“मी येऊं ना गुणा?”
“नको आतां. पुन्हां तुला पोचवायला मला यावे लागेल.”
“मग ये. तेवढ्याने पाय दुखतील वाटतं तुझे?”
“बरे चल.”
इंदु व गुणा दोघं निघून गेली. गुणाची आई वाटच पहात होती.
“किती रे उशीर गुणा?” आई म्हणाली.
“सारखें वाजवीत बसला हा. शेवटी मी उठवले तेव्हा आला.”
“चला आतां जेवायला. इंदु, तुझे झाले का जेवण?”
“जेवण झाले परंतु पोट भरले नाही.”
“मग जेव येथे. घे पान.”
“गुणाच्या आई, तुम्ही सारी बसा. मी वाढतें. उरेल ते मग मी जेवीन.”
“मग पुष्कळ आहे हो. बस गुणाबरोबरच.”
“नाही. तुम्ही आधी बसा. आज मी तुम्हांला वाढीन. मला इच्छा झाली आहे.”
“वाढूं दे ग आई. वाढतां येते की नाही ते तरी कळेल.” आणि खरेच रामराव, गुणा, गुणाची आई जेवायला बसली. आणि इंदु वाढूं लागली.
गुणा रेंगाळत जेवत होता.
“काय रे जेवत नाहींस तो?” आईने विचारले.
“भूक नाही आज.”
“इंदूला उरावे म्हणून काळजी की काय?”
“तसें नाही ग आई.”
ती बसली नाहीं म्हणून त्याला वाईट वाटत असेल. इंदु, तू आतां बस. आम्हांला काही नको.” रामराव म्हणाले.