[१५]
मनुष्यांतील जातिभेद नैसर्गिक आहेत काय?


एके समयीं बुद्धगुरू इच्छानंगल नांवाच्या गांवाजवळ इच्छानंगल नांवाच्या उपवनांत रहात होता. त्या कालीं पुष्कळ प्रसिद्ध ब्राह्मण इच्छानंगल गांवीं रहात होते. एके दिवशीं वासिष्ठ आणि भारद्वाज या दोन तरुण ब्राह्मणांमध्यें असा वाद उपस्थित झाला कीं, मनुष्य जन्मानें श्रेष्ठ होतो किंवा कर्मानें श्रेष्ठ होतो?

भारद्वाज आपल्या मित्राला म्हणाला "भो वासिष्ठ, ज्याच्या आईच्या बाजूला आणि बापाच्या बाजूला सात पिढ्या शुद्ध असतील, ज्याच्या कुलांत सात पिढ्यांपर्यंत वर्णसंकर झाला नसेल, तोच ब्राह्मण श्रेष्ठ होय."

वासिष्ठ म्हणाला "भो भारद्वाज, जो मनुष्य शीलसंपन्न आणि कर्तव्यदक्ष असेल, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतों."

पुष्कळ वादविवाद झाला; तथापि ते दोघे परस्परांचें समाधान करूं शकले नाहींत. तेव्हां वासिष्ठ म्हणाला "भो भारद्वाज, आमचा हा वाद येथें तुटावयाचा नाहीं. हा श्रमणगौतम आमच्या गांवाजवळ राहत आहे. तो बुद्ध आहे, पूज्य आहे आणि सर्व लोकांचा गुरू आहे अशी त्याची कीर्ति सर्वत्र पसरली आहे. आपण त्याजपाशीं जाऊन त्याला आपला मतभेद कळवूं, व तो जें सांगेल तें मत मान्य करूं."

तेव्हां ते दोघे बुद्धापाशीं गेले व बुद्धाला कुशलप्रश्नादि विचारून एका बाजूला बसले. वासिष्ठ म्हणाला "भो गौतम, आम्ही दोघे सुशिक्षित ब्राह्मणकुमार आहोंत. हा तारुक्ष्याचा शिष्य आहे, आणि मी पौष्करसादीचा शिष्य आहें. त्या आमचा जातिभेदासंबंधानें विवाद आहे. हा म्हणतो 'जन्मामुळें ब्राह्मण होतो,' आणि मी म्हणतों 'कर्मामुळें ब्राह्मण होतो.' आपली कीर्ति ऐकून आम्ही येथें आलों आहों. आतां आमच्यापैकीं कोणाचें म्हणणें खरें आहे, आणि कोणाचें खोटें आहे, हें आपण आम्हांला समजावून द्यावें."

बुद्ध म्हणाला "वासिष्ठ, तृण, वृक्ष इत्यादि वनस्पतींमध्यें निरनिराळ्या जाति आढळतात, तशाच त्या किडे, मुंग्या इत्यादि बारीकसारीक प्राण्यांमध्येंहि आढळतात. सर्पाच्या जाति अनेक आहेत. श्वापदांच्या जातिहि अनेक आहेत. पाण्यांत रहाणार्‍या मत्स्यांमध्यें आणि आकाशांत उडणार्‍या पक्ष्यांमध्यें देखील अनेक जाति आढळून येतात. निरनिराळ्या जातींचें चिन्ह या सर्व प्राण्यांमध्यें स्पष्ट दिसून येतें; पण तें मनुष्यांमध्यें आढळून येत नाहीं. केंस, कान, डोळे, तोंड, नाक, ओंठ, भिवया, मान, पोट, पाठ, हात, पाय, इत्यादि सर्व अवयवांनीं एक मनुष्य दुसर्‍या माणसाहून अगदींच भिन्न होऊं शकत नाहीं. अर्थात् पशुपक्ष्यादिकांत जशा आकारादिकांनीं निरनिराळ्या जाति आढळून येतात, तशा त्या मनुष्यप्राण्यांत आढळून येत नाहींत. सर्व मनुष्यांचे अवयव जवळजवळ सारख्याच आकाराचे असल्यामुळें मनुष्यामध्यें आकारावरून जातिभेद ठरविणें शक्य नाहीं. परंतु कर्मावरून मनुष्याची जाति ठरवितां येणें शक्य आहे. एकादा ब्राह्मण गाईचें पालन करून निर्वाह करीत असेल, तर त्याला गवळीच म्हटलें पाहिजे, ब्राह्मण म्हणतां कामा नये. जो कोणी शिल्पकलेनें उपजीविका करितो, त्याला कारागीर समजलें पाहिजे. जो व्यापार करितो, तो वाणी होय; जो दूताचें काम करितो, तो दूत होय; जो चोरीवर उपजीविका करितो तो चोर होय; जो युद्धकलेवर उपजीविका करितो, तो योद्धा होय; जो यज्ञयाग करून उपजीविका करितो, तो याजक होय, आणि जो राष्ट्रावर स्वामित्व चालवितो, तो राजा होय. परंतु या सर्वांना केवळ जन्मामुळें ब्राह्मण म्हणतां यावयाचें नाहीं.

"सगळीं संसारबंधनें छेदून जो कोणत्याहि प्रापंचिक दु:खाला भीत नाहीं, कोणत्याहि गोष्टीची ज्याला आसक्ति नाहीं, त्याला मी ब्राह्मण म्हणतों. दुसर्‍यांनीं दिलेल्या शिव्यागाळी, वध, बंध, इत्यादि जो सहन करितो, क्षमा हेंच ज्याचें बळ आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतों. कमलपत्रांवरील उदकबिंदूंप्रमाणें जो इहलोकींच्या विषयसुखापासून अलिप्त रहातो, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतों.

"जन्मामुळें ब्राह्मण होत नाहीं किंवा अब्राह्मण होत नाहीं. कर्मानेंच ब्राह्मण होतो आणि कर्मानेंच अब्राह्मण होतो. शेतकरी कर्मानें होतो, कारागीर कर्मानें होतो, चोर कर्मानें होतो, शिपाई कर्मानें होतो, याजक कर्मानें होतो, आणि राजादेखील कर्मानेंच होतो. कर्मानेंच हें सगळें जग चालत आहे. अणीवर अवलंबून जसा रथ असतो, तसे सर्व प्राणी आपल्या कर्मावर अवलंबून असतात."

हा बुद्धाचा उपदेश ऐकिल्यावर वासिष्ठ आणि भारद्वाज बौद्धोपासक झाले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel