“तुला देवानें कंठ दिला.”
“मला गायन, तुला वादन. आपणां दोघांत का संपूर्ण संगीत देवानें ठेवून दिलें? दोघे मित्र बना. दोघे मिळून कला पूर्ण करा, असें का तो सांगत आहे? दोन देहांत एक मन, एक आत्मा, एक कला, खरें ना? आणि मग एक दिवस भिकारी परत घरीं येतील?”
“ओळखील का रे आपणांस? तुझी पत्नी तुला ओळखील का? भगवान् बुद्ध असेच पुन्हा घरीं आले. दारांत हातीं भिक्षापात्र घेऊन उभे पाहिले. आणि त्यांची पत्नी यशोधरा बाहेर येऊन त्यांच्या पायीं लागली.”
“तूं कांहीं तरी बालतोस.”
“कांहीं तरी काय? जगन्नाथ, लग्न करूनच बाहेर पड.”
“आणि तूं?”
“माझें थोडेंच ठरलेलें आहे लग्न. आमच्यांत आधींपासून ठरवीत नाहींत. सारें आयत्या वेळेस. मी मोकळा आहें.”
“परंतु तुझी आई रडेल. तूं एकुलता एक. तुझ्यावर किती प्रेम, किती लोभ!”
“आणि तुझ्यावर तुझ्या आईचें नाहीं वाटतें प्रेम?”
“परंतु मी का एकुलता आहें? दोन मोठे भाऊ आहेत. त्यांचीं लग्ने झालीं आहेत. आई त्यांचीं मुलें खेळवीत असते. नातू झाले म्हणजे मुलावरचें प्रेम कमी होतें.”
“ज्याला मुलें झालीं त्याच्यावरचें प्रेम कमी होत असेल. परंतु ज्याचा अद्याप संसार मांडला गेला नाहीं, जो लहान आहे, त्याच्यावर प्रेम असतेंच. उलट इतर मुलांवरचेंहि याच्या वांटणीस येतें. तो अधिकच आवडता होतो.”
इतक्यांत जगन्नाथची आई लाडू घेऊन वर आली.
“तुला सांगितलें होतें ना रे लाडू मागून घे म्हणून. अगदीं हो जगन्नाथ तूं हट्टी.”
“आई आहे तोंपर्यंत हट्ट. पुढें कोण चालवणार आहे हट्ट? आई, बसना.”
“गुणा, तुझ्याशिवाय हा लाडू खाईना. म्हणे तो आला म्हणजे मग खाऊं. आणि बसलेत तुम्ही दोघे बोलत.”