जगन्नाथ दुस-या दिवशी धुळ्याला गेला. दयाराम भारती आपल्या खोलीत होते. आपल्या भेटीस कोणी येईल याची त्यांना कल्पनाहि नव्हती. परंतु अकस्मात् त्यांना बोलावण्यांत आले. त्यांना आश्चर्य वाटले. कोण येत आहे त्याची वाट पहात ते बसले. तो जगन्नाथ दृष्टीस पडला. त्यांनी त्याला ओळखले.

जगन्नाथ आला व त्याने भक्तिपुरस्सर प्रणाम केला. एका खुर्चीवर जगन्नाथ बसला.

“आम्ही वर्तमानपत्रांत वाचले की तुम्हाला येथे आणले म्हणून. तुम्ही प्रवेशबंदीचा हुकूम मोडलात. होय ना?”

“हो.”

“किती दिवस अटक करून ठेवणार?”

“सरकारच्या इच्छेवर आहे.”

“मी आता काय करू ते तुम्हांला विचारावयास आलो आहे. गुणा माझा मित्र, तो एरंडोल सोडून गेला. तो, त्याचे आईबाप कोठेतरी गेले. सावकारांस कंटाळून गेले. कोठे गेले कोणासट माहीत नाही. माझे अभ्यासांत लक्ष लागत नाही. मॅट्रिक नापास झालो. माझे लग्न झाले आहे. आई व बाबा मजजवळ असतात. कोठे तरी एरंडोल सोडून जावे असे माझ्या मनात येते. पंचवीस वर्षाचा होईपर्यंत संसार नको असे मी मनांत ठरविले आहे. पाच वर्षे हिंदुस्थानभर जावे. परंतु उगीच ध्येयशून्य हिंडण्यांत काय अर्थ? काय करू मी, सांगा.”

“मी काय सांगू? तुझ्या वृत्तींना अनुसरून तू वाग. तू मागे एकदा म्हणत होतास की दक्षिण हिंदुस्थानात जावे. दाक्षिणात्य संगीत शिकावे. जा दक्षिण हिंदुस्थानात. दक्षिणची संस्कृति महाराष्ट्रांत आण. आज हिंदुस्थानातील प्रांतांना एकमेकांची ओळख नाही. ही सांस्कृतिक ओळख करून घेणे हेहि महत्त्वाचे काम आहे. सारा हिंदुस्थान माझा असे आपणांस तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा सारा हिंदुस्थान आपण जाणू. तू कलावान आहेस. धकाधकीचे राजकारण कदाचित् तुझ्या वृत्तीस मानवणार नाही. तू दुसरे काम कर. महाराष्ट्राला दक्षिण हिंदुस्थानचा परिचय घडव. दक्षिणेकडील गगनचुंबी मंदिराची ओळख महाराष्ट्रांतील गगनभेदी पर्वतांना व गडांना करून दे. कावेरीची ओळख कृष्णा गोदावरींना करून दे. सेतुबंध रामेश्वरची स्मृति पंटवटीच्या रामाला आण. विजयनगरची आठवण पुणे साता-याला आण. चंदीतंजावरला महाराष्ट्राची पुन्हा आठवण येऊ दे. जगन्नाथ, दक्षिणेकडील कलांचा आत्मा घेऊन ये. त्याबरोबर विधायक कामे पाहून ये. श्री. राजगोपालाचारी यांचा थोर आश्रम पाहून ये. खादीकेन्द्रे पाहून ये. मधुसंवर्धन विद्येचे आश्रम पाहून ये. तू श्रीमंत आहेस. तुझी संपत्ति या कामांत ओत. विधायक येवेत ओत. शेतक-यांची स्थिति सुधार. स्वस्त धान्य, स्वस्त बी, बियाणे त्यांना मिळेल असे दुकान काढ. शास्त्रीय गोसंगोपनाची संस्था काढ. भगवान् कृष्ण मुरली वाजवीत व गाई चारीत. तूं, गुणा गा, सारंगी वाजवा व गाईची स्थिति सुधारा. भारतवर्षात आज ज्ञान पाहिजे आहे. प्रत्येक क्षेत्रांत प्रयोग पाहिजे आहेत. त्या कामाला वाहून घे. मी काय सांगू? माझे काम निराळे. माझे काम आग लावण्याचे. कोणाला स्थिर, शांत, विधायक काम, तर कोणाचे सारी घाण गोळा करून काडी लावण्यांचे काम!”

“मी जाईन दक्षिणेकडे. घरी मन लागत नाही. गुणाचीहि आठवण येते. आईला व बाबांना वाईट वाटेल; परंतु कॉलेजात गेलो असतो तर चार पाच वर्षे दूर राहिलोच असतो ना, अशी त्यांची समजूत घालीन.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel