आणि ते रासन्हाण. जगन्नाथ जाईना. परंतु त्याच्या बहिणींनी त्याला हात धरून नेले. पाटावर बसविले. कानात वधू तेल घालते. जगन्नाथ उठून जाऊ लागला. बहिणींनी त्याला पुन्हा बसविले. त्यांनी त्याचा कान वांकडा केला. नववधूने कानात तेल घालते.

असे प्रकार झाले. रागावत रुसत झाले. परंतु पंगत झाली त्या दिवशी निराळेच प्रकरण झाले. मंडपाशी भिका-यांची ही गर्दी. उष्टे मागण्यासाठी गर्दी! जगन्नाथ वरून पहात होता. तो एकदम रागाने खाली गेला.

“खबरदार त्यांना उष्टे वाढाल तर. माणसें म्हणजे का कुत्री? ते मागतात म्हणून का आपण उष्टे द्यावे? त्यांना घरातील द्या. हे पानातले गाईगुरांना घाला.” तो म्हणाला.

“अहो, हे पानांत इतकें फुकट गेले आहे ते काय करायचे?”

“वाढलेत कशाला?”

“शहाणेच दिसता!”

“हो. मी शहाणा आहे व तुम्हाला हा मूर्खपणा करू देणार नाही. त्या त्या उष्ट्या अन्नाच्या बादल्या माघारी—यांना घरांतील ताजे अन्न आणून द्या.” बरें. तुम्ही म्हणता तसे करू. चला वर.”

त्याचा हात धरून त्याला वर नेण्यात आले. त्या बादल्या मागे गेल्या. दुस-या आल्या. परंतु खरोखरच दुस-या होत्या का त्या? का ती फसवणूक होती? देव जाणे.

जावईबोवांच्या विक्षिप्तपणाविषयीं मंडपांत सर्वत्र चर्चा. स्त्रीपुरुषांत चर्चा. पुढे संसार कसा करतील का कर्णाचे अवतार बनतील? काही नाही हो, हे पुढें टिकत नाही. बायकोची वेसण पडली म्हणजे सारे चाळे थांबतात. आज ही सांगेढोंगे. अशी बोलणी चालली.

शेवटचा दिवस आला. जगन्नाथ खिन्न झाला होता. त्या चर्चा त्याच्या कानावर येत. मुद्दाम त्याच्या कानीं पडाव्या म्हणूनच मोठ्याने कोणी कोणी बोलत. त्याच्या तोंडावरचे हास्य गेले, आनंद मावळला.

“जगन्नाथ, खांद्यावर बसायला हवे. तुला नाचवतील, तिला नाचवतील. गुलाल फेका एकमेकांवर.”

“मी काही एक करणार नाही. मी खांद्यावर बसणार नाही, घोड्यावर बसणार नाही. आम्ही पायी येऊ. नको गुलाल, नको धुळवड.”

“काय बोलतोस हे?”

“खरे ते बोलतो. मी पायी येणार.”

अनेकांनी समजुती घालण्याचे प्रयत्न केले. परंतु जगन्नाथ ऐकेना. शेवटी मोटारीतून नवरानवरी मिरवायचे ठरले. तडजोड झाली. मोटार सजली. फुलांच्या माळांनी मंगल मोटार सजली. तींत वधूवरें बसली. वरात निघाली. सोहळा झाला. नांव ठेवले गेले. कोणते नाव? इंदिरा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel