[३]
आर्य उपोसर्थ

एके समयीं बुद्धगुरू श्रावस्तींमध्ये विशाखेनें भिक्षुसंघासाठी बांधिलेल्या प्रासादांत रहात होता. एका उपोसथाच्या दिवशी विशाखा मिगारमाता तेथें आली; आणि भगवंताला नमस्कार करून एका बाजूला बसली- तेव्हां बुद्ध म्हणाला “विशाखे, आज सकाळीच कोणीकडे चालली आहेस?”

विशाखा म्हणाली “भगवन्, आज उपोसथव्रत पाळण्यासाठीं मी येथें आलें आहे.”

बुद्ध म्हणाला “विशाखें, गोपालक उपोसथ, निर्ग्रंथ उपोसथ, आणि आर्य उपोसथ, असे उपोसंथाचे तीन प्रकार आहेत. लोकांच्या गाई राखणारा गवळी संध्याकाळीं सर्व गाई मालकाच्या स्वाधीन करून उद्यांचा विचार करीत बसतो, कीं ‘उद्यां मी अमुक ठिकाणीं गाईला चारीन व अमूक ठिकाणी पाणी देईन.’ त्याचप्रमाणें विशाखे, एकादा उपासक उपोसथाच्या दिवशीं असा विचार करीत बसतो, कीं ‘आज मीं अमुक अमुक खाल्लें; उद्यां याच वेळीं मी अमुक अमुक खाईन.’ तो सर्व दिवस जेवणाच्या किंवा इतर पदार्थांच्या चिंतनांत घालवितो. अशा माणसाच्या उपोसथाला मी गोपालक उपोसथ असें म्हणतों.

“विशाखे, निर्ग्रथ नांवाचे श्रमण आहेत, हें तुला माहीतच आहे. ते उपोसथाच्या दिवशीं श्रावकांनां असा उपदेश करितात, कीं, पूर्वेच्या दिशेला शंभर योजनेंपर्यंत प्राण्यांचा वध करणार नाहीं असा निश्चय करा; पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या दिशांलाहि शंभर योजनेंपर्यंत प्राण्याचा वध करणार नाहीं, असा निश्चय करा. याप्रमाणें ते कांही प्राण्यांवर दया करण्याविषयी सांगत नाहींत. आणखी ते आपल्या उपासकांला असा उपदेश करितात, कीं, तूं सर्व वैर टाकून देईन असें बोल- ‘मी कोठेंहि नसून कोणाचाहि कांहीच होत नाही; माझे कोठेंहि कांहीच नाहीं.’ हा जरी असें बोलत असतो, तरी तो आपल्या आईबापांनां आईबाप म्हणावयाचें सोडीत नाहीं. त्यालाहि त्याचे आईबाप आपला मुलगा म्हणावयाचें सोडून देत नाहींत. तो आपल्या बायकोला बायको असें जाणतो, व त्याची बायको त्याला पूर्वीप्रमाणेंच आपला पति समजते. त्याचे नोकर त्याला आपला स्वामी असें समजतात, व तो देखील आपल्या नोकरांनां आपले सेवक असेंच समजतो. तेव्हां उपोसथाच्या दिवशींची ‘मी कोठेंहि नसून कोणाचाहि नाही’ इत्यादिक त्याची प्रतिज्ञा खोटी ठरते. ज्या दिवशी खरें बोलण्याचास अभ्यास करावा, त्याच दिवशी खोटें बोलण्याला शिकवल्यासारखें होते. तोच निग्रंर्थाचा उपासक दुसर्‍या दिवशी कोणी न दिलेल्या वस्तूंचेदेखील ग्रहण करितो. म्हणजे दुसर्‍याच्या वस्तूचा अपहार करण्यांत त्याला दोष दिसत नाहींत. विशाखे, अशा माणसानें केलेल्या उपोसथाला निर्ग्रंथ उपोसथ असें म्हणतात. पण हा उपोसथ महत्फलदायक होत नाहीं.”

“आतां आर्य उपोसथ कसा असतो हें सांगतों. आर्य उपासक उपोसथाच्या दिवशीं बुद्धाचें स्मरण करितो. ‘याप्रमाणें तो भगवान् सम्यक् संबुद्ध सुगत, सर्व लोकांचे अंत:करण जाणणारा, विद्या आणि आचरणानें युक्त, दमन करण्याला योग्य अशा माणसाचा सारथी आणि देव व मनुष्यांचा गुरू होय.’ अशा त-हेनें तथागताचें अनुस्मरण केलें असतां चित्त प्रसन्न होतें आणि चित्ताचा मल नष्ट होतो.”

“त्याचप्रमाणें आर्यश्रावक धर्मांचे अनुस्मरण करितो:- ‘भगवंतानें धर्म उत्तम प्रकारें उपदेशिला आहे; साधूंनी त्याचा अनुभव घेण्याला तो योग्य आहे; तो अकालफल देणारा आहे; त्याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासारखा आहे; तो जवळ बाळगण्यालायक आहे; आणि सुज्ञांनी अंत:करणामध्यें त्याचा साक्षात्कार करून घेणें योग्य आहे.’ याप्रमाणें धर्मांचे स्मरण केलें असतां आर्यश्रावकाचें मन प्रसन्न होतें; आणि चित्ताचा मल नष्ट होतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel