[१३]
सुंदरी परिव्राजिका

श्रावस्तीमध्यें बुद्धाचा उपासकसमुदाय वाढत गेल्यामुळें भिक्षुसंघाला अन्नवस्त्राचा मोठा लाभ होऊं लागला. तें पाहून कांही परिव्राजकांच्या पोटांत दुखूं लागलें. `येन केन प्रकारेण’ बुद्धाची बेअब्रू करण्याचा त्यांनी एक कट उभारिला. त्यांच्या पथांमध्ये सुंदरी नांवाची एक परिव्राजिका होती. बुद्धावर खोटा आरोप आणण्याच्या कामीं त्यांनी तिची योजना केली. त्यांच्या शिकवणीप्रमाणें ती रोज रात्रीं जेतवनाच्या बाजूला जाऊन शेजारच्या परिव्राजकाच्या आश्रमांत रात्र घालवून पहांटेला शहरांत येत असे. वाटेंत कोणीं प्रश्न केला असतां `आपण बुद्धाबरोबर एकाच ठिकाणी रहात असतें,’ असें उत्तर देत असे.

एके दिवशीं परिव्राजकांनी मारेकरी घालून सुंदरीला ठार मारिलें व जेतवनाच्या एका कोपर्‍यामध्ये केरकचर्‍यांत तिचें प्रेत लपवून ठेविलें. सुंदरी परिव्राजिका नाहींशी झाल्याचा बोभाटा सर्वत्र झाल्यावर परिव्राजिकांनी पसेनदिराजाला अर्ज केला, कीं, “आमच्यापैकीं एक परिव्राजिका नाहींशी झाली आहे, तिचा शोध करावा.” राजानें आपलें शिपाईबरोबर देऊन शंकास्थानें असतील तीं शोधून पहावीं, असा त्यांनां हुकूम केला.

परिव्राजिक म्हणाले “आम्हांला शाक्यपुत्रीय भिक्षूंची बळकट शंका येते. कांकीं, अलीकडे सुंदरी रोज रात्रीं बुद्धाच्या विहारांत जात असे, व बुद्धाचें आणि तिचें निराळ्या प्रकारचें नातें होतें अशी बातमी आमच्या कानीं आली आहे. कदाचित् आपल्या गुरूंचे कुकृत्य झांकण्यासाठी शाक्यपुत्रीयांनी बिचार्‍या सुंदरीला ठार मारून कोठें तरी गाडून टाकिलें असावें!”

राजाच्या परवानगींने परिव्राजिकांनी नगररक्षकांच्या (पोलिसांच्या) मदतीनें प्रथमत: जेतवनाची झडती घेतली, व कचर्‍याच्या राशींत लपविलेलें सुंदरीचें प्रेत शोधून काढिलें. राजाला जेतवनामध्यें सुंदरींचें प्रेत सांपडल्याचें वर्तमान समजल्यावर त्यानें तें सगळ्या शहरांत फिरवून लोकांना दाखविण्याची आज्ञा केली. परिव्राजिकांनी सर्व शहरभर सुंदरीचें प्रेत फिरवून बौद्धभिक्षूंची नालस्ती केली. जिकडेतिकडे सुंदरीचे प्रेत दाखवून “हें पहा शाक्यपुत्रीय श्रमणाचें कृत्य!” असें ते मोठमोठ्यानें ओरडत असत. यायोगें कांही श्रद्धावंत उपासकखेरीज करून श्रावस्तींतील इतर लोकांत बुद्धाविषयी आणि बौद्ध भिक्षूंविषयी अत्यंत तिटकारा पसरला. भिक्षूंना भिक्षा मिळण्याची मारामार झाली.

पण एवढ्यानें बुद्ध डगमगला नाहीं. तो म्हणाला “खोटे आरोप करणार्‍या मनुष्याची मी कांहीच किंमत समजत नाही. जो खोटें बोलतो व आपण केलेलें पापकृत्य दुसर्‍याच्या माथीं मारू पहातो, त्याला नरकावांचून दुसरी गति नाहीं!”

कांही दिवसांनी ज्या मारेकर्‍यांनी सुंदरीला मारिलें होतें, त्यांचे एका दारुच्या गुत्त्यांत परिव्राजिकांकडून मिळालेल्या पैशाच्या वांटणीसंबंधाने भांडण जुंपले. त्यांतील एकजण म्हणाला “सुंदरीला मारणारा मी. तेव्हां मोठा वांटा मला मिळाला पाहिजे.”

दुसरा म्हणाला “मीं जर तिचा गळा दाबला नसता, तर तिने आरडाओरड केली असती, व आमचें कृत्य तेव्हांच उघडकीस आलें असतें.”

हें त्या मारेकर्‍यांचें भांडण राजाच्या गुप्त हेरांनी ऐकिलें, व नगररक्षकाच्या मदतीनें त्यांना पकडून राजसभेत नेलें. तेथें त्यांनीं राजाला इत्यंभूत वर्तमान सांगून आपला गुन्हा कबूल केला. बुद्धावर आळ घालण्यासाठी उभारलेला कट याप्रमाणें उघडकीला आला, व परिव्राजिकांची फजीती झाली. लोकांची बुद्धाविषयी पूज्यबुद्धि द्विगुणित झाली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel