(३१)
अंगुलिमाल दरोडेखोर


बुद्धगुरु श्रावस्तीमध्यें अनाथपिंडिकाच्या आश्रमात राहत होता. त्या समयीं अंगुलिमाल नांवाने प्रसिद्धीला आलेल्या दरोडेखोरानें श्रावस्तीच्या आसपास पुष्कळ गांवें ओसाड पाडलीं होतीं. त्याला खून करण्याचे व्यसन इतकें लागलें होतें, की, कोणत्याही माणसाला ठार मारून त्याच्या अंगुलि कापून मोठ्या प्रौढीनें त्या तो आपल्या गळ्यांतील अंगुलींच्या माळेंत गोंवीत असे. या अंगुलींच्या माळेवरूनच त्याला अंगुलिमाल हें नाव पडलें होतें.

एके दिवशी बुद्धगुरु श्रावस्तीमध्यें भिक्षा ग्रहण करून ज्या दिशेला अंगुलिमाल होता, त्या दिशेला गेला. वाटेंत त्याला गवळ्यांनी आणि शेतकर्‍यांनीं पाहिलें, व त्या मार्गानें न जाण्याविषयीं पुष्कळ आग्रह केला. ते म्हणाले "हे श्रमण! या मार्गाने जाऊं नकोस. पलीकडे जंगलांत अंगुलिमाल नांवाचा भयंकर दरोडेखोर रहात आहे, तो तुला केवळ मजेखातर मारून तुझ्या अंगुलि आपल्या माळेंत घालील.''

बुद्धगुरु त्यांच्या बोलण्याला कांहीएक उत्तर न देतां, तसाच पुढें गेला. त्याला पाहून अंगुलिमालला मोठें आश्चर्य वाटलें! तो आपणापाशींच उद्गारला "या मार्गानें चाळीसपन्नास माणसें एकत्र जमून जात असतात. त्यांच्यावर देखील हल्ला करून मी त्यांनां लुबाडतों; परंतु हा श्रमण एकाकी मोठ्या धाडसानें या मार्गानें चालला आहे, ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट होय! याच्या धडासाचें प्रायश्चित्त म्हटलें म्हणजे याला देहान्तशासन करणें हें होय.''

हे उद्गार काढून आपली ढालतलवार घेऊन अंगुलिमाल वेगानें बुद्धाच्या अंगावर धांवला; परंतु त्या वेळीं बुद्धाने योगसिद्धीचा असा एक चमत्कार दाखविला, कीं, अंगुलिमाल आपलें सर्व सामर्थ्य एकवटून धांवत होता, तरी बुद्धाजवळ येऊं शकला नाही!

तेव्हां अंगुलिमाल आपणापाशींच ह्मणाला "हे महदाश्चर्य होय! मीं हत्ती, घोडे, रथ, मृग, इत्यादिकांचा देखील पाठलाग केला आहे; पण हा श्रमण साधारणपणें चालला असतां याचा पाठलाग मला करतां येत नाहीं!''

तो तेथेंच उभा राहून मोठ्यानें ओरडला "श्रमणा! तेथेंच उभा रहा.''

"अंगुलिमाल! मी उभा आहें, आणि तूंहि पण उभा रहा!'' बुद्धाने उत्तर दिलें.

अंगुलिमालाला बुद्धाचें म्हणणें नीट समजलें नाहीं. हा श्रमण चालत असतां उभा आहें असें म्हणतो, व मी उभा असतां मला उभा रहा असें म्हणतो, याचा अर्थ काय, हे विचारण्यासाठीं तो बुद्धाला म्हणाला "हे श्रमण, तूं चालत असतांना उभा आहें असें म्हणतोस, आणि मी उभा असतांना मला उभा नाहींस असें म्हणतोस, तेव्हां मी तुला असें विचारतों, कीं, तूं कोणत्या अर्थानें स्थित आहेस आणि मी कोणत्या अर्थानें अस्थित आहे?''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel