[६]
महौषधाची गोष्ट

मिथिलानगरीमध्यें एका कालीं वैदेह नांवाचा राजा राज्य करीत होता. सेनक, पुक्कुस, काविंद, आणि देविंद हे चार त्याचे विद्वान् अमात्य होते. एके दिवशीं राजाला असें स्वप्न पडलें, कीं, "राजांगणामध्यें चार मोठालीं अग्निकुंडें प्रज्वलित झालीं आहेत, इतक्यांत तेथें एक काजव्याएवढी ठिणगी उत्पन्न झाली व ती वाढत जाऊन तिनें त्या चारहि अग्निकुंडांना ग्रासून टाकलें."

प्रात:कालीं जेव्हां अमात्य राजाच्या दर्शनाला आले, तेव्हां राजा त्यांनां म्हणाला "रात्रीं मला चांगली झोंप आली नाहीं. मीं एक भयंकर स्वप्न पाहिलें."

सेनकानें राजाला कोणतें स्वप्न पडलें, अशी पृच्छा केल्यावर राजानें तें त्याला सांगितलें. तेव्हां सेनक म्हणाला "महाराज, घाबरण्याचें कांहीं कारण नाहीं. या स्वप्नाचा अर्थ चांगला आहे. आजला जे आम्ही चार अमात्य या राजभवनामध्यें आपल्या बुद्धितेजानें प्रकाशत आहों, तेथें अप्रसिद्ध कुळांतील एक मनुष्य पुढें येईल, व तो आपल्या बुद्धिप्रभावाने आम्हां सर्वांनां मागें टाकील, असें आपल्या या स्वप्नावरून भविष्य करतां येतें."

मिथिलेपासून कांहीं अंतरावर प्राचीनयवमध्यक नांवाचें एक लहानसें शहर होतें. तेथें श्रीवर्धन नांवाचा एक सुशील गृहस्थ रहात होता. ज्या दिवशीं वैदेह राजाला वरील स्वप्न पडलें, त्याच दिवशीं श्रीवर्धनाची साध्वी स्त्री गर्भवती झाली. नवमास पूर्ण झाल्यावर तिला एक सुस्वरूप पुत्र झाला. हाच आमचा बोधिसत्व होय. नामकरणाच्या दिवशीं या मुलाचें नांव 'महौषध' असें ठेवण्यांत आलें. महौषध जेव्हां वयांत आला, तेव्हां आपल्या बुद्धिबलानें शहरांतील सर्व तरुण मुलांचा तो पुढारी बनला.

एके दिवशी शेंकडों मुलांबरोबर तो क्रीडामंडलामध्यें खेळत असतां एकाएकीं पावसाची मोठी सर आली, व सर्व मुलांचे कपडे भिजून चिंब झाले. बोधिसत्व म्हणाला "गडे हो, पाऊस पडत असतां खेळण्यासाठीं आम्ही एक क्रीडाशाळा बांधूं या. तुम्ही तुमच्या वडिलांकडून प्रत्येकी एकएक कार्षापर्ण आणा."

मुलांनीं बोधिसत्वाच्या सांगण्याप्रमाणें वर्गणी गोळा करून त्याच्या स्वाधीन केली. महौषधानें शहरांतील मुख्य सुताराला बोलावून आणून एक उत्तम शाला तयार करण्यास सांगितलें. परंतु त्या सुतारानें केलेला नकाशा महौषधाला पसंत पडला नाहीं. त्यानें स्वत: नकाशा तयार करून व स्वत: देखरेख करून त्या सुतारामार्फत एक उत्तम शाळा बांधिली. या शाळेच्या एका टोंकाला, पाऊस पडला असतां खेळण्याची सोय केली होती. परंतु प्रमुख विभागांतून निरनिराळ्या गरजू लोकांची सोय करण्यांत आली होती. एक भाग पान्थस्थ लोकांसाठीं राखून ठेवण्यांत आला होता; दुसर्‍या एका भागामध्यें गरीब स्त्रियांसाठीं प्रसूतिगृह तयार केलें होतें; तिसर्‍या ठिकाणीं धर्मोपदेशगृह बांधिलें होतें, व त्याला जोडून एक न्यायसभा केली होती.

बोधिसत्वानें बांधलेल्या या अपूर्व शाळेमुळें त्याची कीर्ति त्या नगरांत व आसपासच्या गांवांत पसरली. ती शाळा पहाण्यासाठीं दूरदूरचे लोक मुद्दाम येऊं लागले. लवकरच बोधिसत्वानें आणखी वर्गणी जमवून आपल्या शाळेजवळ एक सुंदर तलाव बांधला.

एके दिवशीं बोधिसत्व आपल्या सोबत्यांसहवर्तमान शाळेजवळ खेळत असतां दोघे शेतकरी एका बैलाच्या जोडीसंबंधात भांडत चालले होते. त्यांनां बोधिसत्वानें बोलावून आणिलें व तुम्ही कशासाठीं भांडतां, असा प्रश्न केला. तेव्हां त्यांतील एकजण म्हणाला "हे पंडित, मी तुझ्या तलावाचें पाणी पिऊन व बैलाला पाणी पाजून एका झाडाखालीं विश्रांति घेत पडलों होतों. माझे हे बैल जवळच चरत होते. इतक्यांत माझा डोळा लागला, व हे बैल मला न कळत जंगलांत शिरले. तेथें या मनुष्यानें त्यांनां पकडलें, व आतां हा हे बैल आपलेच आहेत असें म्हणत आहे!"
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel