“तरीहि तुला आवडत असे म्हणून मी ते करीन.”

“इंदु, एखादे काम का दुस-यासाठीं म्हणून करायचें? तें काम सेवेचें आहे, पवित्र आहे, म्हणूनच आपण नको का करायला?”

“हळूहळू तसे मनुष्य शिकेल. तूं दयाराम भारतींपासून शिकलास. मी तुझ्यापासून शिकेन.”

गुणा आतां एकदम वाढला. त्याची उंची वाढली. अंगानें तो आतां भरदार दिसूं लागला. आपण एकदम मोठे झालो असे त्याला वाटू लागले. तो चांगला दिसे. कोणाच्याहि डोळ्यांत भरण्यासारखा दिसे.

एके दिवशी सायंकाळी गुणा जरा उशिरां इंदूकडे आला. इंदु वाट पहात होती.

“उशीरसा झाला तुला?”

“एखादे वेळेस होतो उशीर.”

“पण मी वाट पहात असत्ये गुणा.”

“तुला नाही उद्योग.”

“मला एकच उद्योग. वाजवण्याचा उद्योग.”

“तरी अजून नीट वाजवतां येत नाही.”

“या जन्मीं तें शक्य नाहीं.”

“मला असे निराशेचे शब्द आवडत नाहींत.”

“गुणा, सा-या गोष्टी सर्वांना कशा येतील? तुझा मित्र जगन्नाथ गाणारा आहे. तुला येते का गातां?”

“प्रयत्न केला असता तर गाणारा झालो असतो.”

“आवाजाची देणगी हवी गुणा.”

“माझा आवाज का वाईट आहे?”

“तुझें बोलणे गोड वाटते. तुझे बोलणे म्हणजेच गाणे.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel