“नाही हो कळवणार जगूला. आम्ही एकमेकांच्या मनात कायमचेच आहोत.”
गुणा जेवून वर गेला. त्या घरांतील शेवटची जेवणे झाली. जरूरीची भांडी बरोबर घ्यायची होती. जरूरीचे सामान एका बाजूला काढण्यांत आले. बाकी सारे एका खोलीत ठेवण्यांत आले. आईबाप खाली आवराआवर करीत होते. गुणा वर मित्राला पत्र लिहीत होता. ते लिहीत असतां त्याच्या डोळ्यांतून अपार अश्रु येत होते. तो आज जाणार होता. आपला मित्र आपल्या जीवनात किती खोल गेला आहे ते त्याला अधिकच तीव्रतेने स्पष्टपणे कळून आले. पापण्यांच्या तुळशीपत्रांनी डोळ्यांतील पाणी शिंपडून ते पत्र पवित्र करण्यांत आले होते. हृदयगंगेचे पावन पाणी! ते पत्र त्याने पाकिटात घातले. त्यावर पत्ता लिहिला. तो पटकन् बाहेर गेला. पोस्टाच्या पेटीजवळ गेला. ते पत्र घेऊन तेथे तो उभा होता. वियोगाचे पत्र! चिरवियोगाचे पत्र! परंतु आपले मनोमय चिरमीलनच आहे हे दाखविण्यासाठी तर ते वियोगपत्र होते. ते पत्र त्याला पेटीत टाकवेना. जगन्नाथच्या हृदयाला प्रहार करणारे, रडवणारे पत्र! आयुष्यांतील हे जगन्नाथला लिहिलेले पहिलेच पत्र! आजपर्यंत ते दोघे येथेच होते. सदैव बरोबर. कधी पत्र लिहिण्याची जरूर भासली नाही. आजचे हे पहिले पत्र. आणि कदाचित् शेवटचेहि. बाबांची इच्छा अज्ञात राहण्याची. काय वाटेल हे पत्र वाचून जगन्नाथला? हा मित्रद्रोह नाहीं का? स्नेहाची, प्रेमाची फसवणूक नाही का? परंतु वडिलांची इच्छा आहे. घुटमळत शेवटी ते पत्र त्याने पेटीत टाकले. तो अंजनीच्या काठी जाई. दु:खी असताना जाई. आपले अश्रु अंजनीच्या पाण्यांत मिसळण्यासाठी जाई. परंतु असा रात्री एकटा कधी आला नव्हता. रात्री आलाच तर बरोबर जगन्नाथ असायचा. आज तो एकटा होता. आज चांदणे नव्हते. आज अंधार होता. पाण्यांत तारे चमचम करीत होते. गुणाने ओंजळीत अंजनीचे पाणी घेतले. तो ते पाणी प्याला. पुन्हा ही गुणगुणणारी अंजनी त्याला कधी दिसणार होती? अंजनीच्या किती आठवणी! जगन्नाथ व तो तिच्या पाण्यांत लहानपणी डुंबत. एकमेकांचे अंगावर पाणी उडवीत. जणुं हृदयांतील प्रेमाच्या कारंजाचे तुषारच ते एकमेकांवर फेकीत. जणु प्रेमाची फुले ते उधळीत. आणि एकदा त्याला दगड लागला होता पाण्यांतील, तर जगन्नाथने टरकन् धोतर फाडून पट्टी बांधली—सारें गुणाला आठवत होते. त्या स्मृति पुन्हा सजीव, ताज्या करून तो उठला. त्याने हात जोडले. अंजनीला प्रणाम केला. ती सर्वांची माता होती. लोकमाता!
वारा येत होता. जगन्नाथच्या मळ्यावरून येणारा वारा. तेथील फुलांचा सुगंध आणणारा वारा! असा वारा आता पुन्हा कधी मला भेटेल, पुन्हा कधी माझ्या अंगावर खेळेल, माझे अश्रु पुशील?
शेवटी गुणा उठला. बरीच रात्र झाली होती. तो घरी आला. त्याचे कपडे वगैरे सारे बांधण्यांत आले. सारंगी घेण्यांत आली. सारी तयारी झाली होती. घरांतील देव बरोबर होते. देव बरोबर असला म्हणजे आणखी काय हवें?
मध्यरात्र होऊन गेली. आणि एक गाडी आली. हळूच सामान तीत ठेवण्यांत आले. भांडी जरा वाजली. घरांतील दिवा विझवून तो बरोबरच घेण्यांत आला. कुलूप लागले. कुलूप लावताना रामराव रडले. डोळ्यांतून पाणी पडले. तिघे गाडीत बसली. निघाली गाडी.