“आणखी आर्यश्रावक संघाचें अनुकरण कारितो:- ‘भगवंताचा श्रावकसंघ सरळ मार्गानें चालतो, ऋजुमार्गानें चालतो, न्यायमार्गानें चालतो, सम्यकमार्गानें चालतो. या संघामध्यें आठ प्रकारच्या सत्पुरुषांचा (स्रोतापत्तिमग्ग, सोतापत्तिफल, सकदागामिमग्ग, सकदागामिफल, अनागामिमग्ग, अनागामिफल, अरहत्तमग्ग आणि अरहत्तफल अशा निर्वाण मार्गांच्या आठ पायर्‍या आहेत. त्यांनां अनुसरून निर्वाणमार्गाला लागलेल्या साधूंचे आठ भेद होतात. यासंबंधानें  थोडी माहिती बुद्ध, धर्म आणि संघ या पुस्तकात (पा. ९९) दिली आहे. विशेष माहिती पालिग्रंथांत पहा.) समावेश होतो. हा जो भगवंताचा श्रावकसंघ आहे, तो दक्षिणेला आणि नमस्काराला योग्य आहे. हें एक लोकांना उत्तम पुण्यक्षेत्रच आहे.’ याप्रमाणे संघाचें अनुस्मरण केलें असतां श्रावकाचें चित्त प्रसन्न होतें, व चित्ताचा मल नष्ट होतो.

“आणखी विशाखे, आर्यश्रावक आपल्या शीलाचें अनुस्मरण करितो. ज्याज्या प्रसंगीं आपल्या शीलाला खंड पडूं न देतां, भंग होऊं न देतां, श्रावकानें त्याचें (शीलाचें) पालन केलें असेल, त्या त्या प्रसंगांचे अनुस्मरण केलें असतां श्रावकाचें चित्त प्रसन्न होतें. त्याचप्रमाणे महानुभाव देवतांचे अनुस्मरण केलें असतां, आणि आपण दिलेल्या दानाचें अनुस्मरण केलें असतां चित्त प्रसन्न होतें.”

“आणखी विशाखे, उपोसथाच्या दिवशीं आर्यश्रावक असा विचार करितो, कीं ‘आज मी प्राणातिपातापासून विरत झालों आहें; भूतमात्राविषयीं माझ्या मनांत दया उत्पन्न झाली आहे, प्रेम उत्पन्न झालें आहे; भूतमात्राविषयीं माझ्या मनांत दया उत्पन्न झाली आहें; दिलेल्याच वस्तूचा प्रतिग्रह करण्याचा मीं निश्चय केला आहे, व येणेंकरून माझा आत्मा पवित्र झाला आहे. मी अब्रह्मचर्यापासून विरत झालों आहें; ग्राम्य धर्मापासून विरत होऊन मी आज श्रेष्ठ ब्रह्मचर्य पाळीत आहें. मी असत्य भाषणापासून विरत झालों आहें; आजपासून मी सत्य बोलण्याचा निश्चय केला आहे; जेणेकरून माझ्या वचनावर लोकांचा विश्वास बसेल, लोकांना माझ्या बोलण्याचा प्रत्यय येईल. मी सर्व प्रकारच्या मादक पदार्थांपासून विरत झालों आहें; मी विकाल भोजनापासून विरत झालों आहें;  मी दुपार होण्यापूर्वी एकच जेवण जेवणार आहें. मनोविकार उद्दीप्त करणार्‍या नृत्यगीतवाद्यापासून आणि माला, गंध, मंडनविभूषण इत्यादिकांपासून मी विरत झालों आहे. उंची शय्येपासून मी विरत झालों आहें; आजचा दिवस मी अगदीं साध्या शय्येवर निजणार आहें. हे आठ नियम पाळल्यानें मी महानुभाव अर्हन्तांचें अनुकरण करीत आहें’ विशाखे, याप्रमाणें आर्य़श्रावकानें उपोसथव्रत पालन केलें असतां ते महत्फलद होतें.”

[४]
आर्यश्रावकानें सात पापकर्में वर्ज्य केलीं पाहिजेत

एके वेळीं बुद्धगुरू कोसल देशामध्यें धर्मोपदेश करीत फिरत असता वेणुद्वार नांवाच्या ब्राह्मणांच्या गांवीं आला. वेणुद्वारवासी ब्राह्मणांनी बुद्धाची कीर्ति पूर्वीच ऐकिली होती. ते सर्व एकत्र जमून बुद्धाच्या दर्शनाला आले. त्यांतील कांहीजण बुद्धाला नमस्कार करून बाजूला बसले, कांहीजण आपलें नामगोत्र कळवून एका बाजूला बसले, व कांहीजण बुद्धाचा कुशलसमाचार विचारून एका बाजूला बसले, आणि ते बुद्धाला म्हणाले “भगवन्, आम्ही आमच्या बायकामुलांसहवर्तमान राहून सुगंधी चंदन वगैरे उपभोग्य पदार्थांचा उपभोग घेऊन आणि द्रव्यसंचय करून सगतीला जाऊं, असा आम्हांला धर्मोपदेश करा.”

बुद्ध म्हणाला “गृहस्थहो, आपल्यासारखेंच परक्याला लेखावें यासंबंधानें मी तुम्हांला उपदेश कारितों, त्याचें सावधानपणे श्रवण करा.”

“गृहस्थहो, आर्यश्रावक असा विचार करितो कीं, मला जगण्याची इच्छा असून मरणाची इच्छा नाही; सुखाची इच्छा असून दु:खाची इच्छा नाही; असें म्हणतां मीं जर माझ्याप्रमाणेंच सुखाची इच्छा करणार्‍या प्राण्याला ठार मारिलें, तर तें त्याला कसें आवडेल?” म्हणून आर्यश्रावकानें स्वत: प्राणघातापासून विरत झालें पाहिजे आणि दुसर्‍यालाहि प्राणघातापासून विरत करण्याची खटपट केली पाहिजे.

“गृहस्थहो, आपलें द्रव्य चोंरले गेलें, तर त्यापासून आपणाला दु:ख होतें. म्हणूनच आर्यश्रावक चोरी करीत नाहीं, व दुसर्‍यालाहि चोरीपासून परावृत्त होण्यासाठी उपदेश करितो.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel