गुप्त असणा-या सरस्वतीची गंभीर वाणी ऐकू आली: “ज्ञानाशिवाय भक्ती अंधळी आहे, भक्तीशिवाय ज्ञान कोरडे आहे, आणि कर्मात अवतीर्ण झाल्याशिवाय ज्ञान-भक्तीस अर्थ नाही. ज्ञानमयी गंगा भक्तीमय यमुनेत मिळू दे, आणि कर्ममय सरस्वतीस भक्ति-ज्ञानाचा स्पर्श होऊ दे.

गंगा, यमुना व सरस्वती म्हणजे ज्ञान, भक्ती व कर्म यांचा मला संगम वाटतो. गंगाजमनी भांडे आपण पवित्र मानतो. दोन डोळ्यांतून घळघळणा-या अश्रुधारांना आपण गंगा-यमुना म्हणतो. गंगा-यमुना आपल्या जीवनात शिरल्या आहेत. परंतु जेथे शिरल्या पाहिजे होत्या, तेथे अद्याप शिरल्या नाहीत. पांढरपेशांची गंगा काळ्यासावळ्या श्रमजीवी लोकांच्या यमुनेस अद्याप मिळाली नाही. पांढरपेशे लोक स्वत:ला पवित्र व शुद्ध समजून बहुजनसमाजापासून दूर राहिले आहेत.

वरिष्ठ वर्ग व कनिष्ठ वर्ग एकत्र येऊन प्रेमाने परस्परांस जोपर्यंत कवटाळीत नाहीत, तोपर्यंत भारताच्या ललाटीचे दास्य दूर होणार नाही. आणि समुद्रात स्नान करणे म्हणजे तर पावित्र्याची परम सीमा.

“सागरे सर्व तीर्थानि”

जगातील सर्वच प्रवाह समुद्र जवळ घेतो. म्हणून तो सदैव उचंबळत आहे. पाऊस पडो वा ना पडो, समुद्राला आटणे माहीत नाही. जो सर्वांना जवळ घेईन त्याच्याजवळ सर्व तीर्थे आहेत, असे ऋषी सांगत आहेत.

“देव रोकडा सज्जनी”

भेदाभेद जाळून सर्वांना उराशी धरणा-या सज्जनांच्या ठिकाणी प्रत्यक्ष रोखठोक देव आहे. प्रत्यक्षावगम तेथे आहे.

भारतीय संतांनी अशा रीतीने हा वस्तुपाठ आम्हाला दिला. परंतु त्यातील महान अर्थ कधीही आम्ही मनात आणिला नाही. संगमावर व समुद्रात स्नाने करून पापे जाळणार नाहीत; त्या संगमावर व समुद्रात स्नाने करून परत आल्यावर त्यांचा महान अद्वैताचा संदेश प्रत्यक्ष जीवनात आणला तर समाज निष्पाप होईल, निर्दोष होईल. समाजात वाण उरणार नाही, घाण राहणार नाही, दु:ख दिसणार नाही, सर्वत्र प्रसन्न असे वातावरण निर्माण होईल.

अद्वैताचा अशी रीतीने जीवनात साक्षात्कार कोणता भारतपुत्र करू पाहात आहे? आपण सर्वत्र डबकी निर्माण केली आहेत! चित्पावन, क-हाडे, देशस्थ, यजुर्वेदी, शुक्लयजुर्वेदी, मैत्रायणी, हिरण्याकेशी अशी ब्रह्मणांतच शेकडो डबकी आहेत. आधी एकेका जातीचे डबके आणि त्या डबक्यात पुन्हा आणखी डबकी! डबकी करून राहणारे व अहंकाराने टरोंटरों करणारे आपण सगळे बेडूक झालो आहोत! चिखलात उड्या मारावयाच्या व चिखल खायचा हे आपले पवित्र ध्येय झाले आहे!

जाति-जातींची, स्पृश्यास्पृश्यांची, ब्राह्मण-ब्राह्मणेतरांची, हिंदु-मिसलमानांची शेकडो डबकी आहेत. गुजराती. महाराष्ट्रीय, मद्रासी व बंगाली ही प्रांतीय डबकी शिवाय आहेतच! डबक्यात राहणा-यांस प्रसन्नतेचा प्रसाद प्राप्त होत नसतो. डबकी साचली की घाण निर्माण होते. डास-मच्छर यांचा बुजबुजाट होतो. रोग उत्पन्न होतात. भारतभूमीला भले दिवस यावेत अशी जर इच्छा असेल, तर ही डबकी दूर करण्यासाठी आपण उठले पाहिजे. भेदांच्या भिंती जमानदोस्त केल्या पाहिजेत. सारे प्रवाह प्रेमाने जवळ येऊ देत. उचंबळू दे सागर!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel