परिनिर्वाण

मगधदेशाच्या उत्तरेला वज्जी नांवांच्या महाजनांचें बलाढ्य राज्य होतें. यांनां लिच्छवी असेंहि ह्मणत असत. हे राज्य महाजनसत्ताक असून शाक्यांच्या राज्याच्या धर्तीवरच चाललें होतें. अजातशत्रु वज्जींचा फार मत्सर करीत असे. वज्जींच्या नाशाला तो फार उत्सुक झाला होता. एके दिवशीं तो आपल्या वस्सकार नांवाच्या ब्राह्मण अमात्याला ह्मणाला "हे ब्राह्मण, तूं बुद्धाजवळ जाऊन असें सांग, कीं `मगधराजा वज्जींचा उच्छेद करूं इच्छित आहे.' यासंबंधानें बुद्धाचें मत काय आहे, हें मला समजलें पाहिजे.''

अजातशत्रूच्या आज्ञेप्रमाणें वस्सकारब्राह्मण गृध्रकूटपवर्तावर बुद्ध रहात होता तेथें गेला, व आपल्या राजाचा मनोरथ त्यानें बुद्धाला कळविला. त्या वेळीं आनंद बुद्धाला वारा घालीत होता; त्याजकडे वळून बुद्ध ह्मणाला "आनंद, आजपर्यंत वज्जी वारंवार एकत्र जमून राजकारणाचा खल करीत आहेत काय?''

"होय भगवन्,'' आनंदानें उत्तर दिलें.
"आनंद, वज्जी जेव्हां एकत्र होतात आणि जेव्हां घरीं जातात, तेव्हा त्यांच्यांत एकसारखी एकी असते काय?''
"होय भगवन्, असें माझ्या ऐकण्यांत आलें आहे.''

"आपण केलेल्या कायद्यांचा वज्जी भंग करीत नाहींतना? किंवा कायद्याचा भलताच अर्थ करीत नाहींतना? ते कायद्याला अनुसरून वागत आहेत काय?''
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ वज्जींच्या कायद्याचा थोडा नमुना महापरिनिब्बानसुत्ताच्या अठ्ठकथेंत सांपडतो; पण त्यावरून सर्व कायद्यांचें नीट अनुमान होत नाहीं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"होय भगवन्, वज्जी कायदेशीरपणें वागतात, असें माझ्या ऐकण्यांत आलें आहे.''

"वृद्ध राजकारणी पुरुषांनां वज्जी मान देऊन त्यांची सल्ला वारंवार घेत असतात काय?''

"होय भगवन्, वज्जींच्या राज्यांत वृद्ध राजकारणी पुरुषांना फार मान आहे, असें माझ्या ऐकण्यांत आलें आहे.''

"ते आपल्या राज्यांतील विवाहित किंवा अविवाहित स्त्रियांवर बळजबरी करीत नाहींतना?''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel