(३)
तपश्चर्या


सिद्धार्थानें आपला राजवेष टाकून भिक्षुवेष स्वीकारला, व पायीं प्रवास करून एका आठवड्याने राजगृह गांठले. त्याने वाटेत निर्वाह कसा केला, ही गोष्ट ग्रंथांतरी सांगितली नाही, परंतु त्याने अरण्यांतून मिळणार्‍या  फलमूलांवर आपला चरितार्थ केला असावा, असा तर्क आहे. पण जेव्हा सिद्धार्थ राजगृहाला आला, तेव्हा चरितार्थाचे दुसरे साधन नसल्यामुळे त्या शहरांत भिक्षा मागावयाला जाणे भाग पडले. तो भिक्षापात्र घेऊन प्रसन्न मुद्रेने राजगृह नगरांतील रस्त्यांतून चालला असता त्याला पाहून राजगृहवासी नागरिक चकित होऊन गेले. राजगृहाच्या आसपास पुष्कळ श्रमण रहात असते. पण भरतारुण्यांत असलेला सिद्धार्थासारखा तेजस्वी पुरुष त्यांच्यामध्ये कधीच आढळला नाही. सिद्धार्थाला दाराशी पाहिल्याबरोबर प्रत्येक घरांतून बायका बाहेर येऊन यथाशक्ति शिजविलेले अन्न त्याच्या पात्रात टाकू लागल्या. अल्पावकाशांतच सिद्धार्थाचे पात्र नानाविध अन्नानें भरून गेले. तेव्हा ते आपल्या उपवस्त्राने झाकून तो राजवाड्यावरून पांडवपर्वताकडे वळला.

मगधदेशाचा राजा बिंबसार आपल्या प्रासादाच्या गच्चीवर बसला होता. सिद्धार्थ रस्त्यांतून जात असतानां त्याने त्याला पाहिलें आणि तो आपल्या नोकरांना म्हणाला “हा विलक्षण पुरुष कोण आहे? याची शरीरकांति पाहिली असता हा थोर कुलांत जन्मला असवा, असे स्पष्ट दिसत आहे. पण याच्या भिक्षुवेषाकडे पाहून मन साशंक होते. तुम्ही याच्यामागोमाग जाऊन हा कोठे जातो व काय करितो, याचा तपास करा. मी याची सर्व प्रवृत्ति जाणण्यास अत्यंत उत्सुक झालों आहे.”

हे राजाचे भाषण ऐकल्याबरोबर राजदूत ताबडतोब सिद्धार्थाच्या मागे निघालें.

सिद्धार्थ पांडवपर्वतापाशी येऊन एका टेकडीच्या छायेखाली दगडावर बसला, व त्याने भिक्षापात्र खाली ठेवून त्यातील नानाविध अन्नाकडे दृष्टि फेकली. महारचांभारांपासून तहत ब्राह्मणापर्यंत सर्व जातीच्या मनुष्यांनी दिलेले अन्न त्या पात्रामध्ये होते. ते पांहून सिद्धार्थाच्या पोटांत मळमळून आलें. पोटांतील आंतडी तोंडांतून बाहेर निघतात की काय, असा त्याला भास झाला. तेव्हा तो आपणाशीच म्हणाला “सिद्धार्था, तुला कोणी जबरदस्तीने प्रवज्या घेण्यास लाविले नाही. राजीखुषीनें तूं हा वेष स्वीकारला आहेस. राजसंपत्तीचा तूं आनंदानें त्याग केलास, परंतु या घातक संस्काराला तू अद्यापि उराशी घट्ट धरून बसला आहेस! माणसामाणसांतील भेदभावानें तुझे चित्त कळवळून जात असे. पण आता हीन जातीचें अन्न खाण्याचा प्रसंग आल्याबरोबर तुझ्या मनांत त्या लोकांविषयी अनुकंपा न राहतां कंटाळा उत्पन्न झाला. सिद्धार्थ! असला वेडेपणा सोडून दे. सुवासिक तांदळाच्या भातामध्ये आणि हीन लोकांनी दिलेल्या या अन्नामध्ये तुला भेदभाव वाटता कामा नये. ही स्थिति आली तरच तुझी प्रव्रज्या सफल होणार आहे.”

याप्रमाणें आपल्या मनाला बोध करून सिद्धार्थानें मोठ्या संयमाने अन्न खाण्यास सुरुवात केली. इतक्यात बिंबिसारराजानें पाठविलेले चार दूत सिद्धार्थ बसला होता तेथें आलें. त्यातील एकजण ताबडतोब राजाला खबर देण्यासाठी माघारा पळत गेला, आणि बिंबिसाराला म्हणाला “महाराज, आपण ज्या सत्पुरुषाचा शोध लावण्यासाठी आम्हाला पाठविले होते, तो पांडवपर्वताच्या पायथ्याशी एका टेकडीच्या सावलीत बसला आहे. सिंहासारखी त्याची गंभीर मुद्रा पाहून कोणत्याहि माणसाच्या मनांत त्याच्याविषयी आदरबुद्धि उत्पन्न झाल्यावाचून रहाणार नाही.”

हे दूताचें भाषण ऐंकून बिंबिसाराने आपला रथ सज्ज करविला, व ताबडतोब पांडवपर्वताच्या पायथ्याशी जाऊन तेथून सिद्धार्थ बसला होता त्या ठिकाणी तो पायीच गेला.

सिद्धार्थाचे भोजन नुकतेच आटोपले होते. आपले भिक्षापात्र धुऊन एका बाजूला उन्हांत पालथें घालून तो आपल्या आसनावर शांतपणे बसला होता. बिंबिसार त्याच्याजवळच एका बाजूला बसला, आणि म्हणाला “तुझ्या रूपकांतिवरून तूं मोठ्या क्षत्रियकुलांत जन्मला असावास, असे वाटतें. पण अशा तरुण वयांत राजश्रीचा त्याग करण्याला तुला काय कारण झाले, याचे मला अनुमान करता येत नाही. तूं कोणत्या कुलामध्ये जन्मलास व येथें का आलास, हे जाणण्याच्या इच्छेने मी येथे आलो आहे. तुझी कोणतीहि जात असली तरी मी तुला माझ्या पदरी ठेवून मोठ्या योग्यतेला चढविण्याचा विचार केला आहे. तूं माझ्या सैन्यामध्ये मोठी कामगिरी बजावशील, याबद्दल मला शंका नाही.”

सिद्धार्थ म्हणाला, “महाराज, हिमालयाच्या पायथ्याशी जे सुसमृद्ध शाक्यांचे राज्य आहे, त्याची कीर्ति आपल्या ऐकण्यांत आलीच असेल. तेथील राजाचा मी पुत्र आहे. मी संपत्ति मिळविण्याच्या आशेने गृहत्याग केला नाही, कांकी, माझ्या घरी वीट येईपर्यंत मी संपत्तीचा उपभोग घेत होतो. मी दुसर्‍या कोणत्याहि उद्देशानें गृहत्याग केला नसून केवळ दु:खोपशमाचा मार्ग शोधून काढण्यासाठी येथवर येण्याचे श्रम सहन केले आहेत. यासाठी आणखीही पुष्कळ क्लेश सहन करण्यास मी तयार आहे. जगांतील सर्व संपत्ति जरी मला मिळाली, तरी त्यायोगे मला समाधान होणार नाही. मनुष्यजातीच्या दु:खाचा अंत कोठे होतो, व त्या स्थानाप्रत जाण्याचा मार्ग कोणता, हे जर मला समजले नाही तर माझे जीवित व्यर्थ आहे! तेव्हा आपण मला आपल्या राज्यांत रहाण्याचा आग्रह करू नये.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel