“अरे असाच का जन्म काढणार तुम्ही? जायचे असेल तर आतांच तूहि कां नाहीं गेलास? आज तूं येथे एकटा. पुन्हा ती आली म्हणजे ती एकटी. तुम्हांला दोघांना एकत्र नांदताना पाहण्याचे आमच्या का नशिबीच नाही? आमच्या डोळ्यांना ते सुख नाही का दिसणार? तुम्हांला असें एकटें पाहून बरे नाही वाटत जगन्नाथ. आजच आलास. परंतु माझे आता एवढे तरी ऐक. तूं आताच कुठे ये जाऊन थोडे दिवस. इंदिरा व तू या काय शिकून यायचे ते. परंतु लौकर दोघे या. दोघांना एकत्र नांदतांना पाहून, संसार नीट करतांना पाहून मग आमचे डोळे मिटोत!”
“बरे हो आई.”
काही दिवस निघून गेले. आणि जगन्नाथ खरोखरच निघून गेला. आईबापांचा निरोप घेऊन निघून गेला. महाराष्ट्र सोडून दक्षिण हिंदुस्थानात जावयाचे त्याने ठरविले. श्रीरंगम्, मदुरा, कांची, त्रिचनापल्ली, कुंभकोण, रामेश्वर सारे पहावयाचे त्याने ठरविले. तो त्रिचनापल्ली पाहणार होता. अड्यार येथील थिऑसफीची सुंदर संस्था पहाणार होता. म्हैसूर, बंगलोर व मलबार किनारा पहाणार होता. इकडे कृष्णेच्यावर जाऊन आंध्रदेशाचेहि दर्शन घेण्याचे त्याच्या मनांत होते. मच्छलीपट्टण येथे प्रख्यात चित्रशाळा महाविद्यालय आहे ते तो पहाणार होता.
नवे, जुने सारे पाहण्याची त्याला इच्छा होती. पंपा, किष्किंधा, कोठे असतील ती स्थाने, ती अमर स्थाने? जगन्नाथला ती पाहण्याची हुरहुर होती. शंकराचार्यांची, रामानुजाचार्यांची जन्मभूमी पहाण्याची त्याला उत्कट इच्छा होती. नवीन आश्रम पाहू म्हणत होता. ग्रामोद्योगाची केन्द्रे, व त्याप्रमाणे प्रचंड विद्युतनिर्मितिगृहेहि तो पहाणार होता.
जगन्नाथ जा. दक्षिण भारताचे दर्शन घेऊन ये. दक्षिणेकडील मलयगिकीचा चंदनी सुगंध घेऊन ये. दक्षिणेकडील फुलांचा सुवास घेऊन ये. तिकडील सुखदु:खाच्या गोष्टी आण.
मुलगा व सून दोघे गेली. पंढरीशेट व जगन्नाथची आई दोघे घरांत राहिली. एक कारभारी होता. तो सर्व पहात होता.
“आई, तू माझ्याकडे चल राह्यला.” वडील मुलगा येऊन म्हणाला.
“येथेच बरं आहे. कोठे जा ये आता नको. अजून माझ्याच्याने होते आहे भातभाकरी करवते आहे. येतील इंदिरा व जगन्नाथ. आम्हांला सोडून फार दिवस थोडीच राहणार आहेत दूर?”
“आम्ही का तुझी सावत्र आहोत?”
“तसे नाही रे. परंतु पुन: घराला कुलूप लावून तुमच्याकडे येणे बरे नाही वाटत. घर उघडे राहूं दे. केरसुणी फिरू दे. देवांची पूजा होऊ दे. जगन्नाथचे घर बंद नको.”