“कशाला रे?”
“दयाराम भारतींना भेटायला.”
“ते तुरुंगात ना आहेत?”
“त्यांना भेटायला परवानगी असते. आपणांस त्यांच्याजवळ बोलता येते. काही सामान देता येते. किती तरी दिवसांत ते भेटले नाहीत. दोन वर्षे होतील. त्यांना पाहून येईन. उद्याच जाईन. भेटण्याची परवागनी आली आहे.”
“जगन्नाथ, मला भीति वाटते. तूं तुरुंगात वगैरे नको हो जाऊ. दयाराम भारती तुला काही तरी सांगतील व तूहि आम्हांस सोडून तुरुंगात जाऊन बसायचास. आमचे एकदा डोळे मिटू देत व मग काही करा.”
“आई, कोण जात आहे तुरुंगात? आणि तुम्ही जाऊ तरी कोठे देता? नुसते त्यांना भेटून यायचे.”
“आणि तू शिरपूरला कधी जाणार आहेस?”
“कशाला?”
“आपली बायको तूच घेऊन ये. मी रे किती दिवस स्वयंपाक करूं?”
“तुझ्या हातचाच मला आवडतो स्वयंपाक.”
“आहे माहीत. बायकोच्या हातचेच हो सर्वांना गोड लागते. ती आली नाही, तिच्या हातचे खाल्ले नाहीस तोच आईच्या हातचे गोड.”
“आणि मी कसा जाऊ तिला आणायला?”
“तूंच जा. दुसरे कोण जाणार?”
“दादाला सांग. तो घेऊन येईल.”
“दादा आवडत नाही ना तुला?”
“म्हणजे का आम्ही वैरी आहोत आई? गरिबाला छळलेले मला नाही आवडत. दुसरे काय?”
“जगन्नाथ, तू खरोखरच का कोठे निघून जाणार आहेस?”