गुणाची परीक्षा पास झाली. तो आतां डॉक्टर झाला.

“काही दिवस मळवलीस या. इंदूला बरे वाटले. सारंगी वाजवा. हंसा, बोला.” असे मनोहरपंतांनी लिहिले.

एके दिवशी गुणा इंदूकडे जाण्यासाठी निघाला. एरंडोलहून असाच सारंगी घेऊन तो निघाला होता. त्या वेळेस डोळ्यांसमोर निराशा होती. त्या वेळेस निराधार वाटत होते. आज जीवनांत आशा होती. आणि जीवनाचा चिर आधार मिळण्याची निश्चितता होती. इंदूची प्रकृति सुधारत होती. वजन वाढत होते. त्याला बरे वाटत होते.

तो खानदेशांतून आतां जाणार होता. जळगावला उतरून एरंडोलला यावे का जाऊन, असे त्याच्या मनांत आले. जगन्नाथ काय करीत असेल? आपण त्याला पाट वर्षांत पत्र पाठवले नाही. किती कठोर आपण. परंतु बाबांसाठी सारे मित्रप्रेम मनांत ठेवले. येऊ का जाऊन एरंडोलला? हळूच त्याच्या घरावरून जाईन. का आधी त्याच्या नावानें एक पत्र पाठवूं? तो तेथे असला तर उत्तर देईल. असेच करावे. पाठवावे पत्र, बाबा आतां रागावणार नाहीत. आतां त्यांची मान खाली नाही. मी डॉक्टर झालो आहे.

किती तरी विचार गुणाच्या मनांत आले. सारें जुने जग डोळ्यांसमोर आले. त्यांचे खेळ, त्यांचे मेळे, दयाराम भारती, शेतक-यांची दैना, स्वातंत्र्याचा प्रश्न, आपण काय करायचे, केवळ का दवाखाना काढून बसायचे, का चळवळीत पडावे; एक ना दोन, शेकडो विचारांची त्याच्या मनांत गर्दी उडाली. आणि जळगांव स्टेशन आले. स्टेशनवर खूप गर्दी होती. त्याच्या डब्यांतहि काहीं मंडळी शिरली.

“उठून बसतां का जरा भाऊ?” एकाने विचारले. गुणा उठून बसला. आपल्या खानदेशांतील मंडळी असा विचार त्याच्या मनांत आला. किती तरी दिवसांनी खानदेशांतील भाऊ शब्द त्याच्या कानांवर पडला होता. किती गोड वाटला त्याला.

ते आलेले लोक जागा कशीतरी करून बसले. त्यांच्या गप्पा सुरूच होत्या.

“पंढरीशेटला म्हातारपणी मात्र फार दु:ख. कोठे गेला मुलगा पत्ता नाही.”

“दोनतीन वर्षे झाली. ती त्याची बायको सारखी रडत असते. म्हणे पोरगी एकदां खाते व राम राम म्हणत बसते. त्या दोघां म्हाता-यांस पहावत नाही ते.”

“तुरुंगांत गेलो होतो, परंतु सुटलो, असे एकदां त्याचे पत्र आले होते. त्यालाहि झाले किती तरी दिवस. लौकर येतो. म्हणून त्या पत्रांत होते. परंतु दोन वर्षे होऊन गेली. का पुन्हा तुरुंगात गेला? का सरकारनें डांबून ठेवले?”

“त्या दयाराम भारतींना नाही का अडकवून ठवले? धुळे जेलांत ठेवले आहे अडकवून. वर्षानुवर्षे आपले तुरुंगांत. तपश्चर्याच ही.”

“किती कष्ट!”

“सारे जगासाठी. जगन्नाथ असाच गेला असेल. चळवळ्या होताच तो. गरिबांची बाजू घ्यायचा. भावाला म्हणायचा जाळून टाकीन जमाखर्च तुझे. अहो रस्ते झाडायचा, खेड्यांतून हिंडायचा.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel