“इंदु, लहानांपेक्षा मोठ्यांनाच अधिक वाईट वाटेल. कारण त्यांचा अधिक काळ त्या घरांत गेलेला असतो. अधिक स्मृतिबंधने असतात. गुणाला वाईट वाटेल. त्यांपेक्षा मला वाईट वाटेल. गुणा अजून वाढत आहे. तो जीवनांतील नवीन संबंध अजून जोडू शकेल. परंतु आमचे वय झाले. आमच्या जीवनाचे झाड आतां दुसरीकडे पोसणार नाही. तेथे ते मरेल.”

“तुम्ही एरंडोलला पुन्हां जा.”

“कसे जायचे? मान खाली घालून?”

“गुणा शिकून मोठा होईल. मग जा घरी.”

“देवाची इच्छा असेल तसे होईल.”

एके दिवशी सकाळी रामराव शिकवायला आले होते. इंदु घरांत काही तरी आईजवळ मागत होती. रामराव आल्याचे तिला कळले.

“आई, त्यांना पण दे ना एक वडी.” ती म्हणाली.

“दे नेऊन.” आई म्हणाली.

इंदूने श्रीखंडाच्या वड्या रामरावांना नेऊन दिल्या.

“मी येते हं.” असे म्हणून ती आंत गेली. रामरावांनी तेथला एक कागद घेऊन त्यांत त्या दोन वड्या गुंडाळून खिशात ठेवल्या. इंदु आली.

“तुम्ही खाल्लीत वडी?”

“ठेवली आहे.”

“खा ना.”

“आतां नको; मग खाईन.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel