“जमले तर सारे. मी उद्यापासून हायस्कूलमध्ये नाव घालीन मॅट्रिकच्या वर्गात. माझा अभ्यास बराचसा झालेला आहे. आणि इकडची मॅट्रिक म्हणे जरा सोपी असते. होय ना? असे तुमच्याकडचे विद्यार्थी म्हणतात. तिकडे नापास होणारे इकडे येतात परीक्षेसाठी.”

नवीन जागा झाडलेली होती. स्वच्छ होती. कुलूप लावून सारी मंडळी परत आली. रामाने एक खटारा आणला. त्यांत सारे सामान घालण्यांत आले. रामराव, गुणा व त्याची आई निघाली. बरोबर रामा गडी होता.

नवीन बि-हाडांत सामान नेण्यांत आले, ते नीट लावण्यांत येऊं लागले. खिळे, चुका वगैरे मारण्यांत येऊ लागल्या, व्यवस्था होऊ लागली. एका खेलीत स्वयंपाक. एक बैठकीची खोली. एक गुणाला अभ्यासाला. सामान अगदी बेताचेच होते. जरुरीपुरते. त्यामुळे फार अडगळ नव्हती. पसारा नव्हता. स्वयंपाकघरांत एक कोनाड्यात देव ठेवण्यांत आले. त्यांना रामरावांनी नमस्कार केला.

रामा गडी निघून गेला. ही तिघे अजून सामान नीट लावीतच होती. गुणाच्या आईने भांडी खाली नळावर नेली. ती घासली व वर आणली. गुणा आपली खोली लावूं लागला. त्याने जगन्नाथचा तो सुंदर फोटो लाविला. आणि सकाळी इंदूने त्याला जो सुंदर हार घातला होता तो त्याने त्या फोटोला घातला. त्याने आपली सारंगी एका बाजूस ठेवली. इतरहि फोटो होते. एक जवाहरलालांचा, एक दयाराम भारती यांचा. तेहि त्याने लावले. त्याने पुस्तके एकीकडे ठेवली. एक सतरंजी घालून तीवर तो जरा बसला. परंतु उठला. आईला मदत करायला गेला.

इतक्यांत इंदु आली.

“झालं का लावून सामान?”

“हो. आहे तरी कितीसें? आतां खालून पाणी आणते.”

“आई, मी देतो पाणी आणून.”

“परंतु आज कशाला पाणी भरतां? आजच्या रात्री आमच्याकडेच जेवा. मी सांगण्यांसाठीच आल्ये आहे. उद्यांपासून करा इकडे स्वयंपाक.”

“परंतु झोपायला इकडेच येऊ. रात्री पाणी नाही का लागणार?”

“तिकडेच झोपा ना. केवढे थोरले आमचे घर आहे!”

“परंतु वळकट्या इकडे आणल्या आहेत.”

“आमच्याकडे पुष्कळ गाद्या. पुष्कळ आहे पांघरुणे.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel