवीला बळी द्यावा असे ठरविले. देवीच्या मंदिरासमोर खोल खळगा खणण्यात आला. तिकडून बोकडाच्या बलिदानाची मिरवणूक आली. परंतु लोक येतात तो त्यांना रामनामाची धून ऐकू आली. वर्ध्याच्या आश्रमातील एक सत्याग्रही त्या खळग्यात उभा होता. रामरायाचे भजन त्याने चालविले होते.

लोक म्हणाले, 'बाहेर या.'

तो नम्रपणे म्हणाला, 'बोकडाला पुरून कॉलरा जाणार असेल तर मलाच पुरा. माणसाला पुरल्याने देवी अधिकच प्रसन्न होईल आणि कायमचा कॉलरा जाईल.'

भगवान बुध्दांच्या आत्म्याला हे विसाव्या शतकातील दृश्य पाहून केवढे समाधान झाले असेल ! त्या सत्याग्रहीचा विजय झाला. प्रेमाचा विजय झाला. ज्ञानाचा विजय झाला !

अहिंसेचा, प्रेमाचा पंथ दाखविणारे हे नवे आश्रम भारतवर्षाची आशा आहेत. हे प्रेम भारतीय संसारात आल्याशिवाय राहणार नाही. भारतीय संसार सहानुभूतीचा व सहकार्याचा झाल्याशिवाय राहणार नाही.

जगात एकीकडे तोफा ओतल्या जात असताना भारतात प्रेमाचे प्रयोग होत आहेत. सरहद्दीवरचे झुंजार पठाण अहिंसेचे उपासक होत आहेत. शूर शिखांनी अनत्याचारी सत्याग्रह केले. आश्रमातून सर्प-विंचवांनाही प्रेम मिळत आहे. हजारो-लाखो लोक अहिंसेच्या झेंड्याखाली हिंसेसमोर उभे राहात आहेत. भारतातील हा देखावा पाहून देवांचेही डोळे भरून आले असतील ! या भारतभूमीतील या अहिंसेच्या कथा ऐकावयास, अहिंसेच्या या महान प्रयोगांची हकीकत ऐकावयास भगवंताचेही कान उत्सुक असतील !

धन्य ही 'अहिंसा परमो धर्म:' सांगणारी भारतीय संस्कृती ! धन्य ही प्राचीन ध्येयपरंपरा पुढे नेणारे आजचे विश्ववंद्य महात्माजी !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel