[६]
काशी आणि उरुवेला येथील कामगिरी


त्या कालीं वाराणसी नगरींत एका धनाढ्य व्यापार्‍याला यश नांवाचा अत्यंत सुकुमार पुत्र होता. त्याला रहावयासाठी तीन प्रासाद होते. एक पावसाळ्यांत, दुसरा हिवाळ्यांत, व तिसरा उन्हाळ्यांत रहाण्यासाठी सोयीवार पडावे, अशा बेतानें त्यांची रचना केली होती. यशाला प्रपंचामध्यें कोणत्याहि गोष्टीची वाण नव्हती; परंतु यशाचें मन संसारांत रमेनासें झालें. त्याला सर्व प्रापंचिक सुखें विषतुल्य वाटूं लागलीं.

एके दिवशी त्यांचे परिचारक झोंपीं गेले असतां तो जागा झाला, आणि आपल्या मृतप्राय परिजनांकडे पाहून आपणाशींच उद्गारला “काय हा उपद्रव! आणि काय हा उपसर्ग!”

आपल्या परिजनाला सोडून आपल्या वाड्यांतून यश एकाकी बाहेर पडला, आणि थेट नगरद्वाराकडे चालता झाला. मोठ्या आश्चर्याची गोष्ट ही, कीं, यशाला एवढ्या रात्रीं नगरद्वार उघडें सांपडलें. कांहीएक प्रतिबंध न होतां तो नगरांतून बाहेर पडला, व “काय हा उपद्रव, आणि काय हा उपसर्ग!” असें म्हणत थेट ऋषिपतनाकडे गेला.

त्या वेळी पहांट झाली असून भगवान बुद्ध पर्णशालेच्या बाहेरच्या बाजूला मोकळ्या जागेंत फिरत होता. तो यशाला पाहून आपल्या आसनावर येऊन बसला. भगवंताच्या जवळ आल्यावर यश “काय हा उपद्रव, आणि काय हा उपसर्ग!” हे शब्द पुन: उद्गारला.

बुद्ध म्हणाला “येथें उपद्रव नाहीं आणि येथें उपसर्गहि नाहीं. हे श्रेष्ठिपुत्र, या आसनावर बैस. तुला मी धर्मोपदेश करितों.”

तेव्हां यश बुद्धाजवळ जाऊन त्याला नमस्कार करून एका बाजूला तेथे असलेल्या एका आसनावर बसला.

बुद्धानें क्रमाक्रमानें दानापासून फायदे, शीलरक्षण केल्यापासून फायदे, स्वर्गलोकाप्राप्ति, कामासक्तींत दोष आणि एकांतवासांत गुण, इत्यादि गोष्टीसंबंधाने उपदेश केला; व जेव्हा यशाचें चित्त मृदु, अज्ञानाच्या आवरणापासून मुक्त आणि मुदित झालेले पाहिलें, तेव्हा त्याला त्यानें दु:ख, दु:खसमुदय, दु:खनिरोध आणि दु:खनिरोधगामी मार्ग या चार आर्यसत्यांचा उपदेश केला.

तो ऐकून यशाला त्याच आसनावर ज्ञानदृष्टि प्राप्त झाली. ज्या दु:खाचा समुदय होत असतो, त्याचा निरोधहि करतां येतो, या गोष्टीचा त्याला स्पष्ट बोध झाला.

दुसर्‍या दिवशीं सकाळीं यशाच्या घरीं मोठी गडबड उडून गेली. पूर्वरात्रीं यश घरांतून एकाकी निघून गेला, हे वर्तमान त्याच्या आई-बापांना समजतांच त्यांनी यशाच्या शोधासाठी चोहोंकडे स्वार पाठविले; आणि यशाचा पिता स्वत:  ऋषिपतनाच्या बाजूला त्याचा थांग लावण्यासाठीं गेला. पांच तपस्व्यांच्या पर्णशालेजवळ आल्यावर यशाच्या सुवर्णपादुकाची चिन्हें धुळीवर उमटलेली त्याच्या पहाण्यांत आली. तेव्हां त्या चिन्हांच्या अनुरोधानें जाऊन तो बुद्धाजवळ आला आणि म्हणाला “भगवन्! माझ्या यशाला तुह्मीं पाहिलें आहे काय?”

बुद्ध म्हणाला “हे गृहपति, तूं खालीं बस. तुझी व तुझ्या पुत्राची येथेंच भेट होईल.”

हे बुद्धाचे शब्द ऐकून यशाच्या पित्याला फार आनंद झाला व बुद्धाला नमस्कार करून तो एका बाजूला बसला. बुद्धाने त्याला क्रमश: दान, शील, इत्यादि गोष्टींचा उपदेश केल्यावर तो म्हणाला “ भगवान्, आपला धर्म अत्यंत सुंदर आहे. अंधकारामध्यें जसा प्रद्योत, तसा या प्रपंच-तिमिरामध्यें आपला धर्म आहे! आजपासून मी आपल्याला, आपल्या धर्माला आणि आपल्या भिक्षुसंघाला शरण जातों. माझ्या कुडींत प्राण असेपर्यंत मी आपला उपासक झालों आहें, त्या माझा आपण अंगीकार करा.”

तेव्हा आपल्या प्रभावानें बुद्धानें यशाची आणि त्याच्या पित्याची तेथल्या तेथेच भेट व्हावी, असा योगायोग जुळवून आणिला. यशाच्या पित्यानें जेव्हां जवळ बसलेल्या आपल्या मुलाला पाहिलें, तेव्हां तो त्याला म्हणाला “मुला, तुझ्या आईला अत्यंत शोक झाला आहे. तेव्हां एकवार तिची भेट घेऊन तिला जीवदान दे.”

यशानें आपल्या पित्याला उत्तर न देता बुद्धाच्या तोंडाकडे पाहिलें.

बुद्ध म्हणाला “ हे गृहपति, तूं ज्या धर्माचें श्रवण केलेंस, त्या धर्माचें पूर्ण ज्ञान झाल्यामुळें ज्यांचें चित्त विमुक्त झालें आहें, तो पुनरिप कामोपभोगामध्यें सुख मानील काय?”

“नाही भगवन्:” यशाचा पिता म्हणाला.

बुद्ध म्हणाला, “तर मग यशाला आतां संसारबद्ध करण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे.”

श्रेष्ठी म्हणाला “माझ्या मुलाला आपल्या धर्मरहस्याचें पूर्ण ज्ञान झालें, हा त्याचा मोठाच लाभ झाला असें मी समजतों.”

यशाच्या पित्यानें बुद्धाला दुसर्‍या दिवशीं आपल्या घरीं भोजनासाठीं आमंत्रण केलें;  तें बुद्धाने मान्य केल्यावर घरीं जाऊन त्यानें दुसर्‍या दिवशींची सर्व सिद्धता केली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel