तिसरे प्रहरी चहा वगैरे झाला.
“आम्हाला कोठे तरी जागा पाहिली पाहिजे.” रामराव म्हणाले.
“मी पाहून ठेवली आहे जागा.” मनोहरपंत म्हणाले.
“तेथे सामान न्यावे लागेल. उद्यापासून त्या जागेतच करू स्वयंपाक.”
“चला, जागा दाखवतो.”
रामराव व गुणा मनोहरपंतांबरोबर निघाले. नवीन जागा बघावयास बाहेर पडले. फार लांब नव्हते ते घर. तीन खोल्या होत्या. उजेड होता. चांगली होती जागा.
“ही खोली मला.” गुणा म्हणाला.
“होय हो.” रामराव म्हणाले.
“बेताची आहे. भाडेहि फारसे नाही.”
“किती भाडे?”
“आठ रुपये. विजेचा दिवा घेतला तर निराळा चार्ज पडेल.”
“दोन दिवे घ्यावे लागतील.” गुणा म्हणाला.
“आपण कंदीलच वापरू. आपल्याबरोबर आहेच.”
“आठ रुपये—फार आहे भाडे नाही बाबा?”
“एरंडोलला आठ रुपयांत सारे घर मिळते.”
“हे शहर आहे. आणि मला वाटते की तुम्ही विजेचे दिवे घ्यावे. नीट वापरले तर फार महाग नाही पडत.”
“बघू या.”
“आणि मला तुम्ही देणार आहांत ना शिकवण्या मिळवून?”
“रामराव, तुम्हांला संस्कत येते वाटते?”
“कशावरून?”
“तुम्ही इंदूर कि दूर वगैरे गाडीत म्हणाले होतेत.”
“मी जुन्या काळचा मॅट्रिक आहे. संस्कृतचा मला नाद होता. परंतु आता विसरलो.”
“जुन्या काळचा मॅट्रिक म्हणजे आताचा बी.ए. तुम्हा आमच्या इंदूला सकाळी शिकवीत जा. दुसरीहि एक मुलगी येईल. संस्कृत, गणित, इंग्रजी, जे त्यांना लागेल ते शिकवा. म्हणजे एक काम होईल. त्याचे १५ रुपये तुम्हांला मिळतील. आणि सायंकाळी गुणाने इंदूला सारंगी शिकवावी. एका जहागिरदाराच्या घरीहि एकाला शिकवायची आहे. परंतु तेथए सकाळी जावे लागेल. गुणा जर शाळेत जाऊं लागला तर सकाळचा वेळ त्याला स्वत:ला अभ्यासात लागेल.”
“मी अभ्यास पहाटे व रात्रीहि करीन. मी सकाळीसुद्धा शिकवायला जाईन.” गुणा म्हणाला.
“ठीक तर. ज्यांची मोटार मी आणली होती ना, त्या विश्वासरावांकडेच शिकवायला जायचे. त्यांच्या मेव्हण्याला शिकायची आहे सारंगी. सकाळी आठाचे सुमारास जात जा. विश्वासराव चांगले आहेत गृहस्थ. मोठे रसिक व दिलदार.”