“असा कसा पण तो सोडून गेला?”

“लग्नांतच त्याचे लक्षण दिसत होते. खादीचे कपडे घालून लग्नाला आला. त्या पासोड्या घालून, ती दीड दमडीची टोपी घालून लग्नाला बसला. गेला निघून कोठे तरी.”

“आणि या त्या आश्रमांत जाऊन बसल्या.”

“त्यानेच पोचविले असेल व आपण निघून गेला.”

“परंतु आतां त्याचा पत्ता ताहीं. पत्रहि म्हणे येत नाही.”

“या जात का नाही धुंडायला? आणावा शोधून.”

“बसतात चरखा फिरवीत.”

“त्यांच्या मनाला काही वाटत कसे नाही?”

‘वाटायचे काय? येथे काम ना धाम. भाऊ लाड करताहेत. काय कमी आहे?”

“एखादे वेळेस त्या फोटोसमोर खोटे रडतात. खरे प्रेम असते तर गेल्या असत्या त्याच्या पाठोपाठ. नाहीतर जीव देत्या.”

“त्या म्हाता-या सासूसास-यांचे मात्र हाल. खुशाल आपल्या माहेरी निघून आल्या.”

“आणि येथे अशा राहणार किती दिवस? आपल्यालाहि लाज वाटते. चार बायका विचारतात. काय सांगायचे त्यांना? मान खाली घालावी झालं!”

“एखाद्या आश्रमांत कायमच्या का नाही जात?”

“व्हा म्हणावे जोगीण.”

इतक्यांत वडील भाऊ बाहेरून आला. त्यांची बोलणी थांबली.

“अंबु कोठे आहे?”

“त्या असतात वर. खाली कशाला येतील त्या? त्यांचा चरखा नि त्या.”

भाऊ वर गेला. तो बहिणीच्या डोळ्यांतून धारा गळत होत्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel