आगगाडींत जगन्नाथ हंसला नाही, बोलला नाही. अद्याप तो भूतकालीन स्वप्नांत होता. त्या स्वप्नाचा आवेग कमी झाला नव्हता. मध्येंच त्याच्या डोळ्यांत पाणी येई. शून्य दृष्टींने तो खिडकींतून बाहेर पहात होता.

“गुणा, हृदय कसें ओथंबून आलें आहे ! किती स्मृति, किती प्रसंग ! आणि कालची ती काळरात्र. जीवनाच्या इतक्या जवळ का मृत्यु असतो ?

आनंदाच्या इतक्या जवळ का दु:ख असते? भीमेच्या तीरावर, चंद्रभागेच्या तीरावर किती आनंदाने आम्ही बसलो होतो आणि घटकेत सारा खेळ खलास! सारे दिवे मालवले गेले! सारे शून्य झाले. दु:ख जणुं छायेप्रमाणे सुखाच्या मागोमाग असते.”

“जगन्नाथ, हे जीवन म्हणजे खिचडी आहे. हे जीवन सुखदु:खाचे मिश्रण आहे. येथे दिव्याखाली अंधार असतो. प्रकाशाशेजारी सदैव छाया असते. फळांत कीड असते, चंदनाला विळखा घालून साप बसलेला असतो. हास्य व अश्रु शेजारीशेजारी आहेत. दु:खाचेहि अश्रु व सुखाचेहि अश्रु. याचा अर्थ मला इतकाच वाटतो की सुख काय दु:ख काय—शेवटी एकरूपच आहे. जीवन काय मरण काय, शेवटी एकरूपच आहे सारे. सर्वांचे शेवटी एका महान् सत्यांत रुपांतर होत असेल. जीवनाला दिवस व रात्र दोहों मिळून शोभा आहे.”

“आतां चाळीसगांव येईल. आपण येथेच उतरायचे का?”

“सरळ जळगांवला जाऊ. रात्रीच्या गाडीने घरी जाऊं.”

“धुळ्याला गेलो तर? दयाराम भारतींना भेटूं. त्यांना किती दिवसांत मी पत्र लिहिले नाही. ते असतील का तरी येथे? तुला आहे का काही माहिती?”

“जगन्नाथ, दयाराम देवाघरी गेले.”

“आणि मीच एकटा कपाळकरंटा कसा राहिलो?”

“क्रान्ति करण्यासाठी. दयारामांनी मरतां मरतां आदेश दिला की क्रान्तीसाठी जगा, झिजा. मरा. तूं व मी क्रांतींत शिरू. विराट जागतिक क्रांति. आपण आपला तालुका संघटित करूं. तुला शेतकरी देव मानतात. त्यांचा पुढारी हो. मी त्यांच्या शारीरिक रोगांवर इंजेक्शने देईन. तू त्यांच्या निराश मनांस इंजेक्शने दे. आपण त्यांना उठवूं. इंदु व इंदिरा त्यांच्यांत जातील. साक्षरतेचे स्त्रियांचे वर्ग जागोजाग काढतील. त्या दोघी स्त्रियांतहि चैतन्य ओततील. शेतक-यांच्या आयाबायाहि झुंजार होऊं देत.”

“कावेरी असेच म्हणे. स्त्रियांत चळवळ न्या असे ती म्हणे. आणि क्रान्तीची ज्वाला पेटवा, तुम्ही जगा असे सांगत ती निघून गेली. करूं. आपण क्रान्ति करूं. सारे रान उठवू. सारी घाण जाळूं. जुलुमाची, अन्यायाची, वतनदारीची घाण! पिळवणुकीची घाण! शिलगवूं महान् अग्नि व सारी खोटी व भ्रामक विषमता भस्म करूं. सर्वांच्या विकासास वाव मिळो. सर्वांच्या गुणांना प्रकट व्हायला संधि. गुणा, परंतु मी गळून गेलो आहे. जणुं हतबल झालो आहे.”

“इंदिरा तुला नवचैतन्य देईल. स्त्री म्हणजे पुरुषाची शक्ति. ती तुझी वाट पाहत असेल.”

“स्त्रिया त्यागमूर्ति आहेत.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel